अहिल्यादेवी : गंगाजल निर्मल तत्त्वज्ञानी राज्यकर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 05:41 AM2018-05-31T05:41:55+5:302018-05-31T05:41:55+5:30

ग्रीक विचारवंत प्लेटो याने तत्त्वज्ञानी राज्यकर्ता या विषयाची चर्चा सुरू केली. युरोपात नागरिकशास्त्रात या संकल्पनेचा समावेश झाला. पण युरोपीय विचारवंतांना तत्त्वज्ञानी राजाचे उदाहरण युरोपच्याच नव्हे

Ahilya Devi: Gangajal Nirmal philosopher statesman | अहिल्यादेवी : गंगाजल निर्मल तत्त्वज्ञानी राज्यकर्ती

अहिल्यादेवी : गंगाजल निर्मल तत्त्वज्ञानी राज्यकर्ती

Next

प्रा. राम शिंदे
मंत्री, जलसंधारण आणि ओबीसी विभाग, महाराष्ट्र

ग्रीक विचारवंत प्लेटो याने तत्त्वज्ञानी राज्यकर्ता या विषयाची चर्चा सुरू केली. युरोपात नागरिकशास्त्रात या संकल्पनेचा समावेश झाला. पण युरोपीय विचारवंतांना तत्त्वज्ञानी राजाचे उदाहरण युरोपच्याच नव्हे, तर संपूर्ण जगाच्या इतिहासात सापडेना. अशी उदाहरणे हिंदुस्थानच्या पुराणकाळात सापडली. जनकराजा, राम, कृष्ण, युधिष्ठिर, नल हे तत्त्वज्ञानी राजे सापडले. हिंदुस्थानच्या अलीकडच्या इतिहासात त्यांना राजा सापडेना. पण तत्त्वज्ञानी महाराणी मात्र सापडली. ती महाराणी म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर.
अहिल्यादेवींचा जन्म दि. ३१ मे, १७२५ रोजी चोंडी (ता. जामखेड, जिल्हा अहमदनगर) येथे झाला. मानकोजी शिंदे हे त्यांचे वडील. मल्हारराव होळकरांनी बाल अहिल्येचे गुण ओळखले. सून म्हणून त्यांनी अहिल्येला होळकरांच्या घरात नेले. अहिल्यादेवीचे पती खंडेराव यांना कुंभेरीच्या युध्दात लढताना वीरमरण आले आणि अहिल्यादेवींवर माळवा प्रांताच्या राज्यकारभाराची जबाबदारी पडली. १ डिसेंबर, १७६७ रोजी त्यांनी राज्यकारभार हातात घेतला. मृत्यू येईपर्यंत (१३ आॅगस्ट, १७९५) त्या राज्य करीत होत्या.
मध्य प्रदेशातल्या महेश्वर या नर्मदा नदीच्या काठी त्यांनी माळवा राज्याची राजधानी नेली. इंदूर या छोट्या गावाचे रूपांतर सुंदर, समृध्द शहरात केले. महेश्वर हे राजधानीचे शहर आधुनिक बनवले. कापड उद्योग भरभराटीला आणला. ३० वर्षांच्या अहिल्यादेवींच्या राज्यात महेश्वर हे शहर उद्योगाचे केंद्र होते. साहित्य, मूर्तिकला, संगीत आणि इतर कलांना अहिल्यादेवींनी राजाश्रय दिला. कवी मोरोपंत, शाहीर अनंत फंदी आणि संस्कृत पंडित खलासीराम या त्यावेळच्या प्रभृतींना अहिल्यादेवींनी प्रोत्साहन दिले.
जोना वेल्ली या स्कॉटिश नाटककार आणि कवयित्री अहिल्यादेवींच्या समकालीन होत्या. त्यांनी अहिल्यादेवींविषयी कविता केली. त्यांनी म्हटले की, अहिल्यादेवींची प्रशंसा त्यांच्या राज्यातील प्रत्येक जण करीत असे. सारेच लोकमातेला देवीचा अवतार मानत. अहिल्यादेवींच्या रूपाने देव राज्य करतोय, अशी प्रजेची भावना होती. त्या जगातल्या एकमेव तत्त्वज्ञानी महाराणी आहेत, असे जॉन की या इंग्रज विचारवंताने म्हटलेले आहे. तर जे माल्कन या विचारवंताने त्यांचा ‘संत सम्राज्ञी’ म्हणून गौरव केला आहे.
स्वत: अहिल्यादेवी म्हणत, प्रजेला सुखी ठेवण्याची जबाबदारी देवाने माझ्यावर टाकली आहे. सामर्थ्य आणि सत्तेच्या बळावर जे मी करतेय त्याचा जबाब मला देवाला द्यायचाय.
राज्याचा पैसा त्यांनी स्वत:साठी, कुटुंबासाठी कधी वापरला नाही. याबद्दल त्यांचा कडक नियम होता. स्वत:च्या निर्वाहासाठी त्यांनी खासगी निधी तयार केला. लोककल्याणासाठी त्यांनी सरकारी निधी भरभरून खर्च केला. त्यांनी राज्यकारभाराला शिस्त लावली. प्रभावी प्रशासक होत्या. प्रजेचे दररोज म्हणणे ऐकून घेत. त्यांना मदत करत. अडचणी तात्काळ सोडवत.
त्यांनी हिमालयापासून तर कन्याकुमारीपर्यंत नद्यांवर घाट, मंदिरे, तलाव, रस्ते, पूल, विहीर, धर्मशाळा बांधल्या. भारतातल्या सर्व ठिकाणच्या महत्त्वाच्या तीर्थस्थळांवरील मंदिरांचा जीर्णोध्दार केला. किती धार्मिक तीर्थस्थळांना देणग्या दिल्या, याची यादी खूप मोठी आहे. जवळपास सर्वच महत्त्वाच्या तीर्थस्थळांना त्यांनी दान दिले. त्यांनी माळवा राज्य समृध्द आणि सुखी केले. भिल्ल, गोंड या जातींना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी त्यांना शेती देऊन शेतकरी बनवले.
अहिल्यादेवी लोकांसोबत सण-उत्सव साजरे करीत. विधवा महिलांना पतीच्या संपत्तीत वाटा मिळावा आणि त्यांना मूल नसेल तर ते दत्तक घेता यावे, यासाठी त्यांनी मदत केली. अठराव्या शतकात महिला सक्षमीकरणाचा असा प्रयत्न करताना अहिल्यादेवींची पुरोगामी दृष्टी किती पुढची होती, याचा प्रत्यय येतो.
आपली प्रजा धार्मिक, सामाजिक, भौतिक अशा तिन्ही स्तरांवर सुखी व्हावी, असा त्यांचा ध्यास होता. म्हणूनच त्यांच्या हयातीतच लोक त्यांचा लोकमाता, गंगाजल निर्मळ म्हणजे गंगा नदीच्या पाण्यासारख्या निर्मळ आणि पवित्र राज्यकर्त्या असा गौरव करू लागले.
अहिल्यादेवींना त्यांच्या हयातीतच प्रजेने पुण्यश्लोक ही पदवी दिली. पुण्यश्लोक म्हणजे ज्या व्यक्तीजवळ पुण्याचा महान साठा आहे ती लोकोत्तर व्यक्ती. युधिष्ठिर (धर्म) आणि नल या दोन राजानंतर कुणाही राजाचे वर्णन पुण्यश्लोक असे केले गेले नव्हते. आधुनिक इतिहासात फक्त अहिल्यादेवींच्या वाट्याला पुण्यश्लोक हा गौरव आला. दानशूरपणाच्या बाबतीतही त्यांच्याइतका दानशूर राजा किंवा राणी आधुनिक किंवा प्राचीन इतिहासात कुणी सापडत नाही.
आदर्श राज्यकर्त्या, पुण्यश्लोक, लोकमाता अहिल्यादेवी थोर राजकारणीही होत्या. सन १७७२ मध्ये त्यांनी पेशव्यांना इंग्रज हा शत्रू सर्वांत भयंकर आहे, वेळीच सावध व्हा, असा इशारा दिला होता. यातून त्यांचा धोरणीपणा किती उच्च दर्जाचा होता, हे दिसते. उत्तर भारताच्या त्यावेळच्या राजकारणात महादजी शिंदे यांना अहिल्यादेवींनी मदत केली. त्यामुळे मराठा सरदारांचा उत्तरेत दबदबा निर्माण झाला, महत्त्व वाढले. अहिल्यादेवींच्या या मुत्सद्दीपणाचा गौरव थोर इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी केला आहे.
हैदराबादच्या निजामानेही अशी थोर राज्यकर्ती आजवर पाहिली नाही, असा उल्लेख त्यांच्याबद्दल केला होता. काशी विश्वनाथाच्या मंदिराचा प्रश्नही त्यांनी संयम, समयसूचकतेने सोडवला. मंदिर-मशिदीवरून हिंदू-मुस्लीम यांच्यात निर्माण झालेला संघर्ष संपवण्यासाठी त्यांनी मशिदीच्या बाजूला जमीन खरेदी करून तेथे विश्वनाथाचे मंदिर उभारले.
अहिल्यादेवी यांच्या थोर वंशात माझा जन्म झाला याचा मला अभिमान आहे. अहिल्यादेवी यांचा महान वारसा पुढे नेण्याचे काम निरंतर करीत राहणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे. दरवर्षी ३१ मे रोजी उत्सव समिती महामेळावा घेत असते. सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन हा लोकोत्सव साजरा करतात.

Web Title: Ahilya Devi: Gangajal Nirmal philosopher statesman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.