‘आदित्य’ निघाला.. तो राहील कुठे? करील काय?
By Shrimant Mane | Published: September 2, 2023 09:35 AM2023-09-02T09:35:08+5:302023-09-02T09:36:36+5:30
योगायोगाने ‘आदित्य’ मोहिमेत सूर्यनिरीक्षणासाठी जाणाऱ्या यानावरही सात उपकरणे आहेत.
- श्रीमंत माने
(संपादक, लोकमत, नागपूर)
सूर्याचा अभ्यास करायला भारताचे आदित्य-एल १ यान आज रवाना होईल. यातील एल-१ महत्त्वाचा, तो आहे लाग्रांज टापू. सूर्यासंदर्भात असे पाच लाग्रांज टापू मानले जातात. पहिला टापू पृथ्वीवरून सूर्य तसेच बुध, शुक्र या ग्रहांच्या वाटेवर, दुसरा विरुद्ध दिशेने म्हणजे पृथ्वीपेक्षा अधिक अंतरावरील गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून वगैरे ग्रहांकडे जाताना, तिसरा सूर्याच्याही पलीकडे तर चौथा व पाचवा अनुक्रमे लाग्रांज-१ च्या अनुक्रमे उजव्या व डाव्या बाजूला. या बिंदूंना अठराव्या शतकातील थोर इटालियन गणिती जोसेफ लुईस लाग्रांज यांचे नाव देण्यात आले आहे. लाग्रांज-१ भागात कुठल्याही गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव नाही.
हवेसंदर्भात जशी निर्वात पाेकळी असते तसा, यानावर कोणतीही शक्ती लागू होणार नाही, असा हा भाग आहे. कारण, सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीने अख्खी सूर्यमाला एकत्र बांधून ठेवली असली तरी लाग्रांज-१ भागात पृथ्वी व सूर्याचे गुरुत्वाकर्षण एकमेकांना निरस्त करते. कुठल्याही शक्तीचा प्रभाव अथवा प्रतिरोध नसल्यामुळे आदित्य एल-१ अत्यंत कमी इंधनात आपले काम करू शकेल. बुध व शुक्र हे ग्रह त्या पलीकडे असले तरी या टापूचा आणखी एक फायदा म्हणजे कुठल्याही ग्रहणाशिवाय सूर्याचे निरीक्षण करता येईल. सूर्य कधीही ‘आदित्य’च्या दृष्टीआड जाणार नाही.
आदित्यच्या मुक्कामाचे ठिकाण पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटरवर असेल. चंद्राचे तीन लाख ८५ हजार किलोमीटर अंतर विचारात घेतले तर हे अंतर चौपट-पाचपट वाटेल; पण सूर्याच्या एकूण अंतरापैकी हे १५ लाख किलोमीटर म्हणजे जेमतेम एक टक्का आहे. कारण, आपण सूर्यापासून तब्बल १५० दशलक्ष अर्थात १५ कोटी किलोमीटर अंतरावर आहोत. पृथ्वीचे अस्तित्वच मुळी सूर्यावर अवलंबून आहे. सूर्य हीच सर्वार्थाने पृथ्वी व संपूर्ण सूर्यमालेची ऊर्जा आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टी, हवामान, पाणी सारे काही आहे ते सूर्यापासून मिळणारी ऊर्जा, उष्णता, प्रकाश यामुळेच. १५ कोटी किलोमीटर अंतर पार करून पृथ्वीवर पोहोचायला सूर्यकिरणांना आठ मिनिटे १९ सेकंद लागतात. जीवसृष्टीची बिजे घेऊन येणारी ही किरणे किंवा अवकाशातील अतिनील सूर्यकिरणांपासून बचाव करणाऱ्या ओझोन थरासह सारे काही सूर्याने सजीवांवर केलेले उपकार आहेत. परिणामी, प्राचीन ते अर्वाचीन अशा सर्व मानवी संस्कृतींना सूर्याचे आकर्षण राहिले. सूर्य हा धर्म आणि विज्ञानाचा आधार राहिला.
अंतराळ विज्ञानाचा विचार करता अमेरिकेच्या नासाने १९५० च्या दशकाच्या अखेरीस पायाेनियर यानांच्या मालिकेद्वारे सूर्याचा अभ्यास सुरू केला. पायोनियर-९ हे यान तर अगदी मे १९८३ पर्यंत सूर्यनिरीक्षणाची माहिती पृथ्वीवर पाठवत राहिले. त्यानंतरही नासा सूर्याकडे यान पाठवत राहिली. ऑगस्ट २०१८ मध्ये सूर्याकडे झेपावलेल्या नासाच्या पार्कर सोलार प्रोबने तर डिसेंबर २०२१ मध्ये चमत्कार घडवला. त्याने चक्क सूर्याभोवतीच्या कोरोना आवरणातून प्रवास केला. चमत्कार यासाठी की, सूर्याचा पृष्ठभाग फोटोस्फिअरपेक्षा कोरोनातील तापमान कितीतरी अधिक असते. जवळपास ७५ टक्के हायड्रोजन व २४ टक्के हेलियम वायूंचा धगधगता गोल असे सूर्याचे स्वरूप आहे. कोअर या अंतर्भागातील तापमान १५ मिलियन डिग्री सेल्सिअस इतके प्रचंड आहे. त्यातून न्यूक्लीअर फ्युजन घडते.
फोटोस्फिअर हा सूर्याचा पृष्ठभाग. तो कोअरच्या मानाने थंड आहे. तिथले तापमान ५५०० डिग्री सेल्सिअसपर्यंत उतरते. त्यानंतर चारशे ते एकवीसशे किलोमीटर जाडीचे क्रोमोस्फिअर हे आवरण आहे आणि त्यानंतर आहे कोरोना हे अतितप्त आवरण. तिथले तापमान पुन्हा अगदी एक दशलक्ष डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढते. भारताच्या आदित्य एल-१ यानाची मुख्य जबाबदारी कोरोना आवरणाचा अभ्यास ही असेल. अर्थात, दुरूनच. पार्करने मात्र त्यातून सूर मारला होता. सूर्याच्या अभ्यासात नंतर जपान, युरोपियन स्पेस एजन्सी-इसा, तसेच चीनने उडी घेतली. अनेक मोहिमा राबवल्या गेल्या. या रांगेत आता भारतही विराजमान होईल.
आदित्य नावाला पौराणिक संदर्भ असल्याचे सगळे जाणतातच. कश्यप ऋषींची पहिली पत्नी आदितीचा पुत्र म्हणजे आदित्य. भारतीय पुराणात त्याच्या ११ भावांचा उल्लेख आहे. या १२ बंधूंच्या समूहालाही आदित्य म्हणतात. अर्थात हे सौरवर्षाचे बारा महिने. आपणच नव्हे तर अगदी चीन, जपाननेही अशी मिथकांमधील नावे त्यांच्या मोहिमांना दिली. चीनच्या सौरमोहिमेचे नाव आहे ‘क्वाफू.’ आपला हनुमंत जन्मत:च सूर्य गिळायला निघाला होता, तसा चिनी दंतकथेतला क्वाफू पूर्वेकडून पश्चिमेकडे सूर्य धरायला निघाला होता आणि त्या परिश्रमामुळे लागलेली भयंकर तहान भागवायला त्याने यलो व अन्य नद्यांचे पाणी पिऊन टाकले. जपानच्या जाक्सा अंतराळ संस्थेच्या एका माेहिमेचे नाव आहे ‘हिनोतोरी,’ म्हणजे अग्निपक्षी. दुसरे नाव आहे ‘योहकोह’ म्हणजे सूर्यप्रकाश, तर तिसरीचे नाव हिनोड म्हणजे सूर्योदय. त्या नावाचे छोटे शहरदेखील टोकियोजवळ आहे.
सूर्यदेवाच्या रथाला सात घोडे जुंपल्याचे आपण मानतो. म्हणजे आठवड्याचे सात दिवस. योगायोग असा की, ‘आदित्य एल-१’ मोहिमेत सूर्यनिरीक्षणासाठी जाणाऱ्या यानावरही सात उपकरणे आहेत. सूर्यापासून सतत उत्सर्जित होणारी ऊर्जा, विशेषत: कोरोना मास इजेक्शन, सौर वारे, सौरकण, किरणोत्सर्ग, चुंबकीय लहरी, आदींचा ही उपकरणे अभ्यास करतील. व्हिजिबल इमिशन लाइव्ह कोरोनाग्राफ (व्हीईसीसी), सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप (एसयूआयटी), आदित्य सोलार विंड पार्टिकल एक्स्पेरिमेंट (एएसपीईएक्स) आणि प्लाझ्मा अनॅलिसिस पॅकेज फॉर आदित्य (पापा) या चार उपकरणांच्या नावातच त्यांचे उद्देश स्पष्ट आहेत. याशिवाय सोलार लो-एनर्जी तसेच हाय-एनर्जी एक्सरे स्पेक्ट्रोमीटर्स आणि मॅग्नेटोमीटरद्वारे इन-सितू म्हणजे प्रत्यक्ष एल-१ टापूत मिळणाऱ्या नोंदी पृथ्वीवर पाठवल्या जातील.