शिवसैनिकांची कसोटी; बंडखोरी व निष्ठेचा मुद्दा निर्णायक ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 07:02 AM2024-05-03T07:02:38+5:302024-05-03T07:06:08+5:30
गुरुवारी नाशिकचा तिढा सुटला, ती जागा अखेर शिंदेसेनेला सुटली आणि शिंदेसेनेला ठाण्याची जागा देऊन पालघरची जागा भाजप लढविणार हे स्पष्ट झाले.
लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया मध्यावर आली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, ‘उद्धव ठाकरे काही आमचे शत्रू नाहीत, आजारी असताना त्यांची मी रोज विचारपूस करीत होतो आणि भविष्यातही त्यांना काही मदत लागली तर ती निश्चित करू’, अशी प्रेमळ भाषा वापरली आहे. उद्धव ठाकरे मात्र मोदींसह संपूर्ण भाजपविरुद्ध प्रचंड आक्रमक आहेत. महाराष्ट्रातील लोकसभेची लढाई उत्तरार्धात पोहोचली आहे. पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरणे सुरू आहे. पहिल्या दोन टप्प्यातील मतदान पाहता ही निवडणूक आधी वाटली तशी एकतर्फी होण्याची शक्यता नसल्याचे अंदाज बांधले जात आहेत. विशेषत: महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांना खूप ताकद लावावी लागत आहे.
गुरुवारी नाशिकचा तिढा सुटला, ती जागा अखेर शिंदेसेनेला सुटली आणि शिंदेसेनेला ठाण्याची जागा देऊन पालघरची जागा भाजप लढविणार हे स्पष्ट झाले. अशारीतीने राज्यातील सगळ्या लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून महायुतीमध्ये भाजप २८, शिंदेसेना १५, अजित पवारांची राष्ट्रवादी ४ व रासप एक तर महाविकास आघाडीत उद्धव सेना २१, काँग्रेस १७ व शरद पवारांची राष्ट्रवादी १० जागा असे ४८ जागांचे वाटप आहे. महायुतीची सगळी सूत्रे भारतीय जनता पक्षाच्या हातात आहेत. जागावाटपावर भाजपचा वरचष्मा आहेच. शिवाय, मित्र पक्षाला योग्य उमेदवार मिळत नसेल तर त्याचीही जुळवाजुळव करण्याची जबाबदारी मोठा भाऊ म्हणून भाजपने घेतली आहे. त्यातूनच भाजपने रामटेकमध्ये काँग्रेसच्या आमदारांना फोडून शिंदेसेनेत प्रवेश घ्यायला लावला, तिकीटही दिले. शरद पवारांच्या भेटीगाठीत गुंतलेले महादेव जानकर यांना परत आणून त्यांना अजित पवारांच्या वाट्याचा परभणी मतदारसंघ दिला. शिवाजीराव आढळराव पाटील यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पाठवून शिरूर मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे यांच्याविरुद्ध उतरवले.
राजकीय सारीपाटावर असे मोहरे फिरविताना यंदा सर्वाधिक चर्चा झाली ती भाजपच्या सर्वेक्षणाची. वेळोवेळी त्याचाच हवाला देत देत स्वत:चे तसेच मित्रपक्षातील उमेदवारींचे निर्णय घेतले गेले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणाचे एक वैशिष्ट्यपूर्ण अंतिम चित्र समोर आले असून पालघर, ईशान्य मुंबई, सांगली, जळगाव व रत्नागिरी-सिंधुदुर्ग या केवळ पाच जागांवर भाजप आणि उद्धवसेना आमने-सामने आहे. उद्धव यांच्या तुलनेत निम्म्या जागा लढविणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मात्र आठ जागांवर भाजपशी मुकाबला होत आहे. गेल्या दोन वर्षांमधील राजकीय घडामोडी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन मोठ्या पक्षात पडलेल्या उभ्या फुटी, शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यापुढे अस्तित्वाचा प्रश्न, प्रचंड गोंधळाचे राजकीय वातावरण या सगळ्यांचा विचार करता भविष्यातील राजकारणाची दिशा ठरविणारे हे चित्र आहे. महायुतीमधील जागावाटप, उमेदवारांची निवड, एकूणच लढतींचे चित्र निश्चित करण्यातील भाजपची भूमिका लक्षात घेता ही स्थिती निर्णायक म्हणावी लागेल. उद्धव ठाकरे व शरद पवार यांचे पक्ष फुटणे, त्यासाठी ईडी, सीबीआय वगैरे केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर वगैरेचे सगळे खापर भारतीय जनता पक्षावर फोडले गेले. आता ठाकरे व पवार थेट मैदानात उतरले आहेत. त्यांच्याप्रती मतदारांमध्ये सहानुभूती दिसते. तेव्हा त्या सहानुभूतीचा फटका थेट आपल्याला बसू नये, असे नक्कीच भाजपला वाटत असेल. त्यानुसार ठरवलेली व्यूहरचना अपरिहार्यदेखील होती. कारण, शिवसेनेचे गेल्या निवडणुकीत जिंकलेले राज्यातील अठरापैकी तेरा खासदार शिंदे यांच्यासोबत गेले.
जागावाटपात किमान तेवढ्या जागा वाट्याला याव्यात, यासाठी शिंदे यांनी ताकद लावली आणि त्यात त्यांना चांगले यशही आले. साहजिकच या जागांवर सेनेची ताकद असल्याने महाविकास आघाडीतही त्या जागा आपसूक उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला आल्या. परिणामी, दोन्ही बाजूंनी शिवसैनिक एकमेकांविरुद्ध लढतील. यात खरे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे आहे. त्यांच्या वाट्याच्या पंधरा जागांपैकी रामटेक व कोल्हापूर वगळता उरलेल्या सर्व तेरा जागांवर निष्ठावंतांचे कडवे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे. या लोकसभा मतदारसंघांमध्ये सेना विरुद्ध सेना अशी लढत होत आहे आणि साहजिकच या लढाईत बंडखोरी व निष्ठेचा मुद्दा निर्णायक ठरणार आहे. यात कोणाची सरशी होते, याकडे सर्वाधिक लक्ष असेल ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे. उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातील त्यांच्या ताज्या वक्तव्याकडे त्याच दृष्टीने पाहायला हवे.