रायबरेलीतील हवा झपाट्याने बदलते आहे... प्रियांका गांधी खरेच लढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 08:38 AM2021-11-04T08:38:18+5:302021-11-04T08:43:06+5:30

पुढची लोकसभा निवडणूक प्रियांका गांधी रायबरेलीतून लढतील, अशी दिल्लीत जोरदार चर्चा आहे. खरेच तसे होईल?

The air in Raibareli is changing rapidly ... will Priyanka Gandhi really fight? | रायबरेलीतील हवा झपाट्याने बदलते आहे... प्रियांका गांधी खरेच लढणार?

रायबरेलीतील हवा झपाट्याने बदलते आहे... प्रियांका गांधी खरेच लढणार?

googlenewsNext

- हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

येत्या डिसेंबर महिन्यात सोनिया गांधी ७५ वर्षांच्या होतील. त्या बहुधा रायबरेली संसदीय जागा सोडतील आणि राज्यसभेत जातील असे  अ. भा. काँग्रेसच्या वर्तुळात बोलले जातेय. नव्या नियमांप्रमाणे त्या संसद सदस्य नसल्या तरी १० जनपथ हे घर त्यांच्याकडे राहू शकेल. २०२४ च्या लोकसभा निवडणुका एप्रिल-मे  मध्ये येत आहेत. ऐन उन्हातान्हात निवडणुकीची दगदग त्यांना झेपणार नाही. अलीकडे प्रकृती बरी राहत नसल्याने त्या प्राय: घरीच असतात. झूम मीटिंगच्या माध्यमातून लोकांना भेटतात. अगदी मोजक्या लोकांना त्या प्रत्यक्ष भेट देतात. इंदिरा गांधी यांच्या स्मृती दिनी किंवा अशा अन्य वेळीही त्या बाहेर पडल्या नव्हत्या. 

दिल्लीत आता अशी चर्चा सूर पकडतेय की, रायबरेलीतून प्रियांका लढतील. २०१९ साली अमेठीत भाजपा उमेदवाराकडून काँग्रेसचा पराभव झाला होता. हा मतदारसंघ सांभाळणे काँग्रेस पक्षाला जड जात आहे. 
स्वाभाविकच प्रियांका उत्तरप्रदेशात अधिक वेळ घालवत आहेत. लखनौत त्या तळ ठोकून बसल्या असून रायबरेलीतही हवा बदलत आहे. अर्थात अंतिम निर्णय २०२४ च्या जानेवारी-फेब्रुवारीत होईल.

निरुपम यांनीही चाखली ‘राहुल औषधा’ची चव 
सभोवती काहीही घडत असले तरी राहुल गांधी त्यांच्याच जगात मश्गुल असतात. सभोवताली जे काही घडते आहे, त्याची त्यांना फार काळजी आहे, किंवा त्याकडे ते गांभीर्याने बघतात असे वाटत नाही. निदान दिसते तरी असे. राहुल गांधी यांची भेट घेणाऱ्यांना राहुल यांच्याकडून सकारात्मक वागणूक मिळेलच, राहुल त्यांचे म्हणणे गंभीरपणे ऐकून घेतील, त्यांना योग्य तो सल्ला देतील आणि ते नाराज असतील तर, त्यांची नाराजी दूर करतीलच असे नाही, असे अनेकांना वाटते. राहुल गांधी यांना भेटायला गेले असता कशी वागणूक मिळाली याच्या रसभरीत कहाण्या पक्ष सोडून गेलेल्यांकडून ऐकायला मिळतात. त्यामुळेच हे लोक पक्षाबाहेर पडले. तेव्हापासून राहुल प्रत्यक्ष भेट टाळतात. अलीकडे राहुल यांचा फटका खाऊन निवडणूक डावपेचकार प्रशांत किशोर यांनी मन:शांती घालवली. महाराष्ट्रातले काँग्रेस नेते संजय निरुपम मात्र वेगळे निघाले. त्यांनी प्रयत्न चालू ठेवून ‘राहुल औषधा’ची चव घेणाऱ्या नेत्यांच्या रांगेत जाऊन बसणे पसंत केले. एका राजकीय घडामोडीमुळे निरुपम उत्साहित झाले. पक्षाला त्याचा फायदा मिळेल असा त्यांचा होरा होता. कॅगचे माजी संचालक विनोद राय यांना निरुपम यांची लेखी माफी मागावी लागली. २ जी घोटाळ्याशी संबंधित काही आरोप राय यांनी निरुपम यांच्यावर केले होते. दोघांत त्यावरून संघर्ष सुरु होता. 

२ जी घोटाळा बदनामी प्रकरणात राय यांनी प्रथमच माफी मागितली. निरुपम यांनी ही बातमी सांगण्यासाठी राहुल यांना फोन केला. पक्षाला या माफीचा फायदा उठवता येईल असेही सांगितले. पण, निरुपम यांचे नशीब फुटके निघाले. राहुल यांनी ऐकून घेतले, पण, केले काहीच नाही. भाजपाविरुद्ध तोफा डागण्याची संधी काँग्रेसने गमावली. सी डब्ल्यू जी, २ जी, कोल गेट इत्यादी घोटाळे २०१२-१३ साली बाहेर काढून राय यांनी मनमोहन सरकार घालवले होते. पक्षाने कोणतीच मदत न केल्याने निरुपम राय यांच्याशी दीर्घ काळ एकटेच लढले होते. पडलेले तोंड घेऊन ते अखेर मुंबईला परत आले. माध्यमांनी राय यांना रिंगणात ओढल्यावर राहुल जागे झाले पण, तोवर वेळ निघून गेली होती.  

हिमालय सदनात बदलाचे वारे 
हिमालय सदन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २७, सफदरजंग रोड बंगला या ठिकाणीही बदलाचे वारे वाहू लागले आहेत. माधवराव शिंदे तेथे बराच काळ राहिले. त्यामुळे त्या बंगल्याला ‘शिंदे व्हिला’ संबोधले जात असे. नंतर त्यांचे पुत्र ज्योतिरादित्य तेथे राहिले. २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक हरल्यावर पक्षाने त्यांना राज्यसभेवर न घेतल्याने शिंदे यांना हा बंगला सोडावा लागला. रमेश पोखारीयाल ‘निशंक’  तेथे राहत होते. अलीकडेच त्यांचे मंत्रिपद गेल्याने त्यांना बंगला सोडण्यास सांगण्यात आले. नियतीच्या खेळामुळे तो पुन्हा शिंदे याना देण्याचा हुकूम निघाला. पण, पोखरीयाल बंगला सोडायला तयार नाहीत. खासदार आणि माजी मुख्यमंत्री म्हणून आपण व्ही ३ श्रेणीतल्या बंगल्याचे हक्कदार आहोत असे त्यांचे म्हणणे. मात्र हरदीप सिंग पुरी यांच्या नेतृत्वाखालील नगरविकास, गृहनिर्माण मंत्रालयाने त्यांना कळवले की, मंत्री म्हणून साधारण श्रेणीत तो बंगला देण्यात आला होता. व्ही ३ चा बंगला त्यांना मिळेल, पण, त्याकरिता लोकसभेच्या गृह समितीने निर्णय द्यावा लागेल. पोखरीयाल बेकायदा बंगल्यात राहू शकत नाहीत. आता ते जयंत सिन्हा यांच्या बंगल्यात जाणार काय? 
सिन्हा माजी निवडणूक आयुक्त सुनील अरोरा बंगला सोडत असल्याने त्या  बंगल्यात जात आहेत. धाकट्या शिंदेंची २७, सफदरजंग रोड येथे राहण्याची मनीषा बहुधा पूर्ण होईल असे दिसते.

Web Title: The air in Raibareli is changing rapidly ... will Priyanka Gandhi really fight?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.