डोंगरावरचे आचरट साहस आणि मूर्ख अपघात; खरंच, आपलं डोकं ठिकाणावर आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 06:06 AM2022-02-15T06:06:13+5:302022-02-15T06:06:29+5:30

अननुभवी, नवशिक्या मंडळींचं मूर्ख दुःसाहस अंगाशी येऊन गिर्यारोहणात सातत्याने अपघात घडत आहेत. या बेजबाबदारपणाचे काय करायचे?

Adventure and foolish accident on the mountain; What to do with this irresponsibility? | डोंगरावरचे आचरट साहस आणि मूर्ख अपघात; खरंच, आपलं डोकं ठिकाणावर आहे?

डोंगरावरचे आचरट साहस आणि मूर्ख अपघात; खरंच, आपलं डोकं ठिकाणावर आहे?

Next

वसंत वसंत लिमये

ख्यातनाम लेखक, ज्येष्ठ गिर्यारोहक

बुधवार, २ फेब्रुवारी २०२२ - मनमाडजवळील हाडबीच्या शेंडीवरून पडून, नगरच्या अनिल वाघ आणि मयुर म्हस्के या दोन गिर्यारोहकांचा मृत्यू!
५ फेब्रुवारी २०२२ - कर्जत परिसरातील ढाक बहिरीच्या गुहेपाशी मोळीच्या वाटेवरून घसरून, दरीत कोसळून औरंगाबादच्या प्रतीकचा मृत्यू. 
८ फेब्रुवारी २०२२ - केरळातील चेराडू येथील कुरुम्बाची डोंगरावर अडकलेल्या बाबू या २३ वर्षीय तरुणाची आर्मीच्या मदतीने ४५ तासांनंतर सुटका. 

एकाच आठवड्यात तीन भयानक, धक्कादायक बातम्या! कुठलाही अपघात क्लेशदायक, दुःखद असतोच. परंतु हे अपघात जेव्हा हकनाक घडतात तेव्हा वाईट वाटतं, चिडचिड होते. पहिल्या अपघातात अनुभव असूनही निष्काळजीपणा भोवला तर इतर दोन अपघातात अननुभवी, नवशिक्या मंडळींचं मूर्ख दुःसाहस अंगाशी आलं. महाराष्ट्रातील स्वयंसेवी रेस्क्यू पथकांनी खूप कष्ट घेऊन दोन्ही ठिकाणचे मृतदेह आणि जखमींना बाहेर काढलं. तिसऱ्या प्रसंगात एकंदर ४५ तास, सुमारे ४५ माणसं, तीसुध्दा आर्मीची, बंगळुरू आणि वेलिंग्टन येथून तातडीनं आलेली, याशिवाय हेलिकॉप्टरच्या अनेक खेपा आणि स्थानिक प्रशासनाचा प्रचंड वेळ यासाठी खर्च झाला.

माध्यमांसाठी ‘ब्रेकिंग न्यूज’, गिरीभ्रमण आणि गिर्यारोहण क्षेत्राला लागलेला बट्टा आणि काही जणांच्या मूर्खपणासाठी मोजावी लागलेली केवढी ही किंमत!  महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर रीतसर गिरीभ्रमण, गिर्यारोहण याची सुरूवात सुमारे ७० वर्षांपूर्वी झाली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गिरीभ्रमण, गिर्यारोहण यात अनुभव, प्रशिक्षण, चांगली साधनसामग्री आणि मार्गदर्शनाची नितांत गरज असते. जुन्या काळात  एक प्रकारची गुरु-शिष्य परंपरा असे. ज्येष्ठ, अनुभवी सदस्य नवशिक्यांना योग्य ते मार्गदर्शन करत असत. या काळात  चांगले दोर, उपकरणं, शूज अशा गोष्टी नसूनदेखील सुरक्षिततेचं व्यवस्थित भान होतं. अपघातही क्वचितच घडत असतं. 

गेल्या तीन दशकात इंटरनेट आणि समाजमाध्यमं यामुळे माहितीचा विस्फोट झाला. तुलनेनं लोकांची क्रयशक्ती, ऐपत अनेक पटींनी वाढली. साहजिकच साहसी उपक्रमांची लोकप्रियता अफाट वाढली, परंतु सुरक्षिततेचं भान मात्र झपाट्यानं लयास गेलं. एका अर्थानं सह्याद्रीतील किल्ले ही पवित्र धारातीर्थे आहेत. लोक घराबाहेर पडून, खूप संख्येनं निसर्गाकडे आकृष्ट होत आहेत आणि साहसी उपक्रम लोकप्रिय होत आहेत, याचा एकीकडे आनंद आहे. परंतु या सर्वच प्रकारात शिरलेला चंगळवाद भयावह आहे. उग्र - भयंकर, विविध ऋतूतील सह्याद्रीची मनोहारी रूपं आणि त्याच्याच अंगाखांद्यावरील साहसी चढाया हे थरारक, अफाट आनंददायी आणि उल्हसित करणारं आहे. नीरव शांततेत मंत्रमुग्ध करणारा कोकणकड्यावरील सूर्यास्त, ढाक बहिरीच्या गुहेत पावसाच्या संततधारेत टाळ आणि ढोलकीच्या तालावर रंगलेलं भजन हे आजकाल दूरस्थ आणि स्वप्नवत वाटतं. याचं कारण म्हणजे राजमाची किल्ल्यावरील ५/६ हजारांचा जमाव, कोकणकड्यावर बोकाळलेल्या असंख्य टपऱ्या आणि हडसर, कलावंतीण येथील बेताल, हजार - दोन हजाराची कीड मुंग्यांसारखी गर्दी! कुठल्याही क्षेत्रात लोकप्रियता वाढू लागली की, संख्या वाढतेच. जाणाऱ्यांची संख्या वाढली की, त्याचं व्यापारीकरण स्वाभाविक, साहजिकच ट्रेक, चढाया, कॅम्पिंग असे विविध उपक्रम पैसे घेऊन विविध आयोजकांकडून राबवले जातात.

पैसे घेणे, व्यापारीकरण म्हणजे पाप नव्हे. पण त्याचबरोबर अशा आयोजनातील कुशलतेचा, व्यावसायिकतेचा अभाव चिंताजनक आहे. लोकप्रियता कमी करणं आता शक्य नाही. परंतु अशा उपक्रमांचं काटेकोरपणे नियमन करणं अत्यावश्यक आहे. पर्यटन, त्याच्या अनुषंगाने येणारा स्थानिक रोजगार अशा गोष्टींची वाढ झाली आहे. परंतु त्याचबरोबर गडकिल्ल्यांवरील वाढणारा प्लास्टिक आणि रिकाम्या बाटल्यांचा कचरा, पर्यावरणाची होणारी अपरिवर्तनीय हानी आणि ऐतिहासिक वास्तूंची विटंबना अतोनात वाढली आहे. कठोर नियमनापासून सुरुवात करून कालांतराने स्वनियमनाकडे जाता येईल, असा पाश्चिमात्त्य देशातील दाखला आपल्या समोर आहे.

या गर्दीत फारच थोडे प्रामाणिक गिरीभ्रमण करणारे, गिर्यारोहक आणि इतिहासप्रेमी असतात. बहुतांश लोक ‘मज्जा’ करण्यासाठी आलेले असतात. ‘आमची ऐपत आहे!’ याचा एक विशेष माज यांच्या वागण्यात दिसून येतो. आजकाल फोटोग्राफी तंत्रज्ञान अफाट सुधारलं आहे आणि यामुळेच निसर्गाचे थरारक, देखणे फोटो , विविध ट्रेक, सहली यांची रसभरीत, काही वेळेस अतिरंजित वर्णनं, साहसी उपक्रम आयोजकांच्या अवास्तव जाहिरातींची आतषबाजी यांच्या गदारोळात साहसी उपक्रमातील गांभीर्य आणि सुरक्षितता याचा आपल्याला पूर्णपणे विसर पडला आहे. स्वतःचा जीव एवढा स्वस्त आहे का? 

या सर्व अनुभवातील निखळ आनंद, इतिहास आणि निसर्ग यांच्याबद्दलचा आदर आणि अथक प्रयत्नांनंतर गवसणारा साहसी उपक्रमातील पराक्रमी थरार याचे संस्कार पूर्वी पंडित महादेवशास्त्री जोशी, आप्पा दांडेकर, बाबासाहेब पुरंदरे, हरीश कापडिया, घाणेकर, पाळंदे यांच्या लेखनातून, भाषणातून गवसत असत. आजकाल इंटरनेट नावाच्या राक्षसामुळे हे सारं सहजपणे उपलब्ध आहे. पण वापरतात फारच थोडे. चंगळवादाचं भूत डोक्यात घेऊन फिरणारा कुठल्याही अभ्यासाच्या फंदात सहसा पडत नाही. आयोजक व्यापारी नफ्याच्या मोहापायी सहभागींना कुठलंही प्रशिक्षण, धोक्यांबद्दलची माहिती आणि स्थळांचं महात्म्य याबद्दल हात राखून सांगतात. अनुभवातील निखळ आनंदापेक्षा ‘मी तिथे होतो’ याची जाहिरात आणि फुशारकी मारणं अधिक महत्त्वाचं झालं आहे. अनुभव आणि प्रशिक्षणाचा अभाव, उत्कृष्ट साधनसामग्री आणि तंत्र उपलब्ध असूनही ती न वापरता केला जाणारा आचरटपणा हे मूर्ख अपघातांना दिलेलं आमंत्रण आहे. गर्दीचं विकेंद्रीकरण, समाजमाध्यमांचा योग्य वापर, शासन आणि जाणकारांनी कठोरपणे केलेलं नियमन हाच यावरील एकमेव उपाय आहे. पण तरीही विचारावंसं वाटतं. खरंच, आपलं डोकं ठिकाणावर आहे?

Web Title: Adventure and foolish accident on the mountain; What to do with this irresponsibility?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.