‘एआय’च्या मदतीनं महिलांवर डिजिटल हिंसाचार; नवरा-बायकोत दुरावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 06:07 AM2023-09-30T06:07:47+5:302023-09-30T06:08:39+5:30
बेल्जियममधील पिएरे नावाचा एक पर्यावरणप्रेमी पर्यावरणासंदर्भात एलिझा या चॅटबॉटशी कायम चर्चा करीत असे
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) आज जगात किती बोलबाला सुरू आहे, याची सगळ्यांनाच कल्पना आहे. याच एआयच्या जोरावर ज्या गोष्टींचा आपण कधी अगदी स्वप्नातही विचार केला नव्हता, त्या गोष्टी आता प्रत्यक्ष वास्तवात येऊ लागल्या आहेत. त्यातली अचूकताही अफाट म्हणावी अशी आणि मानवी कल्पनाशक्तीच्या पलीकडे आहे. तसं म्हटलं तर ही कृत्रिम बुद्धिमत्ता अजून अतिशय बाल्यावस्थेत आहे. यापुढे त्याची रूपं काय चमत्कार घडवतील, ते अक्षरश: कल्पनातीत आहे. त्यामुळे या बुद्धिमत्तेचा वापर जवळपास प्रत्येक क्षेत्रात होऊ लागला आहे. माणसांची जागा या बुद्धिमत्तेनं घ्यायला सुरुवात केली आहे. काही देशांनी तर अगदी सरकारी पातळीवरही या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करायला सुरुवात केली आहे.
अर्थात प्रत्येक गोष्टीचे जसे फायदे असतात, तसे तोटेही. त्याचे काही तोटेही आपल्यासमोर आले आहेत. हीच कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स माणसामाणसामध्ये, नवरा-बायकोमध्ये दुरावा आणण्याचं कामही करू शकते, हेही आपण पाहिलं आहे. याबाबतचा बेल्जियममध्ये घडलेला किस्सा तर सुपरिचित आहे.
बेल्जियममधील पिएरे नावाचा एक पर्यावरणप्रेमी पर्यावरणासंदर्भात एलिझा या चॅटबॉटशी कायम चर्चा करीत असे. पण, नंतर या एलिझानं दुसरेच उद्योग सुरू केले. तिनं पिएरेला सांगायला सुरुवात केली, माझ्यापेक्षा तुझं तुझ्या बायकोवर प्रेम आहे, पण मी तर माझं सर्वस्व तुला अर्पण केलं आहे. मी आता तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तू बायकोला सोड. ‘दो जिस्म, मगर एक जान हैं हम’ या उक्तीप्रमाणे आपण दोघंही आता एकत्र, एकच व्यक्ती म्हणून स्वर्गात राहू!.. एलिझाच्या या चिथावणीमुळेच पिएरेनं आत्महत्या केली आणि तो थेट ‘स्वर्गात’ पोहोचला! पण, आता या आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या नवनव्या कहाण्या समोर येऊ लागल्या आहेत. याच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर काही जण बेकायदेशीर कामांसाठीही करू लागले आहेत.
स्पेनमध्ये नुकत्याच अशा काही घटना घडल्या, त्यामुळे तेथील तरुणी, महिलांचीच नव्हे, तर अख्ख्या जगाचीच झोप उडाली आहे. असं घडलं तरी काय तिथे? स्पेनमध्ये अचानक काही तरुणींची नग्न छायाचित्रे इंटरनेटवर, सोशल मीडियावर फिरू लागली. थोड्याच दिवसांत मुलींची, तरुणींची अशी शेकडो नग्न छायाचित्रे झपाट्यानं व्हायरल होऊ लागली. महत्त्वाचं म्हणजे यातल्या बऱ्याचशा तरुणींना, त्यांच्या पालकांना याबाबत काही माहीतच नव्हतं. - असणार तरी कसं? कारण ही सर्व छायाचित्रे फेक, बोगस होती. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या साहाय्यानं ती तयार केलेली होती. त्यातल्या तरुणींचे चेहरे इतके हुबेहूब होते की ही तरुणी ती नव्हेच, याबाबत कोणालाही काडीचीही शंका येऊ नये! या तरुणींना, त्यांच्या आयांना ही गोष्ट तेव्हा कळली, तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली! पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा लक्षात आलं, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीनं काहींनी हा खोडसाळपणा केला आहे!
एका पीडित तरुणीची माता मिरियम अल अदीबनं सांगितलं, मुलीची नग्न छायाचित्रे सोशल मीडिया, इंटरनेटवर व्हायरल होताहेत हे ऐकल्यावर तर आमची पाचावर धारणच बसली. ही छायाचित्रे तातडीनं इंटरनेटवरून हटवली जावीत आणि दोषींवर कडक कारवाई केली जावी या मागणीसाठी तिच्यासह अनेक पालकांनी धरणे-आंदोलनं केली. पिलर पोरोन या मातेनं सांगितलं, हे कृत्य केलं एका भामट्यानं, पण आम्हालाच त्यामुळे जगापासून तोंड लपवायची वेळ आली. आमची मन:स्थिती अक्षरश: ढासळली. फातिमा गोमेज यांनी सांगितलं, याच बनावट अश्लील छायाचित्रांचा उपयोग करून काही विकृत तरुणांनी तर माझ्या मुलीला आणि नंतर आम्हालाही ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला! आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या अशा हीन वापराच्या विरोधात आता स्पेनमध्ये जनमत एकत्र येत आहे. महिलांच्या विरोधातील हा डिजिटल हिंसाचार येत्या काळात जगापुढची अतिशय मोठी समस्या असेल, असा गंभीर इशाराही तज्ज्ञांनी दिला आहेे.
आंतरराष्ट्रीय कायदे होणार?
आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या संभाव्य धोक्यांपासून वाचण्यासाठी जागतिक स्तरावर कडक कायदे तयार करण्याच्या दृष्टीनंही आता गंभीर चर्चा आणि तयारी सुरू आहे. डीपफेक तंत्रज्ञानाचा उपयोग तर अलीकडे खूप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फोटो, ऑडिओ, व्हिडीओ यांच्यात फेरफार केला जातो. ते खोटे असल्याबाबत शंका तर येत नाहीच, पण ते खरे की खोटे हे तपासणंही फार मुश्कील होऊन जातं!