अध्यात्म - बेचैनी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 04:54 AM2018-07-09T04:54:39+5:302018-07-09T04:54:58+5:30

बेचैनीत जगतो आपण. म्हणजे कायम नाही पण जगतो खरे. एखादी क्षुद्र घटना, एखादा अपघात, एखादा हळवा स्पर्श, हलकी सर, झुळझुळता मुलायम आवाज, एखादी हाक आणि एखादा कटाक्ष सारेच आपल्याला बेचैन करते. ही बेचैनी निसर्ग, मानवनिर्मित, यंत्राची, तंत्राचीही असू शकते.

Adhyatma - Restlessness | अध्यात्म - बेचैनी

अध्यात्म - बेचैनी

Next

- किशोर पाठक

बेचैनीत जगतो आपण. म्हणजे कायम नाही पण जगतो खरे. एखादी क्षुद्र घटना, एखादा अपघात, एखादा हळवा स्पर्श, हलकी सर, झुळझुळता मुलायम आवाज, एखादी हाक आणि एखादा कटाक्ष सारेच आपल्याला बेचैन करते. ही बेचैनी निसर्ग, मानवनिर्मित, यंत्राची, तंत्राचीही असू शकते. निसर्ग क्रूर आणि हळवा हलकाही असतो. तो एकालाच करतो असा नाही. एखादाच माणूस निसर्गात झेलपांडतो असं होत नाही. तो त्या त्या जागेतील समूहाला परिणाम करतो. मानवनिर्मितही दोन प्रकारात गणले जातात. एक व्यक्तिगत आणि दुसरा समूहासाठी. मग ती एक प्रार्थना असो, ललकार असो, पुकार असो, आव्हान असो वा आवाहन तो समूहालाच झपाटतो. यंत्र आणि तंत्रही असेच. ते वाटेला गेलात तर झोंबलेच. वायरकडे बघत राहा तासन्तास. ती निपचित पडून राहते; पण तिला स्पर्श करा करंट बसलाच समजा. शॉक बसतो म्हणजे निसर्गातच ठासून व्यवहार आणि परिणाम भरून राहिलाय. त्यातून त्याची वा तिची भाषा कळत नाही. कळली तरी बेचैनी, कळत नाही म्हणून बेचैनी. परमेश्वर भेटत नाही म्हणून बेचैनी तो वारंवार भेटला तरी. एखादी व्यक्ती झपाटून आवडते. वाटत नाही तो वा ती आपली इतकी होऊ शकते. ती, तो कोण असतो आपला? कुणी नाही आणि सर्वस्व होऊन बसतो. ह्यातूनच कथा जन्म घेतात. मग पुन्हा बेचैनी, मिळाले तरी किंवा भेटत नाही म्हणून! मग तो सूर्यास्त वा सूर्योदय होतो. एक मार्गदर्शक, मेंटॉर, तत्त्वज्ञ, विचारवंत होतो. नकळत आपल्या आयुष्याचा भाग होतो. शेंगदाणा जमिनीतून उपटून घेताना त्याला माती लागून येते. बटाटा, कांदा असो माती येतेच सोबत. ती माती त्या पदार्थाचं भाग्य असतं. खरं तर मातीशी असलेलं एवढंच नातं पण तीही सुटण्याची बेचैनी देऊन जाते. ही बेचैनी जेवढी घट्ट तेवढी ती वस्तू आपली आपलीशी होते. कायम जवळ असावीशी वाटते. म्हणून प्रत्येक दु:ख आणि सुखासोबतच उगवत असते बेचैनी तीही वाढते, फोफावते, विस्तारते. ती एकतर पूर्ण आनंद नाहीतर हुरहुर, असोशी, एकटेपणा. सगळे मानवी विकार ह्या बेचैनीत आहेत. म्हणून ती हवीही आणि नाहीही. बघा ना कुणीसं म्हणतं तुझं काहीतरी पडलंय, लगेच शोध सुरू... तशी बेचैनी, बघा, सापडतंय का?

Web Title: Adhyatma - Restlessness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.