Aditya L1: सूर्याची रहस्ये शोधण्याच्या प्रवासात ‘आदित्य’ला काय सापडेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 10:36 AM2023-09-15T10:36:23+5:302023-09-15T10:36:47+5:30

Aditya L1: सूर्यदेवता आध्यात्मिक जागृती निर्माण करते. सूर्य शक्तीचे रहस्य समजून घेण्यासाठी त्याच्याकडे जाणे म्हणजे जणू ईश्वराकडेच जाणे ! आदित्य यानाचे हेच महत्त्व आहे.

Aditya L1: What will Aditya discover on his journey to discover the secrets of the Sun? | Aditya L1: सूर्याची रहस्ये शोधण्याच्या प्रवासात ‘आदित्य’ला काय सापडेल?

Aditya L1: सूर्याची रहस्ये शोधण्याच्या प्रवासात ‘आदित्य’ला काय सापडेल?

googlenewsNext

- डॉ. एस. एस. मंठा
(भारतीय तंत्रविज्ञान संस्थेचे माजी अध्यक्ष) 

आदित्य म्हणजे सूर्य. सूर्याचा व्यापक स्वरूपाचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने ‘आदित्य एल वन’ उपग्रह सोडला. ज्यामुळे भारताची मान उंचावली आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी या उपग्रहाचे सात वेगवेगळे पेलोड्स असून ते भारतातच तयार केले गेले आहेत. आपल्या शास्त्रज्ञांची चिकाटी आणि निष्ठेचे ते प्रतीक आहे. सूर्यदेवता सुज्ञपणा देते, आध्यात्मिक जागृती निर्माण करते. सूर्य शक्तीचे रहस्य समजून घेण्यासाठी त्याच्याकडे जाणे म्हणजे देवाकडे जाणे होय. आदित्य यानाचे हेच महत्त्व आहे. सूर्य हा हायड्रोजन आणि हेलियमने  भरलेला असून त्याच्या केंद्रस्थानी निरंतर अणू विभाजन होत असते. दोन हलक्या अणुगर्भाच्या विभाजनातून वजनदार केंद्रक निर्माण होण्याच्या प्रक्रियेतून प्रचंड प्रमाणावर ऊर्जा बाहेर पडत असते. वजनदार अणू केंद्रकाचे दोन किंवा अधिक कमी वजनाच्या केंद्रकात विभाजन होण्याच्या प्रक्रियेतून बरीच ऊर्जा बाहेर पडते. सूर्यावर हायड्रोजन अणू केंद्रक किंवा प्रोटॉन एकत्र येऊन प्रतिक्रियेच्या शृंखलेतून हेलियम तयार होतो. पृथ्वीवर अणू विभाजन करून बॉम्बद्वारे विध्वंस करण्याची तरकीब माणसाने शोधली आहेच, पण अणू विभाजनामध्ये अमर्याद अशी स्वच्छ ऊर्जा पृथ्वीला देण्याची क्षमता आहे. थोडक्यात सूर्य स्वच्छ ऊर्जा देतो आणि आपण खराब ऊर्जा निर्माण करतो.

सूर्याविषयीच्या माहितीमध्ये थक्क करणारे असे पैलू असून वर्षानुवर्षाच्या अभ्यासातून ते समजलेले आहेत. सूर्याचे केंद्र अत्यंत उष्ण आणि घनदाट असून तेथे तापमान लक्षावधी अंश सेल्सिअस इतके असते. सूर्य हे विश्वास बसणार नाही इतके मोठे ऊर्जा केंद्र असून प्रकाशाच्या स्वरूपात ही ऊर्जा बाहेर फेकली जाते. त्यातून आपल्या सौर मालिकेत उष्णता आणि प्रकाश पसरतो. ही ऊर्जा नक्की किती असेल याची कोणाला कल्पना करता येईल काय? सुमारे ३८६ अब्ज मेगावॅट इतकी ती असावी. प्रत्येक सेकंदाला जर १०० अब्ज अणू बॉम्ब फोडले तर जेवढी ऊर्जा निर्माण होईल तेवढी ही ऊर्जा असेल.
सूर्य अनेक थरांचा तयार झाला असून त्याचा गाभा, उत्सर्जक पट्टा, संवाहक पट्टा, त्याचे तेजस्वी आवरण, वातावरणीय थर आणि त्याची प्रकाशमान कडा अशी ही रचना आहे. प्रत्येक थरात तापमान वेगवेगळे असते. सूर्य ऊर्जाभारीत इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन सातत्याने बाहेर अवकाशात टाकत असतो; त्याला सौर वारा (सोलर विंड) असे म्हटले जाते. अंतराळातील हवामान आणि पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्रावर त्याचा परिणाम होतो. आदित्य एलवनचा एक पेलोड या पैलूचा अभ्यास करणार आहे.

सूर्यावर चुंबकीय क्षेत्रामुळे तयार झालेल्या काळ्या, थंडगार डागांचे विस्तीर्ण पट्टे असतात, ते अंधारे, तुलनेने थंड असतात, तसेच त्यांचा आकार आणि संख्या अकरा वर्षाच्या सौर चक्रानुसार सतत बदलते.  सूर्याच्या वातावरणात साठवलेली ऊर्जा अचानक बाहेर पडते तेंव्हा सौरज्वाला निर्माण होतात आणि उत्सर्जनही होते. या ज्वालांचा पृथ्वीच्या आयनअंबरावर तसेच उपग्रहांच्या दळणवळणावर लक्षणीय परिणाम होतो. आदित्यच्या पेलोड्समार्फत याविषयी आणखी अभ्यास होईल. 

सूर्य आणि पृथ्वीच्या मधून चंद्र जातो, त्यावेळेला सूर्यग्रहण होते. ग्रहणाच्या वेळी सूर्याचा प्रकाश अडवला जातो. सूर्याचा बाह्य भाग म्हणजे कोरोनाच्या अभ्यासाची मोठी संधी वैज्ञानिकांना या काळात मिळते. उपग्रह याचाही अभ्यास करील.

आपली सौरमाला तयार होण्यात सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाची भूमिका महत्त्वाची आहे. ग्रह, चंद्र, शलाका आणि धूमकेतू हे सर्व सूर्याभोवतीची धूळ आणि वायूच्या फिरण्याने तयार होत असतात. सूर्य साधारणतः ४.६ अब्ज वर्षे इतका जुना असून अजून कित्येक अब्ज वर्षे त्याची विभाजन प्रक्रिया सुरू राहील, अशी अपेक्षा आहे. कधी तरी त्याच्याकडील हायड्रोजन इंधन संपेल आणि मग तो एक भलामोठा लाल गोळा होईल, त्याचे बाजूचे थर पडतील आणि सूर्य एक पांढरा बटू होईल. 

विविध विज्ञान शाखांसाठी सूर्याचा अभ्यास आवश्यक असून त्यात ॲस्ट्रोफिजिक्स, सोलर फिजिक्स तसेच अवकाशातील हवामान अंदाजाचा समावेश आहे. सूर्याविषयी अनेक रहस्ये उलगडण्याचा प्रयत्न इस्रोचे वैज्ञानिक करत राहतील, त्याचा पृथ्वीवर होणारा परिणामही अभ्यासला जाईल.
 

Web Title: Aditya L1: What will Aditya discover on his journey to discover the secrets of the Sun?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.