गोव्यात काय मरायचे?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 08:47 AM2024-09-18T08:47:41+5:302024-09-18T08:47:51+5:30

गोवा किलर स्टेट झाले आहे काय असे गोव्याबाहेरील पर्यटक अलिकडे विचारतात. होय, गोव्याचे रस्ते सध्या रक्ताने माखले आहेत असेच नमूद करावे लागेल.

agralekh What to die in Goa? | गोव्यात काय मरायचे?

गोव्यात काय मरायचे?

गोवा किलर स्टेट झाले आहे काय असे गोव्याबाहेरील पर्यटक अलिकडे विचारतात. होय, गोव्याचे रस्ते सध्या रक्ताने माखले आहेत असेच नमूद करावे लागेल. यात काहीजणांना अतिशयोक्तीही वाटेल, पण तीन दिवसांत सात बळी जातात हे भयावहच आहे. अगदी कोवळ्या वयातील मुलांचे रक्त रस्त्यावर सांडत आहे. यावर्षी जानेवारी ते १६ सप्टेंबरपर्यंत दोनशे व्यक्तींचे बळी रस्ता अपघातात गेले आहेत. यात अनेक युवक आहेत. एकोणीस ते चाळीस वयोगटातील युवा-युवती रस्त्यावर मरत आहेत. कधी टक चालक. बस चालक किंवा चारचाकी कारसारख्या वाहन चालकांचा दोष असतो, तर कधी दुचाकी चालकच पूर्ण दोषी असतात. अत्यंत बेजबाबदारपणे आजचा युवक दुचाक्या चालवतोय. पणजी, दोनापावल, मिरामार, गोवा विद्यापीठ रस्ता, करंजाळे या भागात जाऊन पाहा किंवा मडगाव, फोंडा, डिचोली, मडगाव, वास्को या शहरांना भेट देऊन अभ्यास करा. दुचाकी चालक सुसाट वेगाने जातात. कुठून चार चाकी येतेय किंवा कुठून ट्रक येतोय ते पाहात नाहीत. जिथे छोटी वाट आहे, तिथून घुसण्याचा प्रयत्न करतात. सरकारी यंत्रणा सध्या हप्ते गोळा करण्याच्या कामात बिझी आहे. ते फक्त गोव्याबाहेरील वाहनांना थांबवायचे, महाराष्ट्रातील ट्रकांना अडवायचे किंवा पर्यटकांना छळायचे एवढेच काम करतात. गोवा वाढते वाहन अपघात व वादग्रस्त पोलिसांमुळे बदनाम होत आहे.

वाहन अपघात रोखण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वारंवार वाहतूक पोलिस, आरटीओ, बांधकाम खाते यांच्या बैठका घ्यायला हव्यात. मात्र मुख्यमंत्री तसे करताना दिसत नाहीत. विद्यमान सरकारमधील अधिकाधिक मंत्री आणि मुख्यमंत्रीदेखील देव दर्शनासाठी जास्त वेळ देत आहेत. धार्मिक विधीतच जास्त वेळ जात आहे. गोव्यात महामार्ग बांधले गेले. काही रस्ते सहा पदरी तर काही आठपदरी केले गेले. उड्डाण पूल झाले. बायपासची व्यवस्था केली, पण वाहन चालकांमध्ये शिस्त आलेली नाही. जिथे वाहतूक पोलिस किंवा आरटीओ असायला हवेत तिथे ते नसतातच. पणजीत अटल सेतूवरून दुचाकी नेऊ नये हे पर्यटकांना कळत नाही. त्यांना ते कळावे म्हणून पर्वरीच्याबाजूने पोलिसांनी उभे राहून त्यांना योग्य रस्ता दाखवायला हवा. मात्र पोलिस उभे राहतात मेरशीच्या बाजूने. तुम्ही तिसऱ्या पुलावरून दुचाकीने येण्याचा गुन्हा करा, मग आम्ही तुम्हाला अडवून तालांव देतो, अशा पराक्रमी थाटात पोलिस उभे असतात.

बिचारे पर्यटक आपल्या बायको-मुलांसह रणरणत्या उन्हात तालांव भरताना रोज दिसतात. मुख्यमंत्री सावंत किंवा वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो किंवा डीजीपी वगैरेंना हे चित्र दिसत नाही काय? हा पर्यटकांचा छळ का म्हणून केला जातो? पर्यटकांना तालांव देण्यातच शक्ती वाया घालवणाऱ्या गोवा पोलिसांनी जिथे वाहतूक कोंडी होते किंवा जी अपघातप्रवण स्थळे आहेत, तिथे उभे राहणे गरजेचे आहे. पेडणे तालुका तर अॅक्सिडंट हब झाला आहे. तेथील महामार्गावरील धोकादायक वळणांनी व अन्य जागांनी अनेकांचे बळी घेतले आहेत. रस्त्यांवर खड्डे असले तरी माणसे मरतात आणि रस्ते रुंद व दुरुस्त झाले तरी अपघात घडतात. दारू पिऊन वाहन चालवणारे गोव्यात कमी नाहीत.

सायंकाळनंतर तर काही मार्गावर वाहन चालविणे धोकादायकच. आई वडील तरुण मुलाला आधुनिक पद्धतीची दुचाकी घेऊन देतात. ही मुलं वाट्टेल तशी दुचाकी उडवतात. अल्कोमीटरने वाहन चालकांची तपासणी करण्याचे काम सरकारी यंत्रणेने पुन्हा बंद केले आहे. रस्त्यांवरील वळणे कापणे किंवा धोकादायक पद्धतीने उभे असलेले वीजखांब अन्यत्र हलविणे हे काम यंत्रणा करत नाही. सरकारला फक्त कोट्यवधींच्या उधळपट्टीचे सोहळे करण्यात रस आहे. गेल्या साडेआठ महिन्यांत एकूण १ हजार ८०० वाहन अपघात झाले आहेत. १९० अपघात भीषण आहेत. कुणी अपंग झाले तर कुणी कायमचे जीवास मुकले. प्रत्येक तीन दिवसांत हेल्मेट नसलेला एक दुचाकी चालक गोव्यात ठार होतोय ही सरकारी आकडेवारी आहे. २०२१ ते २०२३ पर्यंत साडेतीनशे दुचाकीस्वार प्राणास मुकले, ज्यांनी हेल्मेट घातले नव्हते. गोवा किलर स्टेट नाही, हे दाखवून देण्यासाठी सरकारलाच आता कडक उपाययोजना करावी लागेल.

Web Title: agralekh What to die in Goa?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.