पुन्हा एकदा विदर्भवादी पक्ष

By admin | Published: September 27, 2016 05:13 AM2016-09-27T05:13:05+5:302016-09-27T05:13:05+5:30

विदर्भ वेगळा काढल्यास, उर्वरित महाराष्ट्रात अडगळीत पडण्याची भीती भाजपा व कॉंग्रेसला वाटते. त्याचा त्यांना फार फरक पडणारही नाही; पण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या

Again Vidarbha Party | पुन्हा एकदा विदर्भवादी पक्ष

पुन्हा एकदा विदर्भवादी पक्ष

Next

- रवी टाले

विदर्भ वेगळा काढल्यास, उर्वरित महाराष्ट्रात अडगळीत पडण्याची भीती भाजपा व कॉंग्रेसला वाटते. त्याचा त्यांना फार फरक पडणारही नाही; पण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर पाणी सोडावे लागेल, ही त्यांची खरी चिंता आहे.

आजोबा बापूसाहेब अणे यांनी बघितलेले वेगळ्या विदर्भ राज्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचा विडा उचललेले महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी स्वतंत्र राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली आहे. विदर्भ राज्यासाठी स्वातंत्र्यापासूनच सुरू असलेल्या चळवळीचा झेंडा, गत काही काळापासून, अणे प्रणित विदर्भ राज्य आघाडी या संघटनेने खांद्यावर घेतला आहे. आता त्या संघटनेला राजकीय पक्षात परिवर्तित करण्यात आले आहे.
वेगळ्या विदर्भ राज्याच्या मुद्यावर निवडणुका जिंकून दाखवून, वैदर्भीय जनतेला वेगळे निघायचे असल्याचे विदर्भवाद्यांना सिद्ध करून दाखवायचे आहे. भारतीय जनता पक्ष व कॉंग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांनी वेळोवेळी वेगळ्या विदर्भ राज्याला तात्विक पाठिंबा घोषित केला असला तरी, राज्य प्रत्यक्षात केव्हा आणणार, या मुद्यावर उभय पक्षांचे नेते चुप्पी साधतात. संसद व महाराष्ट्र विधिमंडळातील उभय पक्षांचे एकत्रित संख्याबळ लक्षात घेता, त्यांनी ठरविल्यास विदर्भ राज्य चुटकीसरशी अस्तित्वात येऊ शकते; परंतु ते आजवर झाले नाही आणि निकट भविष्यातही तशी अपेक्षा करता येत नाही. त्यामागचे कारण हे आहे, की विदर्भ वेगळा काढल्यास, उर्वरित महाराष्ट्रात अडगळीत पडण्याची त्यांना भीती वाटते. काही मोठ्या राज्यांमध्ये या पक्षांचे नाममात्रच अस्तित्व आहे. त्यामध्ये आणखी एकाची भर पडल्याने त्यांना फार फरक पडणारही नाही; पण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर पाणी सोडावे लागेल, ही त्यांची खरी चिंता आहे.
श्रीहरी अणे यांना ही वस्तुस्थिती पुरेपूर ठाऊक आहे आणि त्यांनी ती वेळोवेळी बोलूनही दाखविली आहे. त्यामुळेच त्यांनी प्र्रस्थापित पक्षांच्या नादी न लागायचे ठरवून, स्वतंत्र पक्षाची स्थापना करण्याचा मार्ग अवलंबला, असे दिसते. वैदर्भीय जनतेला हवे असल्यास राज्य देऊ, असे तुम्ही म्हणता ना, मग आम्ही ते निवडणुका जिंकून सिद्ध करून दाखवू, असा त्यांचा एकंदर अभिनिवेश आहे. त्यांच्या आत्मविश्वासास वैदर्भीय जनतेच्या पाठिंब्याची जोड मिळाल्यास, वेगळ्या विदर्भ राज्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरेलही; पण तसे न झाल्यास काय?
वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर यापूर्वी निवडणुका लढल्या गेल्या नाहीत, वा राजकीय पक्षांची स्थापना झालेली नाही, असे नाही. बापूसाहेब अणेंनी १९६२ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून नागपूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक जिंकली होती. त्याचप्रमाणे जांबुवंतराव धोटे यांनी १९७१ मध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघात, तर राजे विश्वेश्वरराव यांनी १९७७ मध्ये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात वेगळ्या विदर्भाच्याच मुद्यावर विजय मिळविला होता. वेगळे विदर्भ राज्य हाच एकमेव ‘अजेंडा’ असलेले काही राजकीय पक्षही भूतकाळात गठित झाले होते. जांबुवंतराव धोटेंनी २००२ मध्ये विदर्भ जनता कॉंग्रेसची, वसंत साठे व एन. के. पी. साळवे या कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी २००३ मध्ये विदर्भ राज्य निर्माण कॉंग्रेसची, तर बनवारीलाल पुरोहित यांनी २००४ मध्ये विदर्भ राज्य पार्टी या पक्षाची मुहूर्तमेढ रोवली होती. या सर्व पक्षांचे संस्थापक दिग्गज राजकीय पुढारी होते; पण आज भिंग घेऊन शोधले तरी ते पक्ष सापडायचे नाहीत. निवडणुकांच्या माध्यमातून वेगळ्या विदर्भ राज्याच्या चळवळीला हवा देण्याचा आणखी एक प्रयत्न २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळीही झाला होता. तेव्हा मतदान यंत्रावरील ‘नोटा’चा पर्याय वापरून सर्व प्रस्थापित पक्षांना नाकारण्याचे आवाहन, विदर्भ राज्य आंदोलन समितीने केले होते. त्याचेही फलित सर्वज्ञात आहे.
आता पुन्हा एकदा वेगळे विदर्भ राज्य हा एकमेव ‘अजेंडा’ असलेला पक्ष राजकीय क्षितिजावर उगवला आहे. या पक्षाचे भवितव्य वैदर्भीय जनताच निश्चित करेल. विदर्भवासीयांची इच्छा असल्यास नव्या पक्षाला तेलंगणा राष्ट्र समितीसारखे भव्य यशही लाभू शकेल; पण ते न झाल्यास, नावात विदर्भ असलेल्या सपशेल अपयशी पक्षांच्या यादीत आणखी एका नावाची भर पडून, वेगळ्या विदर्भाची चळवळही मागे रेटली जाऊ शकेल.

 

Web Title: Again Vidarbha Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.