हाफिज सईदच्या सुटकेनंतर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 11:52 PM2017-11-23T23:52:34+5:302017-11-23T23:53:54+5:30

सईदच्या सुटकेनंतर व्हाईट हाऊसची अगदीच कोमट प्रतिक्रिया पाहता पाकिस्तानचा पवित्रा खराच ठरलेला दिसतो.

After the release of Hafiz Saeed .. | हाफिज सईदच्या सुटकेनंतर..

हाफिज सईदच्या सुटकेनंतर..

Next

सईदच्या सुटकेनंतर व्हाईट हाऊसची अगदीच कोमट प्रतिक्रिया पाहता पाकिस्तानचा पवित्रा खराच ठरलेला दिसतो. सईदसारख्यांना प्रत्यक्ष टाचेखाली ठेवण्यापेक्षा ‘मोकळे’ सोडणे हे जास्त ‘फायद्याचे’ आहे हे न समजण्याइतके पाक प्रशासन भाबडे नाही. त्यावेळी अटक ‘दाखवणे’ गरजेचे होते, ती त्यांनी दाखवली, आता सोडून दिले!
पंतप्रधान मोदींच्या कूटनीतीचे यश, भारत-अमेरिका संबंधातील नवे आशादायी ट्रम्प-मोदीपर्व असं म्हणत हाफिज सईदच्या नजरकैदेचे मोठे गुणगान उतावीळ समाजमाध्यमांनी यावर्षीच जानेवारीत केले होते. वस्तुत: ते तसे नव्हतेच हे हाफिज सईदच्या सुटकेने पुन्हा एकवार सिद्ध केले आहे. खुद्द हाफिज सईदने अटक झाल्यावर व्हिडीओ शूट केला होता आणि त्यात असे म्हटले होते की, ‘मला अटक होतेय, त्याला ट्रम्प आणि मोदी यांची ‘गहरी दोस्ती’ जबाबदार आहे. केवळ भारताला खूश करण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तान सरकारवर दबाव आणला. काश्मीर आणि बलुचिस्तानप्रश्नी भारताचा दबाव आणि त्याला अमेरिकेची साथ म्हणून मला अटक केली जाते आहे.’ आणि आपल्याकडे समाजमाध्यमातल्या भक्तगणांनी भारतासह मोदींच्या कर्तबगारीचे कौतुकपोवाडे गायला सुरुवात केली.
मात्र पाकिस्तान सरकारच्या या निर्णयाचे सारे श्रेय असे मोदी आणि ट्रम्प दोस्तीला देऊन टाकणे म्हणजे या घटनेकडे हाफिज आणि पाकिस्तानने दाखवलेल्या चष्म्यातूनच पाहण्यासारखे आहे हे तेव्हाच पुरेसे स्पष्ट होते. वॉशिंग्टनचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहे हे ओळखून गेली काही दशके सतत त्या दिशेनेच पाठ फिरवणाºया पाकिस्तान सरकारच्या मुरब्बी राजकारणाची ही एक खेळी होती. त्या खेळीचा पुढचा भाग पाकिस्तानने आता खेळला आहे.
मुळात ट्रम्प प्रशासन पाकिस्तानला चांगले धारेवर धरेल आणि पाकिस्तान सरकारच्या नाड्याच आवळल्या जातील असे वाटणे हाच एक भाबडेपणा होता. प्रत्यक्षात तसे घडणार नव्हते. घडलेही नाही. अमेरिकन रसदीवर जगणाºया पाकिस्तानविषयी ट्रम्प यांनी अध्यक्ष होण्यापूर्वी अनेक अपमानास्पद अनुद्गार काढले आहेत. सत्तेत येताच त्यांनी सात मुस्लीमबहुल देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी केली. आणि ती करताना अन्य देशांकडे अर्थातच पाकिस्तानकडे अंगुलीनिर्देशही केला. आणि आपण कसे अमेरिकेच्या दहशतवादविरोधी लढ्यात सहभागी आहोत. ज्याला संयुक्त राष्टÑसंघ आणि अमेरिकेने ‘जागतिक दहशतवादी’ घोषित केले आहे त्या सईदच्या कशा आम्ही मुसक्या बांधल्या हे दाखविण्यासाठी नजरकैदेचा फार्स पाकिस्तानने केला. त्याचे कैदेत असणे म्हणजे भारतीय कूटनीतीचा विजय आहे असे मानणेच खरे तर भोळसटपणाचे होते. उलट नजरकैदेत असल्याने हाफिज सईद कसा कशातच सहभागी (असू शकत) नाही असे म्हणत पाकिस्तान त्याला आणि त्याच्या संघटनेच्या कृत्यांना एक सुरक्षाकवचच पुरवत होते.
आता पाकिस्तानच्या हे लक्षात आले आहे की याला कैदेत ठेवून याच्या नाकदुºया काढत बसण्यापेक्षा त्याला मोकळे सोडलेले बरे. कारण तो कैदेत नसला म्हणून काही व्हाईट हाऊसमधून इस्लामाबादला खलिता येणार नाही. माहौल ‘ठंडा’ आहे. हाफिज सईद तेव्हा नजरकैदेतही बंदी नव्हता, आता तर ‘मोकाट’च आहे. यश तेव्हाही भारतीय कूटनैतिक आघाडीचे नव्हतेच, धोका तेव्हाही होता, आजही आहेच.

Web Title: After the release of Hafiz Saeed ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.