अनोळखी माणसांशी संवाद अन् घरात वाद; सोशल मीडियाचा असाही साईड इफेक्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 03:54 PM2019-04-15T15:54:17+5:302019-04-15T16:21:18+5:30
वाद कोणताही असो, संवादानेच त्यावर तोडगा निघतो.
- विनायक पात्रुडकर
वाद कोणताही असो, संवादानेच त्यावर तोडगा निघतो. हाणामारी करून, एकमेकांवर आरोप करून किंवा एकमेकांचा बळी घेऊन प्रश्न कधीच सुटत नाही. विवाह तुटू नये म्हणूनदेखील पती-पत्नींला संवाद साधण्याचा सल्ला देतात. अपुऱ्या संवादामुळे विवाह टिकत नाही. अगदी एकमेकांचा जीव घेण्याचे धाडस केले जाते. असेच एक प्रकरण नुकतेच मुंबईत घडले आहे. पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होता. हा वाद इतका विकोपाला गेला की पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. पत्नीची हत्या केल्यानंतर पती स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन शरण झाला. आमच्यात वाद झाला. त्यानंतर मी झोपलो. पण पत्नी सोशल मिडियावर व्यस्त होती. त्यामुळे मी तिची हत्या केली, असे पतीने पोलिसांना सांगितले.
सोशल मिडियामुळे अभिव्यक्ति स्वातंत्र्याला मोकळीक मिळली आहे. आपल्याकडे कुटुंब सदस्यांशी बोलायला वेळ नसतो. पण सोशल मिडियावर आपण सतत अॅक्टिव असतो. आपला आपल्याच माणसांसोबतच संवाद संपत चालला आहे. आपण अनोळखी माणसे जोडतो, पण रक्ताची नाती सहज लांब करतो. त्यातूनच असे प्रकार घडतात. अपुऱ्या संवादाचा बळी केवळ पती-पत्नीतच घेतला जातो असे नाही. भाऊ, बहीण, आई, वडील, मुलगा, मुलगी, मित्र, अशा जीवनातील प्रत्येक नात्यात अशा संवादाचा बळी जात असतो. त्यात प्रत्येक वेळी माणूस संपवला जातो, असे काही नाही. वर्षानुवर्षे एकमेकांशी न बोलणे, बघून पण तोंड फिरवणे, एकमेकांवर टीका करणे, हे सर्व प्रकार नाती संपवण्याचाच एक भाग आहेत. त्यामुळे एखादी घटना घडल्यानंतर तरी त्यातून आपण बोध घ्यायला हवा. ही घटना का घडली, त्यामागचा हेतू काय होता, या सर्वाचा पोलीस तपास करतीलच. पण प्राथमिक कारण तर पती-पत्नीमधील वाद हेच आहे.
वाद का होतात? त्याची कारणे काय? याचा तरी विचार आपण करायला हवा. कोणी तरी माघार घ्यायला हवी. माघार घेतल्याने प्रश्न सुटू शकतो. पण मग आत्मसन्मानाचा मुद्दा येतो. हे सर्व बाजूला ठेवून नाते टिकवणे, हा एकमेव उद्देश ठेवला तर नक्कीच वाद होणार नाहीत. सरतेशेवटी सुखी आयुष्याचे सूत्र वादामध्ये कधीच सापडणार नाही. तेव्हा सोशल मीडियावर अॅक्टिव राहण्यापेक्षा आपण नात्यांमध्ये प्रत्यक्ष अॅक्टिव राहिला, तर नक्कीच आयुष्य सुखी होईल. अन्यथा माणूस संपवायला वेळ लागत नाही. मात्र त्याचा पश्चाताप आयुष्यभराचा असतो.