पुन्हा तेच ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 01:05 PM2018-07-07T13:05:25+5:302018-07-07T13:05:39+5:30

Again the same | पुन्हा तेच ते

पुन्हा तेच ते

Next

- मिलिंद कुलकर्णी
मुक्ताईनगर नगरपंचायतीची पहिली निवडणूक १५ जुलै रोजी होत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या मतदारसंघाच्या मुख्यालयात ही निवडणूक होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे या निवडणुकीकडे लक्ष लागलेले आहे. खडसे हे सध्या मंत्रिमंडळात नसल्याने आणि क्लीन चिट मिळाल्यानंतरही मंत्रिमंडळात परत सन्मानाने स्थान मिळत नसल्याने भाजपावर काहीसे रुसलेले आहेत. त्यांची नाराजी वेगवेगळ्या निमित्ताने समोर येत असते. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या निवडणुकीत खडसे यांना आव्हान देण्यासाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस या तीन पक्षांनी महाआघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत खडसे यांना जोरदार टक्कर दिलेल्या शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी महाआघाडीसाठी पुढाकार घेतला. परंतु खडसे यांचे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध पाहता ही महाआघाडी कितपत टिकाव धरेल, याविषयी राजकीय वर्तुळात शंका व्यक्त होत होती. हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्यांनी खडसे यांच्या कोथळी येथील निवासस्थानी भेट देऊन पाहुणचार स्वीकारला होता. तर रावेर येथे राजीव पाटील यांच्या सत्कार सोहळ्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी खडसे यांच्याकडे सहकार्याचा हात पुढे केला होता. ही पार्श्वभूमी पाहता शिवसेनेसोबतच्या महाआघाडीविषयी साशंकता होती आणि तसेच घडले. जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केल्याचे टोकन हाती असलेल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माधुरी जाधव यांच्यासाठी काँग्रेसने महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मुळात केवळ ७ जागा लढविणाºया काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी हट्ट धरणे चुकीचे असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे शिवसेना व राष्टÑवादी हे दोन पक्ष महाआघाडीत उरले आहेत. शिवसेनेने १३ तर राष्टÑवादीने ३ जागा लढविल्या आहेत. जागावाटपावरुन आघाडी तुटल्याने भाजपा नेत्यांना हायसे वाटले आहे. भाजपाची ग्रामपंचायतीत सत्ता होती; खडसे यांचे वर्चस्व कायम असले तरी भाजपाने याठिकाणी गाफिल न राहता चातुर्याचे दर्शन घडविले. प्रत्येक प्रभागात दोन उमेदवारांना अर्ज भरायला सांगून सगळ्याच उमेदवारांचे माघारीचे अर्ज ताब्यात घेतले होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणी अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करुन उर्वरित उमेदवारांना माघार घ्यायला लावली. त्यामुळे बंडखोरी झालेली नाही. शुध्द पाणी, चांगले रस्ते, स्वच्छता, गटारी या प्रश्नांभोवतीच ही निवडणूक फिरत आहे. ४० वर्षांचे राजकारण आणि दोनदा मंत्रिपद आणि एकदा विरोधी पक्षनेतेपद भूषविलेल्या खडसे यांच्या गावात जर मुलभूत समस्या कायम असतील, तर आश्चर्य म्हणावे लागेल. नेत्यांच्या गावातही तेच असेल तर मग समस्या सुटल्या कुठल्या हा प्रश्न आहेच.

Web Title: Again the same

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.