हवाई प्रवास सुखकर व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 06:19 PM2018-04-30T18:19:30+5:302018-04-30T18:19:30+5:30

हवाई चप्पल घालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हवाई प्रवास करता आला पाहिजे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे, त्यासाठी केंद्र शासनाने उडान ही योजना सुरू केली.

Air travel should be comfortable | हवाई प्रवास सुखकर व्हावा

हवाई प्रवास सुखकर व्हावा

googlenewsNext

हवाई चप्पल घालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हवाई प्रवास करता आला पाहिजे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे, त्यासाठी केंद्र शासनाने उडान ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत राज्यातील १० शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यात जळगावचाही समावेश आहे. गतवर्षी २३ डिसेंबरपासून जळगाव-मुंबई विमानसेवेला प्रारंभ झाला. जळगावकरांचे विमानसेवेचे स्वप्न पूर्ण झाले; मात्र आतापर्यंतचा प्रवास अडथळ्यांचाच राहिला आहे. विमानसेवेच्या अगदी पहिल्या दिवसापासून विमानसेवेला विलंब झाला. मुंबईहून जळगावात कधीच वेळेवर विमान पोहचले नाही, ही परपंरा आजतागायत कायम आहे. मुंबई विमानतळावर दर अर्ध्या सेकंदाला एक विमान येत असते, दिवसभरात साधारणत: ९९८ विमानांची ये-जा असते. त्यामुळे प्रादेशिक विमानसेवेसाठी लवकर स्लॉट उपलब्ध होत नसल्याने विमानाला विलंब होत असल्याचे कारण सांगितले जाते. लहान शहरे मोठ्या शहरांशी जोडून त्यांचा विकास करण्यासाठी जर केंद्र शासनाने उडान ही योजना सुरू केली आहे तर स्लॉटची अडचण यायलाच नको. कारण ही योजना सुरू करण्यापूर्वीच या अडचणीवर मार्ग काढणे आवश्यक होते. एअर डेक्कन या विमान कंपनीचे संचालक कॅप्टन गोपीचंद यांनीसुद्धा मुंबई विमानतळावर प्रचंड वर्दळ असल्याने २५ टक्के रिजनल कनेक्टिव्हिटी ‘उडान’साठी राखीव ठेवली पाहिजे, अशी अपेक्षा विमानसेवेच्या शुभारंभप्रसंगीच व्यक्त केली होती. त्यांची ही अपेक्षा केंद्र शासनाने अद्यापही पूर्ण केली नसल्याचे दिसून येते. ती पूर्ण केली असती तर जळगावात दोन ते चार तास विलंबाने विमान पोहचले नसते. स्लॉटची अडचण चार महिन्यांपासून कायम आहे. जळगावातील उद्योजक, व्यापारी, अधिकारी सकाळी लवकर मुंबईला पोहचून दिवसभर काम आटोपून रात्री जळगावात पोहचावेत, वेळेची बचत व्हावी, ही विमानसेवेद्वारे अपेक्षा होती, मात्र जळगावकरांचे हे स्वप्न अद्याप अपूर्णच आहे. सुरुवातीला दुपारी १ पर्यंत विमान पोहचायचे. त्यानंतर स्लॉटच उपलब्ध नसल्याने व काही इतर अडचणींमुळे विमानसेवा १४ मार्चपासून तर १९ एप्रिलपर्यंत म्हणजेच तब्बल ३७ दिवस बंद होती. आता २० एप्रिलपासून सेवा पुन्हा सुरू झाली आहे. मंगळवार ते गुरुवार असे तीन दिवस जळगावहून मुंबईला जाण्यासाठी वेळ सोयीची आहे. मात्र शुक्रवार ते रविवारची वेळ जळगावकरांसाठी गैरसोयीची असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. लोकप्रतिनिधींनी मुंबई विमानतळावरील २५ टक्के रिजनल कनेक्टिव्हिटी राखीव ठेवण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. जोपर्यंत ही मागणी मंजूर होणार नाही तोपर्यंत जळगावकरांचा हवाई प्रवास अडथळ्यांचाच राहणार असल्याचे दिसते. विमानास विलंब होत असला तरी ही सेवा अखंडपणे सुरू रहावी यासाठी प्रवासी जळगाव विमानतळावर तास्न तास विमानाची प्रतीक्षा करीत बसतात. जैन उद्योग समूहाने तर सहा महिन्यांची २५ टक्के तिकिटे आगावू घेतली असून विमानसेवेच्या पहिल्याच दिवशी सात लाखाचा धनादेश ‘एअर डक्कन’ला दिला आहे. जळगावकरांच्या या सहकार्याला केंद्र शासनाने प्रतिसाद देणे आवश्यक आहे, तरच उडान योजना यशस्वी होईल.

Web Title: Air travel should be comfortable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.