अशी मस्ती येते कशी?, नव्या प्रकरणाने ‘यूपीएससी’ संशयाच्या गर्तेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 05:22 AM2024-07-15T05:22:56+5:302024-07-15T05:25:05+5:30

आपण ‘आयएएस’ झालो म्हणजे देशाचे मालक झालो, अशा वातावरणात वाढलेल्या पूजा खेडकरने जो उन्मत्तपणा केला, तो तर भयंकर आहेच; पण यानिमित्ताने केंद्रीय लोकसेवा आयोगावरचाही विश्वास उडून गेला आहे.

agralekh on UPSC Exam | अशी मस्ती येते कशी?, नव्या प्रकरणाने ‘यूपीएससी’ संशयाच्या गर्तेत

अशी मस्ती येते कशी?, नव्या प्रकरणाने ‘यूपीएससी’ संशयाच्या गर्तेत

आपण ‘आयएएस’ झालो म्हणजे देशाचे मालक झालो, अशा वातावरणात वाढलेल्या पूजा खेडकरने जो उन्मत्तपणा केला, तो तर भयंकर आहेच; पण यानिमित्ताने केंद्रीय लोकसेवा आयोगावरचाही विश्वास उडून गेला आहे. आधीच ‘नीट’, ‘नेट’ या परीक्षांचा गोंधळ सुरू असताना ही नवी भर पडली आहे. सगळेच भ्रष्ट आहे, काहीही मॅनेज करता येते, अशा वातावरणातही ‘आयआयटी’, ‘यूपीएससी’ यांच्याकडे आदराने पाहिले जात होते. या नव्या प्रकरणाने ‘यूपीएससी’ संशयाच्या गर्तेत गेली आहे. ‘एमपीएससी’ने आपली प्रतिमा पुरेशी मलिन केली होतीच. आता ‘आयएएस’बद्दल तेच घडले आहे.

मंत्रालयातील ‘आयएएस’ अधिकाऱ्यावर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, ‘अहमदनगरचे महापालिका आयुक्त बेपत्ता’, ‘खेडच्या तहसीलदाराचे निलंबन’ अशा बातम्या उमटत असताना, परीविक्षाधीन ‘आयएएस’ असलेल्या पूजाने यंत्रणेच्या विश्वासार्हतेच्या मुळावरच घाव घातला आहे. देशाला आतून पोखरून काढणाऱ्या निर्लज्ज, निगरगठ्ठ आणि बेमुर्वतखोर वृत्तीचे दर्शन प्रशिक्षणार्थी ‘आयएएस’ अधिकारी पूजा खेडकर प्रकरणातून पुन्हा झाले. ललित पाटील ड्रग्ज प्रकरण, पोर्शे कार अपघात प्रकरण, नुकताच उघडकीस आलेला नीट परीक्षेतील घोटाळा, रद्द झालेली नेट परीक्षा ही प्रकरणे साधी नाहीत. सारी व्यवस्थाच दावणीला बांधता येते आणि आपल्याला हवे ते करता येते, हा अतिशय उर्मट, असभ्य आणि देशाला मान खाली घालायला लावणारा संदेश या प्रकरणांनी दिला.

या प्रकरणांचा तपास पूर्ण होऊन दोषींना अद्यापही शिक्षा झालेली नाही, ही आपली तपासयंत्रणा आणि न्यायव्यवस्था किती सक्षम आहे, हेच दाखवून देतात. पूजा खेडकर जी परीक्षा देऊन भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या, ती परीक्षा उत्तीर्ण होण्याची स्वप्ने देशातील लाखो, करोडो मुले ठेवतात. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांचे सगळीकडे कौतुक होते. माध्यमेही त्यांची ठळक दखल घेतात. दिव्यांग प्रमाणपत्राच्या बळावर आणि इतर मागासवर्गीय गटातून अर्ज भरून पूजा खेडकर ‘आयएएस’ झाल्या खऱ्या; पण आपणच जणूकाही या व्यवस्थेच्या धुरीण आहोत, असा थाट त्यांनी मांडला. आपल्या उर्मट स्वभावाचे दर्शन जागोजागी घडवले. नियमात नसताना स्वतःच्या खासगी गाडीवर ‘अंबर दिवा’ लावला. गाडी, बंगला यांच्या मागण्या केल्या. त्यांचे वडील दिलीपराव खेडकर हेदेखील निवृत्त सरकारी अधिकारी. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातून ते निवृत्त झाले. सध्या ते राजकारणात आहेत. वंचित बहुजन आघाडीचे ते उमेदवार होते. पूजा यांचे आजोबाही सरकारी अधिकारी. सध्या पिस्तूलसह ‘व्हायरल’ झालेली त्यांची आई एका गावची सरपंच राहिलेली. तिच्या वडिलांनी निवडणुकीच्या वेळी त्यांची ४० कोटींची संपत्ती जाहीर केली होती. पूजा यांच्याकडेही करोडोंची संपत्ती आहे. अशी सरकारी आणि आर्थिकदृष्ट्या श्रीमंत परंपरा असलेल्या घरातून येऊनही त्यांनी ओबीसी- नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर केले. एवढेच नाही, त्यांनी दिव्यांग प्रमाणपत्रही मिळविले. त्या जोरावर पूजा यांना ‘आयएएस’ मिळाले. त्यांनी ‘प्रोबेशन’ सुरू असताना, असा थयथयाट केला नसता, तर हे प्रकरण कदाचित कधीच पुढे आले नसते.

सर्व काही बिनबोभाट पार पडले असते. अशा किती पूजा खेडकर या व्यवस्थेत आहेत, हे सांगता येणेही कठीण! केंद्रीय लोकसेवा आयोग या नावातच ‘सेवा’ हा शब्द आहे. त्यातून या व्यवस्थेत मालक ही जनता आहे आणि सरकारी अधिकारी जनतेचा सेवक हे अगदी स्पष्ट आहे; पण लोकांशी उद्धट बोलणे, त्यांची कामे न करणे, चिरीमिरी घेणे यांचा सामना जनतेला रोजचा करावा लागतो. ‘यूपीएससी’ची ही अशी एक परीक्षा आहे की, ती उत्तीर्ण झाल्यानंतर मिळणारे पद कंत्राटी नाही. देशाच्या धोरणकर्त्यांमध्ये हे लोक जाऊन बसतात. एखादी व्यक्ती कितीही हुशार असली तरी सरकारी नोकर म्हणून या पदांवर इतर कुठल्याही व्यक्तीला बसता येत नाही. पूजा खेडकर यांच्या प्रकरणात त्यांची निवडप्रक्रिया कशी झाली, त्याचीही पुरेपूर चौकशी होऊन त्याचा सारा तपशील लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यांना कुणी पाठीशी घातले, ते समोर आले पाहिजे. या बेबंद नोकरशाहीने लोकशाही व्यवस्थेचे अपहरण करता कामा नये. नोकरशाही नीट राहिली, तर ‘नीट’ आणि ‘नेट’सह सर्व परीक्षा योग्य पद्धतीने पार पडून योग्य उमेदवार योग्य त्या ठिकाणी जातील. व्यवस्थेला लागलेली वाळवी व्यवस्थेचे रखवालदारच आणखी वाढवत असतील, तर पूजा खेडकरसारख्या मस्तवाल ‘आयएएस’चे वर्तन आश्चर्यकारक नाही!

Web Title: agralekh on UPSC Exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.