Adhyatmik : नम: सभाभ्य:
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 12:24 AM2018-07-11T00:24:29+5:302018-07-11T00:25:26+5:30
प्रजाहितदक्ष हे छत्रपती शिवरायांचे विशेष भूषण. प्रजेची, रयतेची काळजी आद्य मानून ‘जाहले शिवाजी छत्रपती महाराज.’ राजा प्रजाहितदक्ष असतो तेव्हा परदास्याचे बंध तुटतात. लोकशाहीचे बीज विश्वामध्ये प्रथम भारतीयांनीच पेरले. हजारो वर्षांपूर्वीपासून लोकशाहीची पाळेमुळे म्हणूनच या देशात घट्ट रुजली आहेत. वैदिक काळापासूनची ही परंपरा दृढ झाली आहे.
- डॉ. गोविंद काळे
प्रजाहितदक्ष हे छत्रपती शिवरायांचे विशेष भूषण. प्रजेची, रयतेची काळजी आद्य मानून ‘जाहले शिवाजी छत्रपती महाराज.’ राजा प्रजाहितदक्ष असतो तेव्हा परदास्याचे बंध तुटतात. लोकशाहीचे बीज विश्वामध्ये प्रथम भारतीयांनीच पेरले. हजारो वर्षांपूर्वीपासून लोकशाहीची पाळेमुळे म्हणूनच या देशात घट्ट रुजली आहेत. वैदिक काळापासूनची ही परंपरा दृढ झाली आहे.
भगवान शंकराला प्रिय असलेल्या ‘रुद्रसूक्त’मधील ऋषी म्हणतात ‘नम: सभाभ्य: सभापतिश्च वो नमो’ सभेला पहिला नमस्कार. नंतर सभापतीला. सभा आहे म्हणून सभापती. शंकराच्या अभिषेकासाठी म्हटले जाणारे हे वेदमंत्र पाच हजार वर्षांपूर्वीचे आहेत. पाच हजार वर्षांपूर्वी आमच्या पूर्वजांनी लोकशाहीचा डंका पिटला. भगवंतांनी गीतेमध्ये ‘लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि’ असे अर्जुनाला सांगताना लोकमहतीला प्राधान्य दिले आहे. संस्कृत साहित्यातील लोकशाहीच्या वैश्विक विचारमूल्यांचे जतन संवर्धन पुढे संतसाहित्याने केले. ‘वक्ता वक्ताचि नोहे श्रोतेविण’ असे माउली लिहिती झाली. सभा आहे म्हणून सभापती, श्रोतृवर्ग आहे म्हणून वक्ता, लोक आहेत म्हणून नेता. लोकशाही म्हणून संसद, समर्थांनी ‘जनाचा प्रवाह चालिला पाहिजे/ जन ठायी ठायी तुंबला म्हणजे खोटे’ असे सांगताना जनप्रवाह म्हणजे लोकमताचाच आदर केला.
आपल्या विचारवंतांनी लोककल्याणाचेच गीत गायले. यद्यपि सिद्धम् लोकविरुद्धम/ नाकरणीयम् नाचरणीयम्’ हे विचार लोकशाहीची पाळेमुळे बळकट करणारेच आहेत. व्यक्तिगत स्वार्थापोटी जाणीवपूर्वक डावलण्याचे प्रयत्न आपण करतो. घरामध्ये कामधेनू असताना शेजाऱ्याकडे आपण ताक मागतो हा राष्टÑ दैवदुर्विलासच मानावा लागेल. शंकरापेक्षा सुद्धा लोकशंकराचे स्थान लोकशाहीत मोठे. आपण लोक शंकराची कवाडे बंद करून टाकली आहेत असे म्हणण्याची पाळी येऊ नये. ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा’ हे गीत आळवणाºयांनी वेळीच सावध होऊन कार्यरत झाले पाहिजे. वारसा जपला पाहिजे. बॅ. नाथ पैंनी लोकसभेत लोकशाहीच्या पुष्ट्यर्थ ‘लोकशक्ति: विशिष्यते’ हा श्लोक खासदारांना अनेकवेळा ऐकविला होता. राजसत्तेचे अधिष्ठान लोकशक्ती आहे. राजसत्ता आणि लोकसत्ता यामध्ये दुरावा निर्माण होत असेल तर लोकशाहीच्या बाजूनेच राहिले पाहिजे.