पाकिस्तानात होतो अहमदियांचा छळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 05:02 AM2020-10-10T05:02:00+5:302020-10-10T05:02:33+5:30

असुरक्षितता आणि भीतीमुळे पाकिस्तानात अहमदिया समाजातील लोक वेगळे, एका विशिष्ट भागात राहतात. त्यांना त्यांच्या प्रार्थनास्थळाला मस्जिददेखील म्हणता येत नाही.

Ahmadis are persecuted in Pakistan | पाकिस्तानात होतो अहमदियांचा छळ

पाकिस्तानात होतो अहमदियांचा छळ

Next

- जतीन देसाई, ज्येष्ठ पत्रकार

पाकिस्तानात सर्वात जास्त छळ अहमदिया समाजाचा होत आहे. अहमदिया स्वत:ला मुस्लीम मानतात; पण ते मुस्लीम असल्याचं पाकिस्तानला मान्य नाही. १९७४ मध्ये झुल्फिकार अली भुत्तो पाकिस्तानचे पंतप्रधान असताना त्यांनी अहमदिया मुस्लीम नसल्याचं जाहीर केलं आणि त्यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती केली. अहमदिया या पंथाची सुरुवात १९व्या शतकात पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यातील कादियान नावाच्या गावातून झाली. हा समाज प्रामुख्याने पाकिस्तान आणि भारतात आहे. भारताच्या फाळणीनंतर मोठ्या संख्येत अहमदिया पाकिस्तानात गेले.

पाकिस्तानच्या जुन्या ऐतिहासिक शहर पेशावरात ५ ऑक्टोबरला डॉ. नईमुद्दीन खटक नावाच्या अहमदिया समाजातील प्राध्यापकाची हत्या करण्यात आली. एक-दोन दिवस आधी फारूक साद नावाच्या एका लेक्चररसोबत धार्मिक मुद्द्यावरून त्यांचा वाद झालेला. साद त्यांच्या हत्येचा मुख्य आरोपी आहे. पेशावर शहरात गेल्या तीन महिन्यांत तीन अहमदियांची हत्या करण्यात आली आहे. २९ जुलैला धर्मनिंदा कायद्याखालील आरोपी ताहीर अहमदची एका तरुणाने न्यायालयात हत्या केली होती. ताहिर अहमदिया होता. न्यायालयात हत्यारा पिस्तूल कसा घेऊन गेला, हे रहस्यच आहे. ताहिर अमेरिकन नागरिक होता आणि त्याची मानसिक स्थिती चांगली नव्हती.

अहमदिया समाजाचा पाकिस्तानच्या स्थापनेत आणि विकासात मोठा वाटा आहे. पाकिस्तानचे पहिले परराष्ट्रमंत्री सर जफरउल्ला खान अहमदिया होते. २३ मार्च १९४० रोजी लाहोर येथील मुस्लीम लीगच्या अधिवेशनात मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्राची मागणी करणारा जो ठराव मंजूर करण्यात आलेला तो बनवण्यात जफरउल्ला खानची महत्त्वाची भूमिका होती. पाकिस्तानचे पहिले नोबेल पुरस्कार विजेते डॉक्टर अब्दुस सलामपण अहमदिया होते. सुरुवातीला अहमदिया समाजाला पाकिस्तानच्या लष्कर, नोकरशाही वगैरेत महत्त्वाचे स्थान मिळत असे.

१९५३ला जमात-ए-इस्लामी आणि काही कट्टर धार्मिक मुस्लीम संघटनांनी अहमदिया मुस्लीम नसल्याचं सरकारने जाहीर करावं, अशी मागणी सुरू केली. लाहोर आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील काही शहरात अहमदिया समाजाच्या लोकांची हत्या करण्यात आली. लष्कराने नंतर अहमदिया विरोधी आंदोलन चिरडून टाकलं. पण जमात-ए-इस्लामी इत्यादींचे प्रयत्न सुरूच राहिले. १९७०च्या दरम्यान परत अहमदियांच्या विरोधात आंदोलनं सुरू झाली. मुल्ला-मौलवींचा दबाव तेव्हाच्या पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तोंवर वाढत होता. शेवटी १९७४ला त्यांनी अहमदिया मुस्लीम नसल्याचं जाहीर केलं. अहमदियांचा समावेश धार्मिक अल्पसंख्याकांत करण्यात आला. अहमदियांबद्दल बऱ्याचदा पाकिस्तानात उघडं उघडं ‘वाजिब-ए-कत्ल’ (त्यांची हत्या समर्थनीय आहे) म्हटलं जातं.

इस्लामचा पंथ असलेल्या अहमदिया समाजाची स्थापना १८८९ ला मिर्झा गुलाम अहमदने केली होती. जगात एकूण दीड कोटी अहमदिया असल्याचं म्हटलं जातं. पाकिस्तानात जवळपास ४० लाख तर भारतात अंदाजे दोन लाख अहमदिया आहेत. मिर्झा गुलाम प्रेषित असल्याचं अहमदिया मानतात. त्यांच्यात आणि अन्य मुस्लिमांमध्ये हा फरक आहे. मोहम्मद पैगंबर हे शेवटचे प्रेषित असल्याचं मुस्लीम मानतात. दरवर्षी डिसेंबर महिन्यात कादियान येथे जगभरातून अहमदिया गोळा होतात.

असुरक्षितता आणि भीतीमुळे पाकिस्तानात अहमदिया समाजातील लोक वेगळे, एका विशिष्ट भागात राहतात. त्यांना त्यांच्या प्रार्थनास्थळाला मस्जिददेखील म्हणता येत नाही. बांगलादेशात काही कट्टर संघटना अहमदिया मुस्लीम नसल्याचं सरकारने जाहीर करावं, अशी मागणी अधून-मधून करतात. कुठल्याही समाजाचा छळ होता कामा नये. रोहिंग्यांचा म्यानमार येथे छळ होतो. शांततापूर्ण सह-अस्तित्व सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे.

Web Title: Ahmadis are persecuted in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.