दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 06:14 AM2024-09-19T06:14:27+5:302024-09-19T06:14:56+5:30
आतिशी मार्लेना सिंह या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असतील. ममता बॅनर्जी यांच्यासोबत आता त्या देशातील दुसऱ्या महिला मुख्यमंत्री, तर सुषमा स्वराज, शीला दीक्षित यांच्यानंतरच्या दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला.
आतिशी मार्लेना सिंह या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असतील. ममता बॅनर्जी यांच्यासोबत आता त्या देशातील दुसऱ्या महिला मुख्यमंत्री, तर सुषमा स्वराज, शीला दीक्षित यांच्यानंतरच्या दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला. दिल्ली विधानसभेच्या निवडणुका पुढच्या फेब्रुवारीत होऊ घातल्या आहेत. म्हणजे जेमतेम पाच-साडेपाच महिने आतिशी मुख्यमंत्रिपदावर असतील. असे औटघटकेचे मुख्यमंत्रिपद सुषमा स्वराज यांना लाभले होते. १९९८ च्या ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. नंतरच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आणि सुषमा स्वराज देशाच्या राजकारणात आल्या. आता मद्य धोरण घोटाळ्यातील भ्रष्टाचाराचे डाग धुऊन काढण्यासाठी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्यासोबतच स्वत:च्या स्वच्छ प्रतिमेची जनमत चाचणी घोषित केली आहे.
जनतेने स्वच्छ कारभाराचे प्रमाणपत्र दिले तर मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत बसू, अशी राणा भीमदेवी थाटाची घोषणा करीत ते पायउतार झाले आहेत. ही जनमत चाचणी महाराष्ट्रासोबतच दिल्लीची निवडणूक घेऊन फेब्रुवारीऐवजी नोव्हेंबरमध्येच पार पाडली जावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. मनीष सिसोदियादेखील जामिनावर बाहेर आले आहेत आणि गेले काही महिने अनाैपचारिकरीत्या पक्षातील क्रमांक तीनचे पद ज्यांच्याकडे होते अशा आतिशी मुख्यमंत्री बनत आहेत. या जबाबदारीसाठी निवड होताच त्यांनी ‘अरविंद केजरीवाल यांच्यावरील भ्रष्टाचाराचे बालंट दिल्लीची जनता दूर करील व तेच पुढचे मुख्यमंत्री असतील’, असे जाहीर केले आहे. केजरीवाल यांच्याप्रमाणेच आतिशी उच्चशिक्षित आहेत. ऑक्सफर्डमध्ये शिकल्या आहेत. ऱ्होड्स स्काॅलर आहेत. अवघ्या ४३ व्या वर्षी, अगदीच तरुणपणी त्यांना देशाच्या राजधानीचे मुख्यमंत्रिपद मिळत आहे. पक्षात त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. केजरीवाल व सिसोदिया हे दोघे तुरुंगात असताना बहुतेक सगळ्या, विशेषत: दिल्लीतील शाळांचे रूपडे बदलणाऱ्या शिक्षण खात्याची जबाबदारी त्यांनी यशस्वीरीत्या पेलली आहे. महत्त्वाचे म्हणजे, दिल्ली विधानसभा निवडणुकीत सलग दोन, तसेच एकत्रित महापालिकेतील अनपेक्षित पराभवामुळे बैचेन असणाऱ्या भाजपकडे आतिशी यांच्यावर टीकेसाठी मोठा, ठोस व गंभीर असा मुद्दा नाही. लोकसभा निवडणुकीवेळी केजरीवाल यांना अटकेबद्दल सहानुभूती मिळू नये म्हणून प्रचाराची मुभा मिळाली का आणि आता हरयाणा विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या मतांच्या विभाजनाचे काही गणित त्यांच्या जामिनामागे आहे का, हे प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. तथापि, अशा प्रश्नांना शेंडा नसतो तसेच बुडूखही नसते.
राजधानीतील भाजप-आप-काँग्रेस हा राजकीय त्रिकाेण व त्यामधील गुंतागुंत थोडी बाजूला ठेवली तरी हे नक्की आहे की, या निर्णयामुळे पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांनी तिथला राजकीय सामना ‘आप विरुद्ध भाजप’ असा थेट बनवला आहे. केजरीवाल यांचा राजीनामा व आतिशी यांची मुख्यमंत्रिपदावर वर्णी या घडामोडींबाबत काय प्रतिक्रिया द्यावी याबाबत भाजप व काँग्रेस हे दोन्ही पक्ष प्रचंड संभ्रमात आहेत. काँग्रेसचे एक बरे आहे की, त्यांनी प्रतिक्रिया दिली किंवा नाही दिली तरी फरक पडत नाही. भाजपचे तसे नाही. लोकसभेच्या दिल्लीतल्या सातही जागा जिंकणाऱ्या व केंद्रात सत्तेवर असणाऱ्या, दिल्ली पोलिसांवर गृहखात्याची हुकूमत असताना भाजपच्या प्रतिक्रियेला मात्र मोठे महत्त्व आहे. मद्यधोरणाच्या घोटाळ्यात अटक झाल्यानंतर, तिहार कारागृहात असूनही अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिला नाही या मुद्द्यावर भाजप आक्रमक होता. राजीनामा द्या, राजीनामा द्या, असा धोशा लावला होता. सहा महिन्यांनंतर कारागृहातून सुटून आल्यानंतर राजीनाम्याची घोषणा करून केजरीवाल यांनी भाजपला पहिला धक्का दिला. दुसरा धक्का आतिशी यांच्या निवडीचा होता. या दोन धक्क्यांनी भाजप गडबडल्याचे दिसते. त्या डाव्या विचारांच्या असणे, त्यांच्या मार्लेना नावाला मार्क्स व लेनिन यांचा संदर्भ असणे किंवा संसदेवरील दहशतवादी हल्ल्याचा आरोपी अफजल गुरू याच्या फाशीविरुद्धच्या पत्रकावर आतिशी यांच्या मातापित्यांच्या सह्या असणे, या मुद्द्यांवर भाजपने केलेली टीका हास्यास्पद आहे. विचाराने डावे असणे हा गुन्हा नाही, तसेच आई व वडिलांनी एखाद्या मुद्द्यावर घेतलेली भूमिका मुलीवर थोपविण्यात साधी तर्कसंगतीदेखील नाही. थोडक्यात, दिल्लीची राजकीय दंगल तोंडावर असताना आम आदमी पक्षाने विधानसभेची शाळा हेडमिस्ट्रेस आतिशी यांच्या हाती सोपविली आहे. या शाळेचेही रूपडे त्या बदलतात का, हे पाहणे औत्सुक्याचे असेल.