मूल दत्तक घेणे म्हणजे मॉलमधून बाहुली आणणे नव्हे!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 11:48 AM2022-11-29T11:48:42+5:302022-11-29T11:49:50+5:30
मूल दत्तक घेताना फार विलंब होताे, त्यासंदर्भातली प्रक्रिया आतिशय किचकट आहे, अशी तक्रार बऱ्याचदा होते; पण त्यामागचा विचार समजून घेणेही खूप महत्त्वाचे आहे.
अतुल देसाई
मूल दत्तक घेतानाची प्रक्रिया फार किचकट असल्याबद्दल अनेकजण तक्रार करतात. त्यात काही प्रमाणात तथ्य असले तरी यामागे मुलाच्या भवितव्याचा विचार केलेला असतो. संस्थांतून वाढत असलेल्या बाळाचे पालक शासन असते. त्यामुळे त्याच्या भवितव्याबद्दल निर्णय होताना चुकीचे काही घडू नये याची काळजी प्रत्येक टप्प्यावर घेतली जाते. दत्तक प्रक्रियेतून महाराष्ट्र व देशातही यापूर्वी अनेक चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत. संस्था पैसे घेऊन मुले चक्क विकत होत्या. जास्त पैसे मिळतात म्हणून विदेशात मुले दत्तक देण्याचे प्रमाण जास्त होते. मूल दत्तक देताना आर्थिक निकष महत्त्वाचा असला तरी पैसे असतील त्यालाच बाळ मिळेल हा व्यवहारही चुकीचा होता. त्यामुळे गरिबांना मूल मिळायचे नाही. असे अनेक अनुभव आल्यानंतरच केंद्र व राज्य शासनाने ही प्रक्रिया पारदर्शी होण्याकडे लक्ष दिले. त्यातूनच ‘कारा’कडील ऑनलाइन नोंदणी सुरू झाली. त्यामुळे यातील गैरप्रकारांना चांगला पायबंद बसला आहे. मूल दत्तक घेण्याचा निर्णय पालकांनी निव्वळ भावनाशील होऊन घेऊ नये. त्यामागे जबाबदारीचाही विचार तितकाच महत्त्वाचा आहे. मूल दत्तक घेणे म्हणजे मॉलमध्ये जाऊन बाहुली विकत आणणे नव्हे. ही मनामनाशी जोडलेली प्रक्रिया आहे. त्यात दत्तक घेतल्या जाणाऱ्या मुलाच्या भवितव्यास सर्वोच्च महत्व दिले जाते. पुढील आयुष्यात त्याच्या वाट्याला काटे येऊ नयेत यासाठी शक्य ती सगळी काळजी सरकार याप्रक्रियेत घेते. त्यामुळे उशीर होतो, पण पालक व मुलाच्या भल्याचाच विचार यात आहे. जे लोक ही प्रक्रिया किचकट आहे, असे म्हणतात त्यांनी आपल्या स्वत:च्या आयुष्यातही विवाह, बाळाला जन्म देणे किंवा साधे छोटेसे घर बांधायचे ठरवले तरीही त्यासाठी तो विचार मनात आल्यापासून दीड-दोन वर्षे सहज जातात हे लक्षात घ्यायला हवे. इथे तर एक आयुष्य बदलण्याची प्रक्रिया आहे. .
मूल दत्तक देताना महत्त्वाचे काही टप्पे आहेत. त्यामध्ये नोंदणी प्रक्रिया, पालकांचे उत्पन्न, आरोग्य, रहिवास, लग्नाचे प्रमाणपत्र व जन्मदाखला ही कागदपत्रे लागतात. नोंदणीवेळीच आपल्याला किती वयाचे व साधारणत: बाळाबद्दलच्या अपेक्षा विचारून घेतल्या जातात. त्या अपेक्षेनुसार बाळ उपलब्ध झाले की ‘कारा’ त्या संस्थेला व पालकांनाही ही माहिती कळवते. बाळाचा फोटो पाहून तुम्ही प्रतिसाद दिल्यावर ज्या संस्थेतील हे बाळ असेल त्या संस्थेशी पुढील प्रक्रिया सुरू होते. संस्थेकडून गृहभेट दिली जाते. पालक नोकरदार असतील तर बाळाला सांभाळण्यासाठी कुटुंबात कोण कोण आहे हेदेखील पाहिले जाते. ही प्रक्रिया झाल्यानंतरच तुमचे नाव प्रतीक्षायादीत समाविष्ट होते.
बाळ दत्तक घेण्याच्या प्रक्रियेचा एकूण खर्च लाखाच्या आतच आहे. फक्त पालकांनी संयम ठेवून ही प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज आहे. यातील चांगली बाब अशी की आतापर्यंत दत्तक दिलेले बाळ परत येण्याचे प्रमाण फारसे नाहीच. नको असलेल्या संततीबद्दल जागरूकता वाढल्याने आता संस्थांमध्ये येणाऱ्या मुलांचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचवेळेला संस्थांतून बाळ दत्तक घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जास्त काळ प्रतीक्षा करावी लागत आहे. धडधाकट बाळ दत्तक घेण्याकडे समाजाचा कल असतो. त्यामुळे अंध-अपंग मुलांना पालकांची प्रतीक्षा असते. यापुढील काळात या मुलांनाही हक्काचे मायबाप मिळायला हवेत. शासनानेही मूल दत्तक दिले म्हणजे आपली जबाबदारी संपली असे न मानता त्या बाळाचे पूर्णत: पुनर्वसन होईपर्यंत त्याच्या पाठीशी राहिले पाहिजे.
(लेखक बालहक्क कार्यकर्ते, कोल्हापूर आहेत)
(उत्तरार्ध)
शब्दांकन- : विश्वास पाटील, लोकमत, कोल्हापूर
(काही अपरिहार्य कारणास्तव आजच्या अंकात ‘यथार्थ’ हे सदर प्रसिद्ध होऊ शकले नाही.)