विमानतळाचे भिजत घोंगडे
By admin | Published: September 8, 2016 04:38 AM2016-09-08T04:38:02+5:302016-09-08T04:38:02+5:30
एखाद्या विषयाची फक्त आस लावून ठेवणं, मात्र ती गोष्ट प्रत्यक्षात येईल अशी कृती न करता केवळ घोळात घोळ वाढवत राहणं
एखाद्या विषयाची फक्त आस लावून ठेवणं, मात्र ती गोष्ट प्रत्यक्षात येईल अशी कृती न करता केवळ घोळात घोळ वाढवत राहणं... पायात पाय अडकवून एखाद्या विषयाचं घोंगडं नुसतंच भिजत ठेवणं ही आपल्या राजकारण्यांची खासियत! त्यांच्या आदेशाबरहुकूम प्रशासकीय यंत्रणाही धावते. याचं उत्तम उदाहरण पाहायचे असेल, तर बहुप्रतिक्षित असलेला, प्रत्येक वेळी नवी आशा पल्लवित करणारा व पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला पुणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नियोजित प्रकल्प!
उणीपुरी दहा वर्षे तरी लोटली असतीलच. हा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विषय विमानाइतकाच अधांतरी! पुन्हा एकदा हा विषय चर्चेत येण्याचे कारण दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनीच केलेले टिष्ट्वट! त्यामुळे पुन्हा एकदा विमानतळ नक्की कुठे याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गेली अनेक वर्षे नुसतीच पाहाणी व न झालेली स्थाननिश्चिती हा या विषयातील सर्वांत कळीचा मुद्दा आहे. त्याचे तळ्यात-मळ्यात अद्यापही संपलेले नाही. एका बाजूला मुख्यमंत्री सूतोवाच करतात खेडचे. लगेच तिथे जोरदार चर्चा सुरू होते. आधीच जागांना सोन्याचे भाव येतात. स्थानिक शेतकरी मात्र जमिनी जाणार म्हणून विरोध करतात. विरोधाचे वारे वाढताहेत पाहून लगेचच दुसरीकडे ‘पाहाणी’ होते. जिल्ह्याच्या दुसऱ्या टोकाला थेट पुरंदरमध्ये. या धक्कातंत्रामुळे पुन्हा एकदा ‘टेकआॅफ’ नक्की कुठून आणि कधी हा संभ्रम कायम राहिला आहे व त्याने अनेक नवे प्रश्न निर्माण केले आहेत. गेली दहा वर्षे खेड तालुक्यात घिरट्या घालणाऱ्या विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना १८०० हेक्टर जागा लागणार व खेडमध्ये ती नाही हा शोध आत्ताच, अचानक का लागावा? यामागे काही धूर्त राजकारण किंवा ‘अर्थकारण’ आहे का याचा सुगावा तूर्तास तरी लागलेला नाही.
पुणे जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ होणे ही काळाची गरज आहे. जिल्ह्यात उद्योग व्यापार-व्यवसायाची उलाढाल मोठी आहे. नवनवीन आंतरराष्ट्रीय कंपन्या प्रचंड गुंतवणूकही करीत आहेत. पण विस्तार-विकासाच्या या घोडदौडीत त्यांची सर्वात मोठी अडचण आहे ती विमानसेवेची. सद्यस्थितीत असणारे पुणे विमानतळ हे संरक्षण दलाच्या अखत्यारीत असल्याने त्याच्या विस्ताराला व प्रगतीला खूप मर्यादा आहेत. परदेशात जाण्यासाठी उद्योजकांना मुंबई, दिल्ली, चेन्नईतून जावे लागते. त्या दृष्टीने जिल्ह्यातच आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हायला हवे, परंतु गेल्या दहा वर्षांपासून त्याबाबत जो वेळकाढूपणा आणि दिरंगाई सुरू आहे ती मात्र प्रगतीला खीळ बसवणारी आहे. विमानतळाचे 'टेक आॅफ' अजूनही जमिनीतच रूतून बसले आहे.
१९९८ मध्ये पहिल्यांदा सर्र्वेक्षण झाले ते चाकणलगत आंबेठाण परिसरात. नंतर चांदूस, चांडोली येथे सर्वेक्षण झाले. त्या परिसरात समारे दीड हजार हेक्टर क्षेत्रावर ‘सेझ’साठी म्हणून जागा संपादीत करून शेतकऱ्यांच्या सात-बारावर शिक्के मारले गेले. मात्र तेथेही विरोध झाल्याने कन्हेसर, पाबळ परिसरात चाचपणी सुरू झाली. पुढे पाईट, कोये, रोंधळेवाडी परिसरात जागा निश्चित झाली. शेतकऱ्यांनी तेथेही विरोध केला. आता खेडचे सूतोवाच असताना विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी पुरंदरला राजेवाडी, वाघापूर परिसरात ‘पाहाणी’ करून ही जागा योग्य असल्याचे सांगत आहेत. सद्य स्थितीत पुणे जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रुपाने ‘आकाशभरारी’ घेणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी सुनियोजित, कालबद्ध आणि तातडीने निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. नव्याने साकारणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ भविष्याचा वेध घेऊन, अद्ययावत, आधुनिक व सर्व सुविधांनी सुसज्ज असावे हीच पुणे जिल्हावासियांची मागणी आहे. सरकारने पुणे जिल्ह्याच्या आकाश भरारीला, प्रगतीला, विकासाला बळ द्यावे हीच माफक अपेक्षा आहे.
- विजय बाविस्कर