अहमदनगरची चित्रनगरी

By admin | Published: March 2, 2017 12:06 AM2017-03-02T00:06:00+5:302017-03-02T00:06:00+5:30

अहमदनगरसारख्या ग्रामीण भागातून फॅन्ड्री, सैराट, ख्वाडा, घुमा हे चित्रपट साकारले.

Ahmednagar's Picture Nagri | अहमदनगरची चित्रनगरी

अहमदनगरची चित्रनगरी

Next


अहमदनगरसारख्या ग्रामीण भागातून फॅन्ड्री, सैराट, ख्वाडा, घुमा हे चित्रपट साकारले. खेड्यातील मुले दिग्दर्शक बनताहेत व आपल्या गावातच चित्रपटाची निर्मिती करताहेत. चित्रपटसृष्टी व सरकार या दोघांनाही या बदलाची नोंद घ्यावी लागेल. त्यासाठी सुविधा द्यावा लागतील.
कोल्हापूरची कलानगरी म्हणून ओळख आहे. एकेकाळी या कलानगरीने दर्जेदार कलावंत व चित्रपट दिले. मुंबई ही तर सिनेमाची मायानगरीच आहे. मात्र, आता हा सिनेमा नगरसारख्या ग्रामीण भागातही बनू लागला आहे व तो दखलपात्रही ठरतो आहे. गत महिन्यात पुण्यात झालेल्या १५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) नगरच्या मातीत तयार झालेला ‘घुमा’ या चित्रपटाला ‘बेस्ट आॅडियन्स अवॉर्ड’ मिळाला.
नगरला कलेचा जुनाच वारसा आहे. रंगभूमीवर नगरच्या शाहू मोडक यांनी सर्वप्रथम कृष्णाची भूमिका साकारली. कृष्ण हा मोडकांच्या रूपात प्रेक्षकांनी प्रथम पाहिला.
नाटककार प्रा. मधुकर तोरडमल यांचा प्राध्यापक ते नट हा प्रवास नगरच्याच भूमीतील. त्यांनी नगरला असताना ‘काळे बेट लाल बत्ती’ लिहिले जे राज्य नाट्यस्पर्धेत प्रथम आले. सदाशिव अमरापूरकर, मधू कांबीकर, राम नगरकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, रघुवीर खेडकर, मिलिंद शिंदे असे अनेक सिने, नाट्य व तमाशा कलावंत नगरी भूमीने दिले. प्रभाकर पणशीकर यांच्या ‘तो मी नव्हेच’ या नाटकातील फिरता रंगमंच हा नगरच्याच वस्तुसंग्रहालयात जतन करण्यात आला आहे.
हा वारसा आता चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातही पुढे जाताना दिसतो आहे. नगरलाच प्रशिक्षण घेऊन अनेक तरुण चित्रपटसृष्टीत पुढे येत आहेत. नागराज मंजुळे हे त्यातील पहिले उदाहरण. मंजुळे यांनी नगरला संज्ञापनशास्त्राचे शिक्षण घेतानाच ‘पिस्तुल्या’ हा लघुपट साकारला. या लघुपटास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांच्या ‘फॅन्ड्री’चे सगळे चित्रीकरण नगरला झाले. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक विक्रम प्रस्थापित केलेल्या ‘सैराट’चाही काही भाग नगर जिल्ह्यात चित्रित झाला. भाऊराव कऱ्हाडे यांच्या ‘ख्वाडा’चे बहुतांश चित्रीकरणही नगर जिल्हा व शिरुर या ग्रामीण भागात झाले. ‘परतू’, ‘गणवेश’ व प्रदर्शनाच्या वाटेवर असलेले ‘घुमा’ अणि ‘भॉ’ यांचे सर्व चित्रीकरणही नगरलाच झाले.
तांत्रिक बाबी सोडल्या तर चित्रीकरणासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा निर्माण करून या दिग्दर्शकांनी नगरसारख्या ग्रामीण भागाला चित्रनगरी बनविले. आहे त्या साधनसामग्रीचा वापर करत त्यांनी ही निर्मिती केली. मुंबईसारख्या मोठ्या शहरांतच दर्जेदार सिनेमा साकारू शकतो या समजुतीला यातून छेद दिला गेला आहे. ‘पिफ’मध्ये पुरस्कार मिळविलेल्या ‘घुमा’चा दिग्दर्शक महेश काळे हा खेड्यात राहतो. स्थानिक कलाकार घेऊन त्याने सिनेमा बनविला. मंजुळे, कऱ्हाडे हे सगळेच प्रतिकूलतेवर मात करून दिग्दर्शक बनले व सिनेमांचे निर्माते झाले. कऱ्हाडे यांनी तर जमीन विकून चित्रपटात पैसे लावले. या चित्रपटांच्या माध्यमातून अनेकांना रोजगार व संधी मिळाली.
‘मेक इन इंडिया’ म्हणतात तो हाच तर आहे. त्यामुळे कलाक्षेत्रात मोठ्या शहरांमध्ये गुंतवणूक करताना नगरसारख्या जिल्ह्यांकडेही राज्यकर्त्यांना यापुढे लक्ष द्यावे लागेल. सिनेमा उद्योगाला आता ग्रामीण भागातही संधी आहेत. जिल्ह्यातील लोकधुरिण व शासनालाही या बाबीचा विचार करावा लागेल. दुर्दैवाने जिल्ह्यातील राजकारण्यांनी याकडे म्हणावे तसे गांभीर्याने पाहिलेले नाही. साखर कारखाने, सोसायट्या या घिसेपिटे राजकारणातून नेते अद्याप बाहेर पडायला तयार नाहीत. ‘सैराट’सारखे चित्रपट आपल्या खुर्द-बुद्रूकमध्ये निर्माण होऊ शकतात, याचे आकलन राजकीय व प्रशासकीय क्षेत्राला करून घ्यावे लागेल.
नगर शहराजवळ पिंपळगाव माळवी तलाव आहे. या तलावाच्या परिसरात महापालिकेच्या मालकीची ७०० एकर जमीन आहे. या जमिनीवर चित्रपटनगरी साकारावी, असा प्रस्ताव मध्यंतरी येथील जिप्सी प्रतिष्ठानने जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. या प्रस्तावावर प्रशासन व सरकार या दोघांनीही विचार करावा, असे वातावरण जिल्ह्यात निर्माण होत आहे.
- सुधीर लंके

Web Title: Ahmednagar's Picture Nagri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.