‘अफजलखाना’च्या मिठीत
By admin | Published: November 19, 2014 01:42 AM2014-11-19T01:42:12+5:302014-11-19T09:02:07+5:30
भाजपाकडून घेतली जाणारी परीक्षा अजून पूर्ण व्हायची आहे आणि आपण किती खाली उतरायचे याविषयीचा सेनेचाही निर्णय पक्का व्हायचा आहे.
राजकारणात चर्चेची दारे कधीही बंद होत नसतात’ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिवसेनेबाबतचे वक्तव्य, ‘सेना हा आमचा परंपरागत मित्रपक्ष आहे’ असे सुधीर मुनगंटीवारांचे म्हणणे, भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांची सेनेला होत असलेली मृदू आळवणी आणि सरसंघचालक मोहन भागवत हे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची उठलेली ‘अफवा’ या साऱ्या गोष्टी पाहिल्या की उद्धव ठाकरे यांचा भाजपावरचा राग लटका आणि त्यांच्या सामना या मुखपत्रातील भाजपावरील टीकाही खोटी वाटू लागते. मुळात उद्धव ठाकरे वगळले तर सेनेचा दुसरा कोणताही नेता भाजपाविषयी तिखट बोलत नाही आणि भाजपावाले एकमुखाने सेनेविषयी मैत्रीची गाणी गाताना दिसतात. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होऊ घातला आहे आणि बहुधा त्याच वेळी सेना व भाजपा यांची पुन्हा युती होऊन सेनेचे मंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांची जागा घेत असलेले राज्याला पाहायला मिळतील. विलंब एवढ्याचसाठी की सेनेला आणखी कोणत्या खालच्या पायरीवर उतरविता येते, याची भाजपाकडून घेतली जाणारी परीक्षा अजून पूर्ण व्हायची आहे आणि आपण किती खाली उतरायचे याविषयीचा सेनेचाही निर्णय पक्का व्हायचा आहे. आम्ही स्वाभिमानाने राहू, महाराष्ट्राची मान आम्ही खाली झुकू देणार नाही किंवा बाळासाहेबांचा बाणेदार वसा आम्ही कायम राखू, अशी भाषा सेनेचे पुढारी वारंवार करीत असले तरी मनातून तेही उद्या होणाऱ्या युतीबाबत आतुर आहेत आणि ती घडण्याच्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत. खरी अडचण सेनेला सत्तेवाचून फार काळ राहता येणे आता शक्य नाही ही आहे. सेनेचे ६१ आमदार विधानसभेत निवडून आले आहेत. त्यातल्या काहींनी यापूर्वी मंत्रिपदे अनुभवली आहेत. काही जण ती मिळतील ही खात्री बाळगूनच सभागृहात आले आहेत. शिवाय अनेक नव्यांनाही त्या पदाची आशा खुणावणारी आहे. निवडणूक प्रचाराच्या काळात शिवसेनेने व विशेषत: उद्धव ठाकरे यांनी भाजपाला ज्या तऱ्हेने आपल्या टीकेचा विषय बनविले, तो प्रकार भाजपाला फार खोलवर दुखवून गेला आहे. विशेषत: नरेंद्र मोदी यांना त्यांनी अफजलखान म्हणणे, ही त्या पक्षाच्या वर्मावर ठाकऱ्यांनी केलेली जखम आहे. ती भरून निघायला वेळ लागेल आणि मोदींसारखा कर्मठ माणूस ती कधी विसरणारही नाही. मात्र, राजकारण हा सत्तेसाठी करावयाच्या तडजोडीचा खेळ आहे. उद्धव ठाकरे अफजलखान विसरले आहेत. तो विसरायला भाजपाला थोडा वेळ लागेल एवढेच. यथाकाळ सारे विसरले गेले की पुन्हा सेनावाले ‘अफजलखाना’च्या कवेत शिरायला सिद्ध होतील आणि तो खानही यांना आपल्या मिठीत सुखाचा आश्रय देईल. तोपर्यंत एकमेकांची ताकद अजमावणे चालू राहील. राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घ्याल तर खबरदार, ही शिवसेनेने भाजपाला दिलेली तंबी नसून आपल्या मैत्रीच्या पूर्तीतली महत्त्वाची अटच तेवढी आहे व ती देखील वेळकाढूपणासाठी आहे. मुळात शरद पवार आणि सेनेचे नेते यांचे संबंध पिढीजात आहेत व त्यांची चर्चा दोन्ही बाजूंनी नेहमीच होत आली आहे. नुकतीच मनसेच्या राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीत राजकारण नाही, केवळ कुटुंबकारण आहे, असे दोन्ही बाजूंनी कितीही सांगितले गेले तरी त्यावर कोणी विश्वास ठेवण्याचे कारण नाही. मनसेचा राजकारणात सफाया झाला आहे. मात्र त्या पक्षाचे नेते राज ठाकरे यांचे भाजपाशी जवळचे संबंध आहेत. ते मोदींचे पाहुणे राहिले आहेत आणि नितीन गडकरी यांचेही ते मित्र आहेत. उद्धवशी त्यांच्या भेटीत या साऱ्या गोष्टींची चर्चा झालीच नाही असे जे समजतात, त्यांना राजकारण समजत नाही एवढेच म्हणावे लागते. फडणवीसांचे सरकार त्याच्यावरील विश्वासदर्शक मताच्या वेळी दुबळे दिसले. उद्धव ठाकरे विरोधात सज्ज होते आणि काँग्रेस विरोधात मतदान करायला तयार होती. शरद पवारांचा पक्ष तटस्थ राहण्याच्या किंवा बहिर्गमन करण्याच्या मन:स्थितीत होता. मात्र, ही स्थिती फडणवीस सरकारच्या स्थैर्यासाठी अडचणीची ठरणारी होती. ते तरले असते तरी त्याच्या पाठीशी अतिशय अल्प असे बहुमत असल्याचे महाराष्ट्राला दिसले असते. आवाजी बहुमताचा सभापतींनी केलेला पक्षीय वापर त्याचमुळे फडणवीस सरकारला काही काळ तारणारा ठरला. राजकारणात कोणी कोणाला फुकटची मदत करीत नाही. आज ती फुकट दिसली तरी उद्या तिची पुरेपूर किंमत कोणत्या ना कोणत्या मार्गाने वसूल केलीच जाते. अशा किमती वसूल करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार तरबेज आहेत. या पक्षाला अशा किमती मोजून देण्यापेक्षा सेनेसारखा आता पुरेसा दयनीय झालेला पक्ष आपल्या दावणीला आलेला भाजपालाही अर्थातच हवा आहे.