शेती शाळेत शिकवली जायलाच हवी, कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 08:00 AM2021-09-03T08:00:04+5:302021-09-03T08:00:20+5:30

शेती शास्त्राचा गंध नसलेले शेतकरी आणि शेतीबद्दल उदासीन असलेले अधिकारी शेतीला कसे काय तारू शकतील?- हे चित्र बदलले पाहिजे!

Agriculture must be taught in school pdc | शेती शाळेत शिकवली जायलाच हवी, कारण...

शेती शाळेत शिकवली जायलाच हवी, कारण...

googlenewsNext

-प्रा. तुकाराम बिडकर

२००४. मी अकोला जिल्हा परिषदेचा कृषी सभापती असताना  राज्यातील सर्व कृषी व पशुसंवर्धन सभापतींच्या परिषदेत ‘कृषी विषय हा शालेय शिक्षणामध्ये समाविष्ट करावा,’ असा ठराव मांडला, तो  सर्वानुमते संमतही झाला. त्यापूर्वीपासूनच  मी या विषयासाठी प्रयत्न करीत होतो. या प्रयत्नाला अखेर यश आले आहे. ‘शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे’ असे म्हटले जाते. ‘शेतकरी पिकवतो, म्हणून जग खाते’ हेही खरेच! आपल्या देशातील मुख्य व्यवसाय हा शेती आहे. करोडो लोकांना यातून रोजगार मिळतो. कोरोनाच्या काळात सर्व उद्योग बंद असताना  सुरू राहिला तो ‘कृषी उद्योग’.

सामान्यत: प्रत्येक उद्योगाच्या निर्मितीसाठी त्या धंद्याचे शिक्षण,  प्रशिक्षण घेतले जाते; पण दुर्दैवाने शेती  करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे शास्त्रशुद्ध शिक्षण, प्रशिक्षण दिले जात नाही. पारंपरिक पद्धतीनेच शेती केली जाते.  आज ‘कृषी शिक्षण’ मिळते ते फक्त  मोजक्याच लोकांना.  त्यातही हे शिक्षण घेणारे बहुतांश नोकरीकडे किंवा इतर उद्योगाकडे  वळतात. ते प्रत्यक्ष शेतीत क्वचितच येतात.  कृषी विद्यापीठे  व कृषी विभाग  शेतकऱ्यांना मार्गदर्शन  करण्यास  अकार्यक्षम ठरले आहे. आज शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो तो ‘कृषी सेवा केंद्रा’चा व्यावसायिक. त्यांच्या भरोशावर आजचा  शेतकरी शेती करताना दिसतो.  

अर्थात ‘कृषी सेवा केंद्र’ जे  सांगणार त्यामध्ये  त्यांच्या कंपनीचे व त्यांचेच हित असेल. पर्यायाने शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढत जातो अन् उत्पन्न कमी होऊन शेतकरी नागवला जातो. शिक्षित नसल्यामुळे शेतकऱ्यांचे संघटन होत नाही; आणि संघटन नसल्यामुळे शासन दरबारी त्यांचे प्रश्न सुटत नाहीत.  खरी गंभीर बाब म्हणजे आजच्या शिक्षण पद्धतीने शेतकऱ्याचा मुलगा शेतीपासून तोडला आहे. तो शेती करायला तयार नसतो. नोकरीच्या मागे धावतो.

नोकरी मिळाली नाही तरच नाइलाजाने,  जबरदस्तीने त्याला शेती करावी लागते. मग अशा  मानसिकतेच्या शेतकऱ्याकडून प्रगत शेती कशी होणार?  शेवटी तो शेतकरी विवंचनेत व आर्थिक डबघाईत  पुरता अडकला जातो. अशातच  आज अनेक उपक्रम व  प्रकल्पांमुळे ‘उपजाऊ’ जमीन कमी होत आहे. बाकी सगळे मिळेल; पण अतिरिक्त जमीन कोठून आणणार?  हे फार मोठे संकट  भविष्यात  निर्माण होणार आहे. पूर्वी म्हण होती ‘उत्तम शेती, मध्यम व्यापार अन् कनिष्ठ नोकरी’ परंतु आज हे चक्र उलटे झाले असून, शेती ही कनिष्ठ तर नोकरी ही उत्तम झाली आहे.  म्हणून शेती व्यवसायाकडे शेतकऱ्यापासून तर शासनापर्यंत सर्वांनी  लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. 

 शेतीला उत्तम करायचे  असेल तर प्रत्येकाला पहिल्या वर्गापासून तर  दहाव्या  वर्गापर्यंत शेती शिक्षणासोबतच  पशुसंवर्धन, दुग्धविकास,  मत्स्यपालन,  कृषी विज्ञान,  फलोत्पादन,  कृषी अभियांत्रिकी इत्यादी अनेक विषयांचे ज्ञान द्यावे लागेल.  प्रत्यक्ष शेती करणाऱ्यांना आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्यांना शेतीची सविस्तर माहिती होणे गरजेचे आहे.  त्याकरिता ‘शेतीचे शिक्षण’ ही काळाची गरज आहे. त्यातून सुशिक्षित शेतकरी निर्माण होतील, शेतीचे अर्थशास्त्र सर्वांना समजेल, शेती समृद्धीकडे जाईल. आजची कोरडवाहू शेती म्हणजे फार मोठा ‘जुगार’ आहे याचीही जाणीव समस्त जणांना आपसूकच  होईल. या दृष्टचक्रातून मग शेतकऱ्याला कसे बाहेर काढता येईल याचा निश्चितच विचारसुद्धा होऊ शकेल. कोणताही व्यवसाय फायद्याचा असला तरच तिकडे लोक जातात; म्हणून शेती हा  फायद्याचा धंदा आहे, हे सिद्ध करावं लागेल. 

‘शेतीला उत्तम’ करण्यासाठी उत्पादन खर्च कमी करणे व जास्त उत्पन्न मिळवणे, नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे,   शेत मालाला हमी भाव देणे,  शेतीला उद्योगाचा दर्जा देणे, उत्तम बियाणे, खतनिर्मिती करणे, शेत मालावर प्रक्रिया उद्योग उभे करणे, प्रक्रिया केलेल्या शेतमालाची निर्यात करणे, त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे इत्यादी महत्त्वाच्या बाबी  करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला ‘शेतीचे शिक्षण मिळणे’ हाच आता यावर रामबाण उपाय ठरणार आहे. सध्याच्या पारंपरिक, प्रचलित  शिक्षण पद्धतीतून तयार झालेले शेतकरी,  शेती शास्त्राचा गंध नसलेले अधिकारी अन् शेतीबद्दल उदासीन असलेले पदाधिकारी शेतीला कसे काय तारू शकतील? त्यासाठी  शालेय शिक्षणात ‘शेती विषय’ हा सक्तीचा करणे हाच आता सक्षम पर्याय  आहे.

Web Title: Agriculture must be taught in school pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी