आता येणार AI विद्यापीठ! राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने एआय विकसित करावं लागेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 05:53 IST2025-02-09T05:53:01+5:302025-02-09T05:53:31+5:30

भविष्यात जनरेटिव्ह एआय, लार्ज लँग्वेज मॉडेल्स, नॉलेज ग्राफ्स, सेमेंटिक मॉडेल्स, होरिझंटल एआय आणि वर्टिकल एआय या क्षेत्रात संशोधनाला मोठा वाव आहे. 

AI University is coming soon! Indian AI will have to be developed for national security | आता येणार AI विद्यापीठ! राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने एआय विकसित करावं लागेल

आता येणार AI विद्यापीठ! राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने एआय विकसित करावं लागेल

प्रा. मनोज कुमार तिवारी 
संचालक, आयआयएम मुंबई 

कृत्रिम बुद्धिमत्ता ही आधुनिक काळातील जीवनशैलीच्या प्रत्येक क्षेत्रात प्रवेश करीत आहे. नव्या युगात जग तंत्रज्ञानाशी अतिशय वेगळ्या पद्धतीने संवाद साधत आहे. या काळात एआयबाबतचे ज्ञान आणि नवकल्पनांना एकाच छताखाली आणण्यासाठी एआय विद्यापीठ महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. महाराष्ट्रात स्थापन होणारे एआय विद्यापीठ केवळ शिक्षण आणि संशोधनापुरते मर्यादित राहणार नसून ते वैविध्यपूर्ण क्षेत्रांतील एआयच्या ॲप्लिकेशन्ससाठी इंटरडिसिप्लिनरी हब म्हणून कार्य करेल.

एआय विद्यापीठ का? 

एआय आणि मशीन लर्निंगसाठी रोबोटिक्स आणि डेटा सायन्स यांच्या एकत्रीकरणासह एक प्रमाणित अभ्यासक्रम तयार करावा लागेल. हा अभ्यासक्रम भविष्यातील एआय तज्ज्ञांच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. तसेच एआय तज्ज्ञ आणि पारंपरिक संशोधक यांच्यात इंटरडिसिप्लिनरी सहकार्य वाढवून नावीन्यपूर्ण संशोधनाला चालना देईल. आपल्याला एआयच्या नैतिक आणि शाश्वत वापरासाठी धोरणे तयार करावी लागतील. त्याचबरोबर आपल्या गरजा आणि भोवतालानुसार डीपसीक आणि चॅटजीपीटीचे स्थानिक व्हर्जन तयार करावे लागेल. परकीय एआय प्लॅटफॉर्मवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने भारतीय पद्धतीचे एआय विकसित करावे लागेल. यासाठी एआय विद्यापीठ महत्त्वाचे असेल. या विद्यापीठातून उद्योगविश्व आणि शिक्षणसंस्था यांच्यात सहकार्य वाढीला लागून खऱ्या जगातील प्रश्नांवर उपाय शोधता येतील. भविष्यात जनरेटिव्ह एआय, लार्ज लँग्वेज मॉडेल्स, नॉलेज ग्राफ्स, सेमेंटिक मॉडेल्स, होरिझंटल एआय आणि वर्टिकल एआय या क्षेत्रात संशोधनाला मोठा वाव आहे. 

विभिन्न क्षेत्रात परिवर्तनात्मक भूमिका बजावेल  

कृषी : एआयच्या मदतीने पीक उत्पादन, स्वयंचलित कृषी उपकरणे आणि हवामानाच्या परिणामाचा अनुमान बांधता येईल. त्यातून कृषी क्षेत्रात क्रांती घडू शकते. विद्यापीठे एआय आधारित ॲग्रिटेक, अन्नसुरक्षा आणि शाश्वततेबाबत अग्रेसर संशोधन करू शकतील.

अर्बन प्लॅनिंग : एआयमुळे वाहतूक व्यवस्थापन, शहरी पायाभूत सुविधा आणि ऊर्जेचा कार्यक्षमपणे वापर करता येईल. या विद्यापीठातून स्मार्ट सिटींच्या विकासासाठी पुढाकार घेऊन शहरी जीवन चांगले आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून उत्तम करता येईल.

सामाजिक क्षेत्र : सामाजिक शास्त्राला एआयची जोड देऊन विद्यापीठाला सार्वजनिक आरोग्य, सामाजिक कार्य आणि आपत्ती प्रतिसादासाठी अधिक चांगली यंत्रणा तयार करता येईल.

वित्त : वित्त क्षेत्रात एआयचा वापर आर्थिक फसवणुकीचा शोध घेणे, अल्गोरिदमिक ट्रेडिंग आणि खासगी आर्थिक नियोजनासाठी करता येईल. विद्यापीठे अधिक सुरक्षित आणि अनुकूल वित्तीय सेवा निर्माण करू शकतील. 

शिक्षण : ॲडॅप्टिव्ह लर्निंग आणि एआय ट्युटर्सद्वारे शिक्षणाचा अनुभव वैयक्तिक करता येईल. यातून शिक्षणातील विषमता कमी करता येईल. विद्यापीठे ही तंत्रज्ञानाची प्रयोगशाळा बनू शकतील. 

जीवनमानावरील परिणाम

एआयमुळे नोकरीच्या संधी वाढतील. एआयचा विविध क्षेत्रांमध्ये वापर वाढल्याने त्यातील तज्ज्ञांची मागणी वाढून बेरोजगारीचे प्रमाण घटेल. एआय आधारित निदान आणि उपचार पद्धतींमुळे आरोग्यसेवा अधिक प्रभावीपणे देता येईल. तसेच सार्वजनिक आरोग्य सुधारू शकेल. एआयमधून मिळालेल्या नवकल्पनांमुळे खर्च कमी करून कार्यक्षमता वाढेल. आर्थिक उत्पादकता व ग्राहकांचे समाधान वृद्धिंगत होईल. 

एआयचे भविष्य आणि त्याचा शिक्षणावरील प्रभाव 

एआय विद्यापीठ हे एआयचा नैतिक विकास साधण्यासाठी कळीची भूमिका निभावेल. एआयच्या नैतिकतेचे शिक्षण देण्यासह त्याच्या विकासातून होणारे लाभ सर्व घटकांना समानरीत्या पोहचविण्यासाठी लाभदायक ठरेल. नवीन एआय पद्धती आणि तंत्रज्ञानाच्या विकासातून सध्याच्या उद्योग विश्वाचा चेहरा बदलता येईल. आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देता येईल. ग्रामीण भागात अद्ययावत शिक्षण देऊन शिक्षणाचे लोकशाहीकरण होईल. तसेच सीमांची बंधने ओलांडून उच्च दर्जाचे शिक्षण प्रत्येकाला मिळू शकेल. अनेक उद्योगांमध्ये कार्यक्षमतेपेक्षा कामाच्या संख्यात्मक बाबीकडे पाहिले जाते. एआयच्या मदतीने कार्यक्षमतेअभावी वाया जाणारे घटक वाचविता येतील.
 

Web Title: AI University is coming soon! Indian AI will have to be developed for national security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.