दुसरा कसाब सापडल्यानंतर...

By admin | Published: August 6, 2015 10:20 PM2015-08-06T22:20:57+5:302015-08-06T22:20:57+5:30

मुंबईत २६/११ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कसाब पकडला गेला आणि पाकचा ‘गेम’ उघडा पडला. आता मंगळवारी जम्मू व काश्मीरमधील उधमपूर येथील हल्ल्यानंतर आणखी एका दहशतवाद्याला

After the second Kasab was found ... | दुसरा कसाब सापडल्यानंतर...

दुसरा कसाब सापडल्यानंतर...

Next

मुंबईत २६/११ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कसाब पकडला गेला आणि पाकचा ‘गेम’ उघडा पडला. आता मंगळवारी जम्मू व काश्मीरमधील उधमपूर येथील हल्ल्यानंतर आणखी एका दहशतवाद्याला पकडण्यात आले आहे. मुुंबईवरील हल्ल्यानंतरचा गेल्या आठ वर्षांतील जो अनुभव भारताच्या गाठीशी आहे, त्याचीच पुनरावृत्ती उधमपूर हल्ल्यानंतर होणार, हे कदापी विसरता कामा नये; कारण भारताच्या विरोधात भूमिका घेत राहणे, हा पाकच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. जर स्वतंत्र भारतात हिंदू-मुस्लिम गुण्यागोविंदाने नांदत असतील, तर वेगळ्या देशाची गरजच काय, हा प्रश्न साहजिकच पाकला त्याच्या स्थापनेपासून भेडसावत आहे. त्यासाठीच पाकने भारताच्या विरोधात तीन युद्धे खेळली. सरळ युद्धात भारताला नामोहरम करता येत नाही, हे स्पष्ट झाल्यावर, पाकने छुप्या युद्धाचा म्हणजेच दहशतवादाचा, मार्ग पत्करला. सत्ता हस्तगत करण्यासाठी कोणतीही मर्यादा न पाळता जीवघेणे डावपेच खेळण्याच्या भारतीय राजकीय नेत्यांच्या स्वार्थी व देशहिताला फाटा देण्याच्या प्रवृत्तीमुळे असे छुपे युद्ध खेळण्याची संधी प्रथम पंंजाबात, नंतर काश्मिरात व आता सगळ्या देशभरात पाकला मिळत गेली आहे. तेव्हा मुंबई हल्ल्यानंतर कसाब पकडला जाऊनही पाकला कोंडीत पकडून दहशतवाद थांबवता आला नाही, तसेच उधमपूरच्या हल्ल्यात आणखी एक दहशतवादी पकडला गेल्याने भविष्यातील हल्ले रोखता येणार नाहीत. तसे ते रोखण्यासाठी मुख्यत: तीन मूलभूत गोष्टींची नितांत जरूरी आहे. त्यापैकी पहिली म्हणजे धार्मिक व जमातवादी राजकारणाला पूर्णत: पायबंद घालण्याची. भारतात हिंदू व मुस्लिम यांच्यात तणावग्रस्त संबंध असतील आणि या दोन्ही समाजातील विद्वेषाची दरी रूंदावतच राहणार असेल, तर त्यात पाकचेच हित आहे. हे परखड वास्तव जाणून घेऊन हिंदू व मुस्लिम समाजातील धुरिणांनी स्वत:हून पुढे येऊन विद्वेषाला मूठमाती देण्यासाठी झटणे हे अत्यावश्यक आहे. ऐतिहासिक काळापासून भारतात हिंदू व मुस्लिम या दोन्ही समाजांत सहजीवन व संघर्ष अशी पर्वे आलटून पालटून येत गेली आहेत. संघर्षानंतर खेडोपाडी पसरलेले हे दोन्ही समाज पुन्हा सहजीवनात रममाण होत आले आहेत. म्हणूनच अशा सहजीवनाची पर्वे वाढविण्याची नितांत गरज आहे. अर्थात हे जेवढे बोलणे वा लिहिणे सोपे आहे, तेवढेच ते प्रत्यक्षात आणणे महाकठीण आहे; कारण दोन्ही समाजात विद्वेषाची दरी असण्यात नुसते पाकचेच नव्हेत, तर भारतातीलही अनेक पक्ष व संघटनांचे, तेही दोन्ही समाजातील, हितसंबंध गुंतलेले आहेत. मात्र हे पाऊल उचलल्याविना पाकला खरे चोख उत्तर मिळणार नाही, याची खूणगाठ देशहिताला प्राधान्य देणाऱ्या भारतीयांनी बांधली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पारदर्शी, परिणामकारक व कार्यक्षम राज्यकारभाराची. भारतातील लोकशाहीचा आपल्याला अभिमान आहे. तो सार्थही आहे. पण कायद्याचे राज्य हा लोकशाहीचा गाभा असतो. असे कायद्याचे राज्य आपल्या देशात आता उतरणीला लागले आहे. त्याला जसे सत्ता राबवणारे राजकारणी जबाबदार आहेत, तसेच सर्वसामान्य लोकही. कायदा हा पाळायचा असतो, तो न पाळल्यास शिक्षा होते, हे तत्वच आता समाजजीवनातून हद्दपार होत चालले आहे. कायदा मोडला, तरी चालते, पैसे देऊन वा वशिला लावून सुटता येते, हा नियम समाजजीवनात रूळत गेला आहे. तो आधी राजकारण्यांनी रूळवला, हे मान्य. पण आता समाजानेही तो स्वीकारला आहे. म्हणूनच मुंबईच्या बॉम्बस्फोटासाठी स्फोटके रायगड जिल्ह्यातील किनारी उतरवली गेली आणि कस्टमच्या अधिकाऱ्यांनी लाच घेऊन ती सोडली. आज याकूबच्या फाशीचे इतके महाभारत बघायला मिळाले. पण ही लाचखोरी आजही चालूच आहे. किंबहुना आता ती आवाक्याबाहेर गेली आहे. त्याबद्दल याकूब प्रकरणाच्या निमित्ताने कोणी अवाक्षरही काढले नाही. अशा परिस्थितीचा फायदा दहशतवादी उठवत आले आहेत. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सुरक्षा दलांची स्थिती. गुरूदासपूर येथे दहा दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यात पंजाब पोलीस ‘बुलेटप्रुफ जॅकेट’विनाच कारवाईत सामील झाले. त्यामुळे एका अधिकाऱ्याला आपले
प्राण गमवावे लागले. जगातील सर्वोत्तम जॅकेट्स बनवण्याची भारताची क्षमता आहे. अमेरिका,
जर्मनीसह इतर असंख्य देश अशी जॅकेट्स भारतातून आयात करतात. पण ती आपल्या देशातील लष्कराला, सुरक्षा दलांना वा पोलिसांना दिली जात नाहीत.
याचा संबंध भ्रष्टाचार व नातेवाईकशाहीने बरबटलेला राज्यकारभार हे आहे. असे हल्ले झाले की, नुसते
इशारे दिले जातात, पाकला धडा शिकवण्याच्या वल्गना करण्यात येतात, आक्र मक पवित्रे घेण्याची अहमहमिका लागते. प्रत्यक्षात मुंबई हल्ल्यानंतरही परिस्थिती
अजून बदललेली नाही. गुरूदासपूर व उधमपूर येथील हल्ले ही त्याची बोलकी उदाहरणे आहेत. खरी गरज
आक्रमकतेची नव्हे, तर ठाम धोरणाची व त्याच्या अंमलबजावणीची आहे. जोपर्यंत असे काही होत
नाही, तोपर्यंत हे हल्ले रोखता येणार नाहीत. मग
मुंबई हल्ल्यानंतरचा ‘दुसरा कसाब’ सापडो अथवा न सापडो!

Web Title: After the second Kasab was found ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.