४० वर्षे न सुटलेला अयोध्येच्या राममंदिराचा वाद निकालात काढायला निघालेल्या बाबानंतर आता सरसावलेले श्री श्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 03:23 AM2017-11-20T03:23:09+5:302017-11-20T03:23:34+5:30
राजकारणाने धर्माचे प्रश्न कधी हाती घेऊ नयेत, तसे धर्माचे म्हणविणा-यांनीही राजकारणाच्या प्रश्नात स्वत:ला गुंतवू नये.
राजकारणाने धर्माचे प्रश्न कधी हाती घेऊ नयेत, तसे धर्माचे म्हणविणा-यांनीही राजकारणाच्या प्रश्नात स्वत:ला गुंतवू नये. प्रत्येक क्षेत्रात त्यातील प्रश्नांची सोडवणूक करणारी कार्यक्षम माणसे असतात. त्यांना त्यांचे काम करू देणे यात शहाणपण आहे. मात्र ज्यांच्याजवळ जास्तीचे व आगाऊ म्हणावे असे शहाणपण असते ती माणसे आपल्या क्षेत्रातील प्रश्नांपाशी थांबत नाहीत. स्वत:ला श्री श्री म्हणवून घेणारे रविशंकर नावाचे महंत गेली ४० वर्षे न सुटलेला अयोध्येच्या राममंदिराचा वाद निकालात काढायला आता पुढे सरसावलेले पाहताना त्यांच्या या जास्तीच्या शहाणपणाचा प्रत्यय त्यांच्या भक्तांएवढाच देशालाही आला आहे. ज्या वादात सरकारे गेली, पक्ष पडले आणि देशात दंगली उसळल्या तो वाद यमुनेची नासधूस करून झाल्यानंतर हे श्री श्री निकालात काढणार असतील तर केंद्र व राज्य सरकारांनी त्यांच्यासमोरचे सारे अवघड प्रश्न त्यांच्या आर्ट लिव्हिंगकडे सोपवून विश्रांती घेणे हेच योग्य ठरावे असे आहे. राम मंदिराचा वाद हा केवळ धार्मिक वा राजकीय नाही. त्यात या दोन्ही बाजू गुंतल्या आहेत आणि त्यांच्या मागे एक इतिहास उभा आहे. हा प्रश्न हिंदू आणि मुसलमान या दोन्ही समाजातील श्रद्धाळू लोकांच्या मानसिकतेचा आहे आणि मानसिकता बदलणे हे दीर्घकालीन कार्य आहे. ते सुदर्शन क्रियेसारखे झटपट उरकायचे काम नव्हे. काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशातील जाटांच्या प्रश्नात मी मध्यस्थी करतो अशी शेखी मिरवायला पतंजलीचे विक्रेते रामदेवबाबा तेथे गेले होते. त्यावेळी हे करण्यापेक्षा तुमची दुकाने चांगली चालवा, असे ऐकवून त्यांना तेथील जनतेनेच हाकलून लावले होते. श्री श्रींच्या वाट्याला असा अपमान अजून आला नाही. मात्र त्यांची दखल कोणी घेत नाही ही गोष्ट त्यांना बरेच काही सांगणारी आहे. या प्रश्नाशी संबंध असलेल्यांच्या भूमिका टोकाच्या आहेत. हे संबंधित राजकारणात आहेत, धर्मकारणात आहेत आणि समाजकारणातही आहेत. या साºयांत समन्वय साधून एक ऐतिहासिक एकवाक्यता घडविणे हे कोणत्याही महंताच्या आवाक्याबाहेरचे काम आहे. त्याला सामोरे जाण्याऐवजी आपल्या प्रवचनांनी आपली अब्जावधींची इस्टेट वाढवीत नेणे हे श्री श्रींसाठी अधिक श्रेयस्कर आहे. उत्तर प्रदेशच्या एका माजी खासदाराने तसा सल्ला त्यांना दिलाही आहे. या श्रीश्रींच्या बºयाच एनजीओज आहेत आणि त्यांना बºयापैकी स्वदेशी आणि विदेशी पैसा मिळतो. त्या बळावर त्यांनी देशात अनेक जागी आपल्या मोठ्या इस्टेटीही उभ्या केल्या आहेत. ही माणसे अध्यात्मात आहेत की व्यापारात असाच प्रश्न त्यांच्या या प्रचंड मालमत्तेकडे पाहून आपल्याला पडावा. त्यांच्या उत्पन्नाचे एक आणखी महत्त्वाचे व मनोरंजक रहस्य हे की त्यात त्या बिचाºयांना कवडीचीही गुंतवणूक करावी लागत नाही. लोकांची अंधश्रद्धा आणि त्यांना भुरळ घालण्याची साधलेली किमया एवढी गुंतवणूक त्यांना पुरेशी असते. या माणसांनी त्यांना जमते तसे समाजाचे नैतिक व अधिभौतिक उन्नयन तेवढे करावे. राजकारणात उतरण्याची परीक्षा देऊ नये. ते त्यांचे क्षेत्र नव्हे. त्यातून श्री श्री रविशंकर यांचा राजकीय कल भाजपकडे असल्याचे या आधी अनेकवार उघड झाले आहे. त्यांनी दिल्लीत भरविलेल्या जांबोरीच्या वेळी ज्या पक्षाची माणसे गर्दी करून जमली होती ती त्यांच्या या कौलाचे स्वरूप सांगणारीही होती. श्री श्रींसारखी माणसे समाजाच्या मनात व आयुष्यात जळणाºया प्रश्नांविषयी फारसे बोलत नाहीत. कारण ते बोलण्याने त्यांच्या महात्म्यात कोणती भर पडत नाही. राम मंदिर, बाबरी मस्जिद किंवा धर्म व त्यातील भांडणे हे प्रश्न त्यांच्या महात्म्याची उंची वाढवितात. सबब, त्यांचा हा खटाटोप.