सावध ऐका पुढल्या हाका !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 10:07 AM2023-10-07T10:07:11+5:302023-10-07T10:08:21+5:30
केशवसुतांच्या 'तुतारी' या गाजलेल्या कवितेतील 'सावध ऐका पुढल्या हाका' ही ओळ आठवण्याचे कारण म्हणजे, यावर्षीचा सप्टेंबर ज्ञात इतिहासातील सर्वांत उष्ण सप्टेंबर ठरला, तर २०२३ हे सर्वात उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता आहे
केशवसुतांच्या 'तुतारी' या गाजलेल्या कवितेतील 'सावध ऐका पुढल्या हाका' ही ओळ आठवण्याचे कारण म्हणजे, यावर्षीचा सप्टेंबर ज्ञात इतिहासातील सर्वांत उष्ण सप्टेंबर ठरला, तर २०२३ हे सर्वात उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता आहे, ही अस्वस्थ करून सोडणारी बातमी! कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस (सीएस) या संस्थेच्या ताज्या अहवालानुसार, सप्टेंबर २०२३ मधील भूपृष्ठावरील सरासरी तापमान, १९९१ ते २००० या कालावधीतील सप्टेंबर महिन्यांच्या सरासरी तापमानाच्या सरासरीपेक्षा तब्बल ०.९१ अंश सेल्सिअसने जास्त होते. याचाच अर्थ अवघ्या दोन दशकांच्या कालावधीत जवळपास एक अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. हे भयंकर आहे. काही वर्षांपूर्वी जागतिक तापमानवाढीवर केवळ संशोधकांमध्येच चर्चा होत असे परंतु ती कटू वस्तुस्थिती असल्याची जाणीव आता सर्वसामान्यांनाही होऊ लागली आहे.
त्यामागील कारण म्हणजे तापमानवाढीचे दुष्परिणाम आता प्रत्यक्ष दिसू लागले आहेत, जाणवू लागले आहेत, अनुभवायला मिळत आहेत. सध्या सिक्कीम आणि बिहारमध्ये सुरु असलेले पुराचे थैमान हा जागतिक तापमानवाढीचाच दृश्य दुष्परिणाम आहे. केवळ भारतच नव्हे, तर जगभरच दुष्परिणाम दृष्टीस पडत आहेत. उष्णतेच्या लाटा, दुष्काळ, पूर, वणवे, हिमनद्या व हिमनगांचे वितळणे, समुद्राच्या जलपातळीतील वाढ अशा विविध मार्गांनी निसर्ग मनुष्यजातीस पुढील मोठ्या धोक्यांची जाणीव करून देत आहे. पण, दुर्दैवाने मनुष्यजात काही निसर्गाच्या सावधगिरीच्या हाका ऐकायला तयार नाही! भारतासारख्या उष्ण कटिबंधातील देशात तर हे दुष्परिणाम जास्तच ठळकपणे दृग्गोचर होत आहेत. उष्णतेच्या लाटा, अवकाळी पाऊस, ढगफुटी, पूर आणि अवर्षणाचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत किती तरी वाढले आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान, जलटंचाई, पायाभूत सुविधांची हानी अशा संकटांना हल्ली वारंवार सामोरे जावे लागत आहे. सध्या सिक्कीम आणि बिहारमध्ये पुराने घातलेले थैमान आणि त्यामुळे होत असलेली जीवित व वित्त हानी, भविष्यात समोर काय वाढून ठेवले आहे, याची जाणीव करून देत आहे. हरितगृह वायू उत्सर्जन हे जागतिक तापमानवाढीमागील सर्वात प्रमुख कारण आहे, हे एव्हाना सर्वमान्य झाले आहे. त्यावरील उपाययोजनांसंदर्भातही एकमत आहे. परंतु त्यामध्ये कोणी किती वाटा उचलायचा, यावरून दुर्दैवाने भांडणे सुरूच आहेत. हरितगृह वायू उत्सर्जन कमी करावयाचे असल्यास कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू यासारख्या जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी करून, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यासारखे शाश्वत ऊर्जास्रोत विकसित करणे गरजेचे आहे.
दुर्दैवाने अद्यापही पारंपरिक इंधनांच्या तुलनेत हे ऊर्जास्रोत महागडे आहेत आणि त्यामुळे अविकसित व विकसनशील देशांना परवडण्यासारखे नाहीत. विसाव्या शतकात विकसित देशांनी जीवाश्म इंधनांचा वारेमाप वापर करून स्वतःचा विकास साध्य करून घेतला आणि आता ते अविकसित व विकसनशील देशांना जागतिक तापमानवाढीच्या दुष्परिणामांची भीती दाखवून, महागड्या शाश्वत ऊर्जास्रोतांचा वापर करण्यासाठी दबाव निर्माण करीत आहेत. त्यामुळे या मुद्यावरून जगात दोन गट पडले आहेत. आम्ही जीवाश्म इंधनांचा वापर कमी करायला तयार आहोत. परंतु, पूर्वी विकसित देशांनी केलेल्या जीवाश्म इंधनांच्या वारेमाप वापरामुळे झालेल्या जागतिक तापमानवाढीची भरपाई म्हणून त्यांनी आम्हाला शाश्वत ऊर्जास्त्रोतासाठी वित्तीय व तांत्रिक मदत करावी, अशी भूमिका अविकसित व विकसनशील देशांनी घेतली आहे. या भांडणात वसुंधरा आणि मनुष्यजातीचे अपरिमित नुकसान होत आहे. उभय बाजू जेवढ्या लवकर टोकाची भूमिका सोडून लवचीक धोरण स्वीकारतील, तेवढे सगळ्यांसाठीच बरे होईल! सर्वसामान्य माणसानेही तापमानवाढीच्या धोक्याचा मुकाबला करण्यासाठी सक्रिय सहभाग देण्याची वेळ आता आली आहे. मी काय करू शकतो, माझ्या सहभागामुळे असा कोणता फरक पडणार आहे, ते सरकारचे काम आहे. ही भूमिका सर्वसामान्य माणसाने सोडून देण्याची वेळ आता आली आहे. तापमानवाढ कमी करण्यासाठी जगातील सरकारे जेवढा वाटा उचलू शकतात, त्यापेक्षा जास्त वाटा सर्वसामान्य एकत्रितरीत्या उचलू शकतात. आपल्या कुटुंबाच्या पातळीवर जीवाश्म इंधनांचा वापर कमी करणे आणि शाश्वत ऊर्जास्रोतांचा वापर वाढविणे, हे प्रत्येकाला शक्य आहे. आपल्या पुढील पिढ्यांसाठी प्रत्येकाने ते करायलाच हवे. अन्यथा, काही काळानंतर निसर्ग हाका ऐकायलाही वेळ देणार नाही !