दहशतवाद्यांना मोकाट सोडण्याचे फळ

By admin | Published: December 25, 2014 11:44 PM2014-12-25T23:44:17+5:302014-12-25T23:44:17+5:30

पाकिस्तान रक्तबंबाळ झाला आहे. हे रक्त त्यांच्या स्वकीयांनीच वाहवले आहे. पाकिस्तान बिनचेहऱ्याचा देश होण्याच्या मार्गावर आहे.

The aim of the terrorists is to defeat them | दहशतवाद्यांना मोकाट सोडण्याचे फळ

दहशतवाद्यांना मोकाट सोडण्याचे फळ

Next

कुमार प्रशांत,ज्येष्ठ पत्रकार -
पाकिस्तान रक्तबंबाळ झाला आहे. हे रक्त त्यांच्या स्वकीयांनीच वाहवले आहे. पाकिस्तान बिनचेहऱ्याचा देश होण्याच्या मार्गावर आहे. या घटनेसाठी पाकिस्तानातील सुशिक्षित लोकच जबाबदार आहेत. हा समाज आजवर सत्याला सत्य म्हणायची हिंमत करू शकला नाही, हे कटू वास्तव आहे. ज्या तत्त्वातून पाकिस्तानची निर्मिती करण्यात आली, ती तत्त्वे पाकिस्तानला संपविण्यासाठी सज्ज झाली आहेत.
लहान मुले ही कोणत्या एका देशाची नसतात. ती साऱ्या मानवतेचे भविष्य असतात. अशा मुलांना शाळेत शिरून जेव्हा बंदुकीच्या गोळ्यांनी ठार करण्यात येते तेव्हा मनात विचार येतो, की एकविसाव्या शतकातील मनुष्य हा जनावरांपेक्षाही खालच्या पातळीवर पोहोचला आहे की काय? पाकिस्तानात ही घटना घडली त्यापूर्वी एकच दिवस आॅस्ट्रेलियातील सिडनी शहरातील ३० लोकांना अतिरेक्यांनी आपल्या ताब्यात घेतले होते. त्यांची मुक्तता करण्यासाठी याच तऱ्हेने रक्त सांडले होते. त्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानातील पेशावर शहरात आर्मी पब्लिक स्कूलवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवून १४१ लोकांची हत्या केली, ज्यात १३२ बालके होती. पाकिस्तानात या तऱ्हेचे हत्याकांड हे प्रथमच होत आहे, अशी स्थिती नाही. यापूर्वीही या तऱ्हेचे हत्याकांड तेथे घडलेले आहे. हे हत्याकांड शेवटचे ठरेल, अशी शक्यता नाही. कारण या तऱ्हेच्या दहशतवादाचे पोषण पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनीच केले आहे. या घटनेने सर्व जग हादरून गेले असताना हे कृत्य घडविणाऱ्या तालिबानने ज्या दहशतवाद्यांनी हे कृत्य केले त्यांचे छायाचित्र मोठ्या दिमाखाने जगासमोर सादर केले. एकूणच तालिबान्यांना या घटनेबद्दल खेद न वाटता अभिमानच वाटतो आहे, असे दिसते.
पेशावर येथे जी घटना घडली त्याच तऱ्हेची घटना २००४मध्ये रशियात घडली होती. तेथे चेचेन इस्लामी अतिरेक्यांनी एका विद्यालयात शिरून ७०० विद्यार्थ्यांना ओलीस ठेवले होते, त्यांची सुटका करण्यासाठी केलेल्या कारवाईत ४०० मुले मारली गेली होती. ती घटना जग विसरलेले नाही; पण या दहशतवाद्यांच्या विरुद्ध तेथील सरकारे कठोर कारवाई करीत नाहीत, त्यामुळे त्यांचे साहस वाढत चालले आहे.
या घटनेबद्दल शोक व्यक्त करणे किंवा दोन मिनिटे मौन पाळून मृतांना श्रद्धांजली अर्पण करणे पुरेसे आहे का? त्यामुळे जी मुले मारण्यात आली त्याची भरपाई होणार आहे का? नक्कीच नाही. पण, प्रत्यक्षात आपण शोक व्यक्त करीतच राहतो आणि दुसरीकडे या तऱ्हेच्या घटना घडतच राहतात. खरी गरज या तऱ्हेची मानसिकता नष्ट करण्याची आहे. ६७ वर्षांपूर्वी धार्मिक आधारावर पाकिस्तानची निर्मिती होत असताना याच तऱ्हेचा रक्तपात घडला होता. त्यानंतर तरी हे सूडाचे सत्र थांबेल असे वाटले होते; पण उलट विस्तारवाद फोफावतच राहिला. स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी करणाऱ्या महंमद अली जीना यांना महात्मा गांधींनी सांगितले होते, की तुमच्या कृत्यामुळे तुम्ही विषाची फळे पेरता आहात त्यातून विषाचीच निर्मिती होणार आहे. महात्माजींचे ते म्हणणे आज खरे ठरले आहे. पाकिस्तान निर्मितीतून जे विषारोपण झाले आहे, त्यातून विषाचीच उपज होत असल्याचे जगाने बघितले आहे. ज्या हत्यांविषयी आज पाकिस्तानचे नागरिक शोक व्यक्त करीत आहेत, ती त्यांच्या कुकर्मांची फळे आहेत. जीना यांना मुस्लिम राष्ट्र हवे होते, तर तालिबानींना इस्लामी अंमल हवा आहे. जीनांची मानसिकता आणि तालिबानींची मानसिकता यांत तसे पाहता कोणताच फरक नाही.
तालिबानी दहशतवाद्यांनी सैनिकी शाळेतील निष्पाप बालकांच्या रक्ताची होळी साजरी केली आहे, त्यापासून पाकिस्तानने योग्य तो बोध घ्यायला हवा. कारण भारताविरुद्ध जो भस्मासुर पाकिस्तानने उभा केला, तोच दहशतवादाचा भस्मासुर आज पाकिस्तानला नष्ट करण्यासाठी सज्ज झाला आहे. पाकिस्तानातून भारतात दहशतवादी कृत्ये करणाऱ्या दहशतवाद्यांविरुद्ध तेथील सरकार कारवाई करीत नाही. उलट, त्यांना भारतात हिंसक कृत्ये करण्यासाठी प्रोत्साहन देत असते. या दहशतवाद्यांना पाकिस्तानशीही घेणेदेणे नाही, हे पेशावरच्या घटनेने दाखवून दिले आहे. या तालिबान्यांना अफगाणिस्तानापासून पाकिस्तान पर्यंत स्वतंत्र तालिबान राष्ट्र निर्माण करायचे आहे. दहशतवाद्यांचा म्होरका हाफीज महंमद सईद हा या कृत्याबद्दल भारताला जबाबदार धरतो, जाहीर सभेत भारताविरुद्ध गरळ ओकतो, तरीही सरकार त्याच्या मुसक्या आवळत नाही. दहशतवाद्यांना मोकाट सोडण्याच्या कृतीची फळे पाकिस्तानला भोगावी लागत आहेत.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर आपणही आपले वर्तन तपासायला हवे. सध्याचे सत्ताधारी हे कोण खरे भारतीय आणि कोण नकली भारतीय, असा विवाद निर्माण करून लोकांत फूट पाडीत आहेत. घर वापसी कार्यक्रमाच्या नावाखाली लोकांना हिंदू धर्मात आणण्याचा खेळ काही संघटना करीत आहे; हे प्रयत्न हाणून पाडणे आवश्यक आहे.

Web Title: The aim of the terrorists is to defeat them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.