अफगाणी तालिबान्यांंची डोनाल्ड ट्रम्प यांनाच तंबी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 05:32 AM2019-10-03T05:32:54+5:302019-10-03T05:33:28+5:30

काबुलमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि तालिबानमध्ये शाब्दिक युद्धाचा ज्वर वाढतच गेला; आणि तालिबानने नुकतीच ट्रम्पनाच तंबी दिली.

Afghan Taliban blames Donald Trump | अफगाणी तालिबान्यांंची डोनाल्ड ट्रम्प यांनाच तंबी

अफगाणी तालिबान्यांंची डोनाल्ड ट्रम्प यांनाच तंबी

Next

- डॉ. सुभाष देसाई
(आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक)

काबुलमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि तालिबानमध्ये शाब्दिक युद्धाचा ज्वर वाढतच गेला; आणि तालिबानने नुकतीच ट्रम्पनाच तंबी दिली. अमेरिकेच्या या बड्या नेत्यालाही समजण्यात अपयश आले आहे की कोणत्या प्रकारच्या देशाशी ते सामना करीत आहेत, असे तालिबानने म्हटले आहे. ९/११ च्या स्मृती समारंभात भाषण करताना डोनाल्ड ट्रम्प अमेरिकन सैन्यासमोर म्हणाले की, ‘आमच्या सैन्याने आमच्या शत्रूवर असे आघात केले आहेत की यापूर्वी इतके घातक हल्ले कधीही झाले नव्हते. ते यापुढेही चालू राहतील.’
ट्रम्प यांच्या या विधानांमुळे अमेरिका व तालिबान यांच्यातील शांती चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. तालिबान गोटामध्ये ट्रम्प यांच्याबद्दल कडवट प्रतिक्रि या व्यक्त होत आहेत. जागतिक राजकीय तज्ज्ञांच्या मते ट्रम्प यांनी असे तालिबानला झोंबणारे उद्गार काढण्याची गरजच नव्हती. तालिबानचा मुजाहिद याने यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, ट्रम्प यांनी यापुढे कोणतेही भाष्य करण्यापूर्वी फार काळजीपूर्वक बोलावे. त्या बोलण्याचा परिणाम काय होईल याचाही गांभीर्याने विचार करावा. त्यांना अजून कोणत्या देशाशी आपण पंगा घेतोय याची जाण नाही. त्यांच्या संरक्षण सल्लागारांनी तरी त्यांना हा विषय समजून सांगायला हवा. अफगाणिस्तान म्हणजे अनेक बड्या नेत्यांची दफनभूमी आहे हे ट्रम्प यांना सविस्तर समजावून सांगा. मात्र इतका कडक इशारा तालिबानने दिल्यानंतरही ट्रम्प यांच्यात काही फरक पडलेला नाही.

अमेरिकेचे पाकिस्तानमध्ये प्रतिनिधी म्हणून काम केलेले लॉरेल मिलर यांनी म्हटले आहे की, मुळातच ट्रम्प यांनी कॅम्प डेव्हिडमध्ये चर्चा करण्याची योजनाच आम्हाला आश्चर्यचकित करणारी होती. तालिबान नेहमीच हल्ले करीत असते. मग गेल्या गुरुवारी काबुलमध्ये हल्ला झाला आणि त्यांनी चर्चा रद्द केली, हा निर्णय अतिशय घाईघाईचा आणि पोरकटपणाचा वाटतो. याच घटनेबाबत डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार टॉम मालिनोवस्की यांनी म्हटले की, अफगाणिस्तानमध्ये आम्ही जी रणनीती वापरतोे ती सर्वांना स्पष्ट करून सांगण्याची गरज आहे. शिवाय तालिबान नेत्यांना कॅम्प डेव्हिडला बोलवण्याचा निर्णयच मुळात विचित्र होता. दरवेळी तालिबानच्या हल्ल्याला ट्रम्प आव्हान देतात. हा आव्हानाचा आणि त्यानंतरच्या चर्चेचा तमाशा आता अमेरिकन अध्यक्षांनी थांबवावा.

नरेंद्र मोदींनी अफगाणिस्तानमध्ये ग्रंथालय सुरू करण्यासाठी आर्थिक मदतीची घोषणा केली होती. त्याची अमेरिकेच्या अध्यक्षांनी खिल्ली उडवली आहे. युद्धाने प्रभावित देशात सैनिक किंवा नागरिक काय तुम्ही दिलेली पुस्तके वाचत असतील, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. असले उद्योग निरर्थक असल्याचे त्यांच्या गळाभेट दोस्ताला सुनावले आहे.

सप्टेंबर महिनाअखेरीस अमेरिका अफगाणिस्तानातून आपले सैन्य मोठ्या संख्येने माघारी बोलवेल, अशी त्यांची अपेक्षा होती. त्याच वेळी तालिबान आपल्या अतिरेक्यांना माघार घेणाऱ्या अमेरिकन सैन्यावर हल्ला करण्यापासून रोखणार होते. या घटनाक्रमापूर्वीच कॅम्प डेविड येथे अमेरिका व तालिबानदरम्यान चर्चेची होणारी बैठक ट्रम्प यांनी उधळून लावली आणि जाहीरही करून टाकले की, ‘अतिरेक्यांशी अशी चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही. तो मार्ग बंद झाला आहे. वेळ निघून गेली आहे.’ एका बड्या आणि बलाढ्य देशाच्या अध्यक्षाला आपल्या विधानांमुळे दोन देशांतील संबंध कसे बिघडतील याचेही भान नसावे, हे आश्चर्यकारक आहे. याचे पडसाद कसे उमटतील याचा विचार त्यांनी केला नाही. मात्र तालिबानमध्ये लगेचच याची प्रतिक्रिया उमटली.

ट्रम्प यांच्या या विधानांनंतर पाठोपाठच तालिबानने आत्मघातकी हल्ला करून चार अमेरिकन सैनिकांचे काबुल येथे बळी घेतले आणि आता हे हल्ले वाढले आहेत. काबुलच्या उत्तरेला तालिबानी अतिरेक्यांनी बॉम्ब भरलेली कार अमेरिकन सैन्याच्या कॅम्पमध्ये घुसवली आणि तेथे स्फोट घडवला. अफगाणकडे ३0 लाख तगडे सैन्य आहे. त्यातील १७ हजार काबुलजवळ आहे. तेच विविध ठिकाणी हल्ले चढवतात. लवकरच अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका होतील. त्या पार्श्वभूमीवर घातपात वाढले आहेत. तालिबानने जाहीर केले की, ‘चर्चा बंद करण्याचे वाईट परिणाम अमेरिकेला लवकरच जाणवतील.’ त्यामुळे युद्ध लवकर थांबेल, असे दिसत नाही.

Web Title: Afghan Taliban blames Donald Trump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.