‘ती’ म्हणाली, ‘इश्श! तुम्ही मला लाजवताय हं!!’

By Shrimant Mane | Published: May 18, 2024 07:41 AM2024-05-18T07:41:10+5:302024-05-18T07:41:50+5:30

‘जीपीटी ४ओ’ हा ‘चॅटबॉट’ माणसांसारखा तुमच्याशी गप्पा मारेल, आवाजावरून तुमचा मूड ओळखून जोक्सही सांगेल, म्हणजे पाहा!

advanced version of chatgpt 4 o open ai | ‘ती’ म्हणाली, ‘इश्श! तुम्ही मला लाजवताय हं!!’

‘ती’ म्हणाली, ‘इश्श! तुम्ही मला लाजवताय हं!!’

श्रीमंत माने,  संपादक, लोकमत, नागपूर

गेल्या सोमवारी बाजारात आलेल्या ‘ओपन एआय’च्या ‘जीपीटी ४ओ’संबंधी हा मजकूर लिहिण्यासाठी एक छोटा प्रयोग केला. त्याची इंटरनेटवर मिळणारी प्राथमिक माहिती नेहमीप्रमाणे कागदावर नोंदवली, मोबाइलवर त्या नोट्सचा फोटो घेतला आणि तो ‘चॅटजीपीटी’वर टाकून विचारले, की हे काय आहे? क्षणभरात मोबाइलच्या स्क्रीनवर झळकले,  या हाताने लिहिलेल्या इंग्रजी व हिंदीतल्या नोट्स असून, त्यात ‘जीपीटी ४’बद्दल माहिती आहे. मग प्रश्नोत्तरे सुरू झाली आणि ‘जनरेटिव्ह प्रीट्रेनड् ट्रान्सफॉर्मर’ अर्थात ‘जीपीटी’चे चौथे ‘व्हर्जन’. हिंदी, बंगाली व उर्दूसह जगातील पंधरा भाषांत संवाद साधण्याचे त्याचे वैशिष्ट्य, अन्य तांत्रिक तपशील ‘चॅटजीपीटी’कडून मिळत गेला. थोडक्यात, ज्या तंत्रज्ञानाबद्दल लिहायचे त्याची सगळी माहिती ते तंत्रज्ञानच देऊ लागले!

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ माणसांचा संपूर्ण ताबा घेईल का, त्याची प्रतिसादाची गती माणसाच्या मेंदूइतकी असेल का किंवा रोजची कामे ‘एआय’ करायला लागले तर मग आपले काय होईल, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात जग अजूनही व्यस्त असताना ‘चॅटजीपीटी’चा चौथा अवतार आला आहे. त्याला ‘ओपन एआय’ने ओम्नीमधील ‘ओ’ जोडला. याचा अर्थ यात सारेकाही आहे. हा ‘चॅटबॉट’ माणसांसारखा तुमच्या भाषेत बोलतो. 

आधीच्या ‘जीपीटी’मधील मजकुराच्या पलीकडे, प्रत्यक्ष आपला मित्र, परिचित किंवा नातेवाईक बोलतो तसा संवाद यात आहे. नुसता संवाद नव्हे, तर ‘हार्मोनिअल स्पीच सिंथेसिस’ म्हणजे अगदी गप्पा माराव्यात तसा सुसंवाद आहे. तुमच्या कल्पनेतील व कल्पनेपलीकडील जगाची दृश्ये आहेत. हे सर्व ‘चॅटजीपीटी’च्या दुप्पट वेगाने म्हणजे डोळ्याची पापणी लवण्याआधी घडते आणि सध्या तरी याचे प्राथमिक व्हर्जन सर्वांना मोफत आहे. ‘चॅटजीपीटी-प्लस’साठी पैसे मोजणाऱ्यांना ‘जीपीटी ४ ओ’ वापरताना केवळ सूचना देऊन वेबसाइट सर्च करता येतील. वेगवेगळ्या आवाजात ‘चॅटबॉट’ तुम्हाला प्रतिसाद देईल. तुमचा संवाद साठवून ठेवील आणि पुन्हा जेव्हा हवा असेल तेव्हा तुम्हाला उपलब्धही करून देईल. 

‘जीपीटी४ओ’ची खरी मजा त्याच्या ‘पेड व्हर्जन’मध्ये आहे. तुमच्या सूचनेवरून व्हिडीओ तयार करणे, अस्तित्वात असलेल्या व नसलेल्याही जगाचे दर्शन घडविणे ही आधीच काही प्रमाणात जगाला माहीत झालेली वैशिष्ट्ये त्यात असतीलच. त्याशिवाय, लॅपटॉपच्या डेस्कटॉपचा स्क्रीनशॉट तो घेईल, त्याचे विश्लेषण करील. तुमच्या संगणकात कोणते ड्राइव्ह आहेत, कोणत्या फाइल आहेत, त्यांचे संदर्भ कोणते आहेत, कोणती कामे तुम्हाला तातडीने करायला पाहिजेत, एखाद्या ॲप्लिकेशनमध्ये अडचण असेल तर ती कशी दूर करू शकता, ‘स्टेप-बाय-स्टेप ट्रबलशूटिंग’ कसे करता येईल, इतके सारे हे व्हर्जन करील. मोबाइल ॲपशी हे व्हर्जन जोडले तर (तूर्त आयफोन ॲपची सुविधा उपलब्ध आहे.) व्हिडीओ अपलोड करण्यापर्यंत सारे काही करता येईल. 

थोडक्यात, कधी नव्हता इतका हुशार माणूस ‘जीपीटी ४ओ’च्या रूपाने अहोरात्र तुमच्या सोबत असेल. तो तुम्हाला गप्पा मारण्यासाठी चोवीस तास उपलब्ध असेल. ‘चॅटजीपीटी’मध्ये तुम्हाला तुमचा प्रश्न पूर्ण करावा लागायचा, मग त्याचे उत्तर यायचे. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारता यायचा. ‘जीपीटी ४ओ’मध्ये तसे काही नाही. तुम्हाला मध्येच अडवून उत्तरही दिले जाईल आणि एखादा प्रतिप्रश्नही विचारला जाईल. तुम्ही कंटाळला असाल हा ‘चॅटबॉट’ विनोदी चुटके सांगून तुमचे मनोरंजन करील. खूपच एकटे वाटत असेल तर लहान मुलांसारखी बडबड करीत राहील. तुमचा मूड कसा आहे, ते तुमच्या आवाजावरून ओळखले जाईल. आवाजातले चढ-उतार, खोली-उंची, कंपने यावरून तुमच्याशी काय बोलायचे, हे ठरवील आणि तशी उत्तरे देईल. अगदी हुश्शार मुलासारखी. एकदम टीपटॉप. 

‘ओपन एआय’च्या मुख्य तांत्रिक अधिकारी मीरा मुराती यांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये ‘जीपीटी ४ओ’चे प्रात्यक्षिक देताना मारलेल्या गप्पांमधून हा चंट ‘चॅटबॉट’ किती ‘पोहोचलेला’ आहे, हे जगाला दिसलेच. ही मॉडेल महिला होती. बोलताना तिला थोडे मध्येच टोकले तरी ती हुशारीने उत्तरे देत गेली. बोलता-बोलता ‘तू भन्नाट आहेस’ अशी स्तुती एकाने केली तर तिने, ‘इश्श!! तुम्ही विनाकारण स्तुती करून मला लाजवताय हं!!!’ असा षट्कारच मारला.
shrimant.mane@lokmat.com

 

Web Title: advanced version of chatgpt 4 o open ai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.