देशाचे उपपंतप्रधानपद व गृहमंत्रिपद भूषविणारे दयनीय अडवाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:43 PM2017-12-29T23:43:34+5:302017-12-29T23:43:48+5:30
सत्तेतली पदे गेली की मोठी माणसेही किती अगतिक आणि लाचार होतात याचे लालकृष्ण अडवाणींएवढे मोठे वा लहान उदाहरण दुसरे नाही. परवा अहमदाबादला झालेल्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या सोहळ्यात दिसलेले त्यांचे चित्र कमालीचे दयनीय व दीनवाणे होते.
सत्तेतली पदे गेली की मोठी माणसेही किती अगतिक आणि लाचार होतात याचे लालकृष्ण अडवाणींएवढे मोठे वा लहान उदाहरण दुसरे नाही. परवा अहमदाबादला झालेल्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या सोहळ्यात दिसलेले त्यांचे चित्र कमालीचे दयनीय व दीनवाणे होते. एकेकाळी भाजपाचे अध्यक्षपद भूषविलेला आणि आपल्या सोमनाथ ते अयोध्या या रथयात्रेने सारा देश ढवळून काढणारा हा नेता आज कोणाच्याही खिजगणतीत नाही. कोणी त्याला विचारत नाहीत, पक्षातील पुढारी त्याच्याकडे पाहत नाहीत आणि संघाच्या नजरेतही ते निकामी झाले आहेत. रथयात्रेच्या काळात अडवाणींचे नाव पंतप्रधानपदासाठी सर्वात पुढे होते. त्यांच्या पत्नी कमलादेवी यांनी त्या काळात ‘भावी पंतप्रधानांची पत्नी म्हणून मला कसे वाटते’ या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरही दिले होते. पुढच्या काळात अडवाणींनी वाजपेयींचे नाव पुढे करून मनाचा मोठेपणा दाखविला. वाजपेयी पंतप्रधान आणि अडवाणी उपपंतप्रधान झाले. मात्र २००४ च्या निवडणुका त्यांच्या पक्षाला जिंकता आल्या नाहीत आणि त्यांना विरोधात बसावे लागले. विरोधी नेते म्हणूनही त्यांनी अतिशय आक्रमक भूमिका बजावली. मात्र २००९ च्या निवडणुकीत त्यांना पुन: पराभव पहावा लागला. येथून त्यांचे ग्रह फिरले. प्रथम संघाने त्यांना पक्षाध्यक्षपद सोडायला लावून त्यांच्याजागी नितीन गडकरी यांची नियुक्ती केली. लोकसभेतील त्यांचे विरोधी पक्ष नेतेपदही पक्षाने काढले व ते सुषमा स्वराज यांना दिले. पुढे गडकरी पायउतार झाल्यानंतरही संघाने अडवाणींचा विचार केला नाही. त्याने ते पद राजनाथसिंगांना दिले. २०१४ ची निवडणूक ही त्यांची अखेरची संधी होती. पण ती त्यांच्याकडून मोदींनी हिरावली. या निवडणुकीत अडवाणींना भोपाळमधून लोकसभेवर निवडून जायचे होते परंतु मोदींनी त्यांना अहमदाबादेत बांधून ठेवले. नंतरच्या काळात त्यांची नुसती उपेक्षाच झाली. त्यांना राष्टÑपतिपद नाकारले गेले. पक्षात ज्याचा सल्ला घेतला जात नाही अशा एका सल्लागार किंवा मार्गदर्शक मंडळावर त्यांची नियुक्ती झाली आणि आता तर त्यांचा सल्ला कोणी घेतही नाही. त्यांना कोणी भेटत नाही आणि त्यांनाही कुणाला बहुधा भेटावेसे वाटत नाही. आपले नाव व जुने नेतृत्व याची ओळख टिकवायला ते कोणत्या ना कोणत्या समारंभात दिसतात. मात्र त्यातही त्यांची कोणी वास्तपुस्त करताना दिसत नाही. मध्यंतरी राहुल गांधींनी त्यांच्याशी विमानतळावर चर्चा केली तेव्हा त्याच्या विपर्यस्त बातम्याच तेवढ्या भाजपाच्या माध्यमांनी प्रकाशित केल्या. तेव्हापासूून विपक्ष नाही आणि स्वपक्षही नाही. अडवाणी एकटे आहेत. देशाचे राजकारण दीर्घकाळपर्यंत करणारा, त्यात मध्यवर्ती म्हणावी अशी भूमिका बजावणारा, देशाचे उपपंतप्रधानपद व गृहमंत्रिपद भूषविणारा आणि आता सर्वच पक्षांना समान आदरणीय वाटणारा हा नेता सध्या कुठे दिसला तरी दयनीय वाटावा अशी त्याची स्थिती आहे. सत्ता ही एक अविश्वसनीय आणि कृतघ्न अशी बाब आहे. ती नव्यांचा आदर जेवढ्या जोरात करते तेवढ्याच जोरात ती जुन्यांना विसरते. अडवाणींच्या वाट्याला सत्तेचे हे कृतघ्नपण आले आहे. त्यांनी आत्मचरित्र लिहिले. पण ते गाजले नाही. त्यातल्या चुकीच्या बाबींचीच चर्चा फार झाली. त्यातून मोदींच्या सरकारने त्यांना अयोध्या प्रकरणात आरोपींच्या रांगेत उभे केले आहे. तो खटला दीर्घकाळ चालेल आणि त्याचा निकाल आरोपींच्या बाजूनेच दिला जाईल हे उघड आहे. पण देशाचा राष्टÑीय राहिलेला नेता त्याच्या अखेरच्या काळात ‘आरोपी’ म्हणून उभा असलेला दिसावा, साºयांनी त्याची उपेक्षा करावी आणि हे सारे त्याला मुकाटपणे सहन करताना पहावे लागावे ही स्थितीच कमालीची वेदनादायक आहे. त्यांच्या चाहत्यांना ती जेवढी दु:खदायी तेवढीच त्यांच्या विरोधकांनाही खिन्न करणारी आहे.