मोहीम ‘दुहेरी’ फत्ते ! विकासवाटा समृद्धीच्या प्रकाशात उजळून निघतील
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 06:19 AM2024-07-19T06:19:57+5:302024-07-19T06:21:10+5:30
महाराष्ट्राच्या पूर्व टोकावरील नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यासाठी बुधवारचा दिवस दोन आनंदाच्या बातम्या घेऊन आला. पहिली आनंदवार्ता औद्योगिक विकासाच्या क्षितिजावर जिल्ह्याच्या उदयाची, तर दुसरी उगवता सूर्य झाकोळणारे हिंसेचे ढग पांगवणारी होती.
महाराष्ट्राच्या पूर्व टोकावरील नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यासाठी बुधवारचा दिवस दोन आनंदाच्या बातम्या घेऊन आला. पहिली आनंदवार्ता औद्योगिक विकासाच्या क्षितिजावर जिल्ह्याच्या उदयाची, तर दुसरी उगवता सूर्य झाकोळणारे हिंसेचे ढग पांगवणारी होती. जिल्हा मुख्यालयाच्या दक्षिणेकडील अहेरी तालुक्यात सुरजागड इस्पात या पोलादनिर्मिती कारखान्याचे भूमिपूजन देवेंद्र फडणवीस व अजित पवार, हे दोन उपमुख्यमंत्री, तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते बुधवारी दुपारी झाले. पावसाळ्याचे दिवस असल्याने पूर्व विदर्भावर ढगांचे दाट आच्छादन होते. त्यामुळे नागपूरवरून या मंत्र्यांना घेऊन जाणारे हेलिकाॅप्टर काही क्षण ढगांमध्ये गुडूप झाले होते. त्यामुळे मनात उमटलेली चिंता व फडणवीस यांनी दिलेला निश्चिंत राहण्याचा दिलासा, हा किस्सा अजित पवार यांनी कार्यक्रमात सांगितला. त्याचवेळी कार्यक्रम स्थळापासून अंदाजे ७० किलोमीटर अंतरावर, छत्तीसगडच्या कांकेर जिल्हा सीमेवर भर पावसात पोलिस व नक्षलवादी आमनेसामने आले होते.
जारावंडी पोलिस ठाण्याच्या क्षेत्रातील वांडोळी जंगलात काही नक्षली दबा धरून बसल्याची माहिती मिळाल्यामुळे महाराष्ट्र पोलिसांच्या सी-६० पथकातील जवानांनी त्यांना हुडकून काढण्याचे अभियान सुरू केले आणि त्या पथकावर गोळीबार झाला. परिणामी, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यानाल्यांच्या काठांवर गोळीबाराची धुमश्चक्री सुरू झाली. ही चकमक तब्बल सहा तासांहून अधिक वेळ सुरू होती. त्यात पोलिसांना बारा नक्षल्यांचा खात्मा करण्यात यश आले. याकामी महाराष्ट्र व छत्तीसगड पोलिसांनी एकमेकांना सहकार्य केले. समन्वय ठेवला. चकमकीत जखमी फाैजदारांना घेऊन नागपूरला येणाऱ्या हेलिकाॅप्टरने कांकेर जिल्ह्यातील बांदे येथून उड्डाण केले. गेल्या तीन वर्षांत पोलिसांना मिळालेले हे सर्वांत मोठे यश आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये गॅरापत्ती जंगलात जहाल नेता मिलिंद तेलतुंबडे याच्यासह २६ माओवाद्यांना संपविण्यात पोलिसांना यश मिळाले होते. त्यानंतरची ही मोठी यशस्वी कारवाई. मारल्या गेलेल्या नक्षल्यांमध्ये सात पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे. त्या सर्वांवर खून, खुनाचे प्रयत्न, सशस्त्र लूट, दरोडा आदी मिळून तब्बल तीनशेहून अधिक गुन्हे, तर त्यांच्या शिरांवर मिळून २ कोटींहून अधिक रकमेची बक्षिसे होती. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील गोंदिया तसेच छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्याच्या सीमांना लागून असलेल्या उत्तर गडचिरोलीमधील माओवाद्यांच्या दोन सशस्त्र दलमचा खात्मा बुधवारच्या चकमकीत झाला आहे. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या म्हणण्यानुसार आता उत्तर गडचिरोलीत माओवाद्यांचा एकही सशस्त्र गट कार्यरत नाही. ही महाराष्ट्राच्या दृष्टीने खूपच मोठी व आनंदाची बातमी आहे.
त्याचप्रमाणे मध्य भारतातील हा टापू नक्षलमुक्त करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाचेही हे मोठे यश आहे. गृहमंत्री अमित शाह हे यासंदर्भात अधिक सक्रिय आहेत. अर्थात, महाराष्ट्र पोलिसांच्या सी-६० पथकाला हे यश सहजासहजी मिळालेले नाही. त्यासाठी काही जवानांनी प्राणाचे बलिदान दिले, तर काहींनी जिवावर उदार होऊन सशस्त्र माओवाद्यांचा मुकाबला केला आहे. अलीकडच्या काळात सुरक्षा दलाची अजिबात जीवितहानी होऊ न देता नक्षल्यांचा खात्मा करण्याचे एक आगळेवेगळे काैशल्य या पथकाने साधले आहे. शेजारच्या छत्तीसगडमध्ये अधूनमधून जवानांचे बळी जात असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांचे हे काैशल्य उठून दिसते. तीन वर्षांपूर्वीच्या चकमकीत मिलिंद तेलतुंबडे व इतरांचा अंत झाला तेव्हा तीन जवान किरकोळ जखमी झाले होते, तसेच आताही डझनभर नक्षल्यांना कंठस्नान घालताना एक फाैजदार व एक शिपाई, असे दोघेच जखमी झाले. विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात राज्याच्या नक्षलविरोधी अभियानाला मिळत असलेले हे यश केवळ गडचिरोलीच नव्हे, तर संपूर्ण विदर्भासाठी विकासाचे नवे पर्व सुरू करण्यास साहाय्यभूत ठरणार आहे. हिंसेच्या दुष्टचक्रातून बाहेर पडणारा गडचिरोली जिल्हा लोहखनिजाचा देशातील सर्वाधिक संपन्न टापू आहे. खनिज उत्खनन व पोलादनिर्मितीसाठी मोठमोठ्या कंपन्या या भागात येत आहेत. एक लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक होत आहे. सुरजागड पहाडी हा या विकासवाटांचा केंद्रबिंदू आहे. हिंसेला आळा घालण्यात पोलिसांना यश आल्यामुळे यापुढे या विकासवाटा समृद्धीच्या प्रकाशात उजळून निघतील. दशकानुदशके दैन्य, दारिद्र्य व भीतीच्या छायेत वावरणाऱ्या या जंगल प्रदेशातील आदिवासींच्या आयुष्यातही या प्रकाशाची पखरण होत राहील.