अहमद ओमर सईद शेख सुटला, त्याची पाकिस्तानी गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 07:40 AM2021-02-05T07:40:49+5:302021-02-05T07:41:17+5:30

ख्यातनाम पत्रकार डॅनिअल पर्ल यांच्या हत्येचा आरोप असलेला ओमर शेख सहीसलामत ‘सुटला’, त्याच्या डोक्यावर नक्की कोणाकोणाचे हात असावेत?

Ahmed Omar Saeed Sheikh released, his Pakistani story! | अहमद ओमर सईद शेख सुटला, त्याची पाकिस्तानी गोष्ट!

अहमद ओमर सईद शेख सुटला, त्याची पाकिस्तानी गोष्ट!

googlenewsNext

मेघना ढोके, मुख्य उपसंपादक

अहमद ओमर सईद शेख. ‘द टाइम्स’ नावाच्या वृत्तपत्रानं त्याच्याविषयी स्पष्ट लिहिलं होतं की, ‘हा माणूस म्हणजे काही साधासुधा दहशतवादी नव्हे, त्याची उठबैस पाकिस्तानी सैन्य दलासह सत्तेतल्या उच्चस्तरीय वर्तुळात तर आहेच, पण दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या आतल्या गोटातही त्याचा समावेश होतो.’ त्याच ओमर शेखची पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने परवाच तुरुंगातून मुक्तता केली आणि त्याला ‘सरकारी’ विश्रामगृहात नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले. हा निर्णय देताना न्यायाधीश ओमर अता बंदियाल म्हणतात, ‘त्याला सुखकर ‘घरच्यासारख्या’ सोयीसुविधा असलेल्या वातावरणात ठेवा, जिथं त्याला नॉर्मल आयुष्य जगता येईल असं विश्रामगृह पहा!’ एवढंच नव्हे तर त्याच्या कुटुंबीयांना दर दिवशी (फक्त) नऊ तास त्याला भेटण्याची परवानगी देण्यात आली. फक्त  फोन वा इंटरनेट वापरायला तेवढी बंदी आहे, आणि अर्थातच देश सोडून जाण्यालाही! 

अमेरिकेतील वॉल स्ट्रीट जर्नलचे ख्यातनाम पत्रकार डॅनिअल पर्ल यांची हत्या केल्याचा ओमर शेखवर आरोप आहे. २००२ ची ही घटना. त्याप्रकरणी सिंधच्या उच्च न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २००२ पासून तो तसा तुरुंगातच होता, मात्र अलीकडेच शिक्षेविरोेधात ओमर शेखने सर्वोच्च न्यायालयात अपील केलं होतं, आता न्यायालयाने त्याला तुरुंगातून मुक्त(च) केलं आहे. 
आजवरचा त्याचा तुरुंगवास म्हणजेही सर्वथा ‘सेफ पॅसेज’ आहे अशी चर्चा होतीच. प्रत्यक्षात त्याच्या डोक्यावर पाकिस्तानी लष्कराचा हात कायम होता. त्याचा पुरावा म्हणजे पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने २००८ मध्ये दिलेलं वृत्त. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्यावेळी ओमरने तुरुंगात बसून तत्कालीन पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष झरदारी यांना फोन केले होते. तेही स्वत: तत्कालीन भारतीय विदेश मंत्री प्रणब मुखर्जी असल्याचं सोंग वठवून. भारत पाकिस्तानवर हल्ला करणार असल्याचंही त्यानं सांगितलं आणि त्याचा परिणाम म्हणून पाकिस्तानच्या सर्व प्रमुख शहरांवर सैनिकी हेलिकॉप्टर्स गस्त घालू लागली. त्यानं भारतात विदेश मंत्र्यांना आणि अमेरिकन विदेश सचिवांनाही फोन करण्याचा तेव्हा प्रयत्न केला होता. ओमरला तुरुंगात मोबाइल फोन, सीमकार्डसह पुरवले जातात असं ‘डॉन’नेच आपल्या बातमीपत्रात म्हटलं होतं. जो ओमर शेख तुरुंगात बसून हे उद्योग करु शकतो, त्याला आता ‘नजरकैदेत’ ठेवताना इंटरनेट आणि मोबाइल फोन वापरण्यास बंदी आहे यावर पाकिस्तानातले लोकही विश्वास ठेवायला तयार नाहीत.

मुळात दहशतवादी हे गरीब घरातले, वाट चुकलेले, शिक्षण नसलेले तरुण असतात या समजाला ओमरने त्या काळात धक्का दिला होता.  पाकिस्तानी वंशाचा हा मुलगा जन्मला वाढला, तो इंग्लंडमध्ये. एका सुस्थित घरात. अभ्यासात हुशार. त्याला पाच भाषा अस्खलित बोलता येतात. लंडन स्कूल ऑफ इकॉनाॅमिक्समध्ये शिकतानाच तो दहशतवादी कारवायांशी जोडला गेला. पाकिस्तानात आणि अफगणिस्तानात त्याचं प्रशिक्षण झालं. १९९७ साली काश्मीरमध्ये घुसखोरी करत तो भारतात आला. पकडलाही गेला. १९९७ ते १९९९ या दरम्यान तो भारतीय तुरुंगात होता. मात्र कंदहार विमान अपहरण प्रकरणात जे तीन अतिरेकी सोडण्यात आले त्यात मसूद अझहर सोबत हा ओमर शेखही होता. २००२ च्या संसदेवरील हल्ल्यातही त्याचा हात असल्याचा संशय आहे. पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांच्या हत्येचा कट रचल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. मात्र आजवर त्याच्यावर पाकिस्तानी सैन्यातील उच्चपदस्थांचा आशीर्वाद कायम राहिला, एकेकाळी पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख असलेले जनरल परवेज मुशर्रफ तर म्हणतात, ब्रिटिश गुप्तचर संस्थेनंच त्याला दहशतवादी कारवायांसाठी सर्वप्रथम भरती केलं होतं. ओमर एकतर लबाड तरी आहे नाहीतर डबल एजंट तरी!’ अमेरिकेत सत्ताबदल होत असतानाच ओमरवर ही मेहेरनजर का? - असे प्रश्न पाकिस्तानात माध्यमच नाही तर समाजमाध्यमातही लोक विचारत आहेत. मात्र अशा प्रश्नांची उत्तरं नसतात.. असतात ती फक्तं बदलती आंतरराष्ट्रीय समीकरणं!

Web Title: Ahmed Omar Saeed Sheikh released, his Pakistani story!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.