हवाई अनागोंदी
By Admin | Published: April 15, 2017 05:05 AM2017-04-15T05:05:58+5:302017-04-15T05:05:58+5:30
आकाशात उंच उडणारे विमान बघण्याचा मोह अजूनही अनेकांना आवरत नाही. आरामदायी प्रवास करायचा असेल तर विमानच हवे, असा बहुतेकांचा समज झालेला.
आकाशात उंच उडणारे विमान बघण्याचा मोह अजूनही अनेकांना आवरत नाही. आरामदायी प्रवास करायचा असेल तर विमानच हवे, असा बहुतेकांचा समज झालेला. पण अलीकडच्या काळात हवाई प्रवासातील वाढती अनागोंदी बघितल्यानंतर मात्र भविष्यात विमान प्रवास किती सुखकर राहणार याबद्दल शंका वाटावी. कारण एसटी बस आणि रेल्वेत होणारी रेटारेटी आता विमानांमध्येही व्हायला लागली आहे. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांसोबत शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांची वादावादी, त्यानंतरची मारहाण, मग त्यांच्याविरुद्ध उगारण्यात आलेले विमानबंदीचे आयुध हा सर्व घटनाक्रम ताजा असतानाच शिकागोमध्ये विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी चक्क एका डॉक्टरला फरफटत विमानाबाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संतापजनक बाब म्हणजे या संपूर्ण प्रकरणात बिचाऱ्या प्रवासी डॉक्टरची काहीच चूक नव्हती. या विमानात क्षमतेपेक्षा जास्त कर्मचारी कोंबण्यात आले होते. जागेचा प्रश्न निर्माण झाला. चार कर्मचाऱ्यांना बसण्यास आसन नव्हते म्हणे. ज्या प्रवाशांना घाई नाही त्यांनी उद्या प्रवास करावा अशी विनंती कंपनीतर्फे करण्यात आली. पण कुणीही खाली उतरण्यास राजी नव्हते. त्यामुळे बळजबरीने प्रवाशास खाली उतरविण्याचा हा प्रताप कर्मचाऱ्यांनी केल्याचे कळले. गेल्या वर्षी पाकिस्तान एअरलाइन्सच्या एका विमानातही असाच प्रकार घडला होता. सौदी अरबला जाणाऱ्या या विमानात सात प्रवाशांनी १७०० मैलांचा प्रवास उभ्याने केला म्हणे. एरवी विमानात चढल्यावर प्रवाशांना खबरदारीच्या पायलीभर सूचना केल्या जातात. विशेषत: विमानाचे उड्डाण आणि उतरताना सीटबेल्ट लावणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले जाते. येथे तर या सुरक्षा नियमांच्या अक्षरश: चिंधड्या उडविण्यात आल्या होत्या. या सर्व घटना बघितल्यानंतर आता विमानात जागा मिळविण्यासाठीही एसटीप्रमाणेच रुमाल टाकावे लागणार की काय? असे वाटायला लागले आहे. अधिकाधिक लोकांना विमानसेवेचा लाभ घेता यावा म्हणून विमान तिकिटाचे दर कमी करण्याचा घाट घातला जातोय, हे चांगले आहे. पण या वाढणाऱ्या गर्दीचे नियोजन जर योग्य पद्धतीने झाले नाही तर प्रवासी छतावरही बसण्यास मागेपुढे बघणार नाहीत, त्याचं काय?