दिल्याने येत आहे रे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 11:46 PM2018-09-24T23:46:28+5:302018-09-25T00:09:22+5:30
आपण सर्वांनी ऐकलं आहे ‘केल्याने होत आहे रे...’ परंतु आज मी वेगळाच सिद्धांत मांडला आहे. ‘‘दिल्याने येत आहे रे आधी दिलेची पाहिजे’’ हे महावाक्य आहे. हा सिद्धांत जर तुम्हाला पटला, उमजला आणि तुमच्यामध्ये रुजला तर तुमच्यामध्ये सुख नांदणारच.
- प्रल्हाद वामनराव पै
आपण सर्वांनी ऐकलं आहे ‘केल्याने होत आहे रे...’ परंतु आज मी वेगळाच सिद्धांत मांडला आहे. ‘‘दिल्याने येत आहे रे आधी दिलेची पाहिजे’’ हे महावाक्य आहे. हा सिद्धांत जर तुम्हाला पटला, उमजला आणि तुमच्यामध्ये रुजला तर तुमच्यामध्ये सुख नांदणारच. आता तुम्हीच विचार करा तुमच्याकडे जर सुख नसेल तर तुम्ही देण्यामध्ये कमी पडत आहात. हे वाचल्यावर तुमच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले असतील. देणं इतकं महत्त्वाचं आहे? का दिलं पाहिजे? काय दिलं पाहिजे? किती दिलं पाहिजे? कसं दिलं पाहिजे? खरंतर दररोजच्या जीवनामध्ये ‘देणीघेणी’ सुरू असतातच. उदाहरणार्थ लग्नामध्ये, बारशाला, मुंजीसाठी किंवा काही इतर कारणासाठी आपल्याकडे काही भेटवस्तू, अहेर आला की आपण ते लिहून ठेवतो आणि आपल्याला जेव्हा देण्याची वेळ येते तेव्हा तो व्यवहार लक्षात घेऊन देतो. आपण एखाद्याच्या घरी गेलो तर त्यांनी आपल्यासाठी काय केलं, आपल्याला काय दिलं ते बरोबर लक्षात ठेवून ती व्यक्ती आपल्या घरी येते तेव्हा अगदी तसाच व्यवहार पूर्ण करतो. कमी नाहीच पण जास्तसुद्धा नाही. याला देणं म्हणत नाहीत. खरं ‘देणं’ पाहायचं असेल तर निसर्गाकडे पाहायचं. निसर्ग फक्त देतच असतो. सूर्य सर्वांना प्रकाश देतो. झाडांकडे पाहिल्यावर मला कौतुकच वाटतं, आपल्याला प्राणवायू तर देतातच शिवाय पानं, फुलं, फळं सर्वांसाठी देतात. आंब्याच्या झाडाला इतके आंबे येतात, त्यातल्या एकाही आंब्याची झाड चवदेखील चाखत नाही. सर्व आंबे आपल्यासाठी देत असतं. तुम्ही विचार करत असाल, तुम्ही म्हणताय खरं परंतु आमच्याकडेच नाही, आमचंच भागत नाही, दररोजच्या व्यवहाराची सांगत घालताना नाकीनऊ येतात; त्यात तुम्ही कुठे देण्याच्या गोष्टी करता आहात. घेण्याच्या काही गोष्टी असतील तर त्या आम्हाला आधी सांगा. खरंतर मी घेण्याचीच गोष्ट शिकवितो आहे. आपण कॅरम खेळत असतो तेव्हा दोन प्रकारचे शॉट्स असतात. एक होम शॉट आणि दुसरा रिबाउंड शॉट. मी आता जे सांगतो आहे ‘‘दिल्याने येतं आहे रे’’ हा रिबाउंड शॉट आहे. कॅरमच्या खेळामध्ये होम शॉट सोपा असतो आणि रिबाउंड शॉट कठीण असतो, पण जीवनामध्ये होम शॉट अवघड असतो तर रिबाउंड शॉट सोपा असतो. हे नेमकं कसं ते पुढील लेखात समजून घेऊया.