अकबरांचे ‘तो मी नव्हेच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 06:17 AM2018-10-15T06:17:35+5:302018-10-15T06:18:08+5:30
स्त्रियांचे मौन आणि अन्याय व समस्या खपवून घेण्याची त्यांची मानसिकता हेदेखील, या अपराधांचे कारण आहे. स्त्रियांच्या या संकोचामुळे गुन्हे दबून होते. वास्तविक स्त्रिया असे बोलतात तेव्हा ते खरे मानले पाहिजे. ज्यांच्याविरुद्ध आता बोलले गेले त्यांना धडा शिकवला पाहिजे.
सात तरुण सहकारी स्त्रियांनी लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा न देता आरोप करणाऱ्यांविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करण्याची घोषणा केली आहे. प्रत्यक्षात हे आरोप झाले तेव्हा ते परदेश दौऱयावर होते. आपण भारतात परत आलो की आपली भूमिका देशाला सांगू, असे म्हणत त्यांनी हे तीन दिवस काढले. दरम्यान, त्यांच्याविषयीच्या अफवांना उत्तरे देण्याची जबाबदारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी टाळली, तर भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी या आरोपांची आम्ही चौकशी करू, असे आश्वासन साऱयांना दिले. मात्र अकबर यांनी भारतात पाय ठेवताच आपल्याविरुद्धचे सर्व आरोप फेटाळून आरोपकर्त्यांना न्यायालयात खेचण्याची तयारी चालविली आहे. अनेक विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यामुळे दबावापोटी त्यांचा राजीनामाही घेतला जाईल, पण केवळ राजीनामा दिल्याने ते निर्दोष ठरत नाहीत आणि त्यांच्यावरील आरोपांचे खरे-खोटेपणही सिद्ध होत नाही. मंत्रिपद सोडले तरीही ते खासदार व सामान्य नागरिक राहणार आहेतच. त्यामुळे त्यांच्यावरील आरोपांची न्यायालयीन खातरजमा झाल्याखेरीज त्यांना स्वच्छतेचे प्रशस्तिपत्र देणे योग्य ठरणार नाही. लैंगिक अत्याचाराच्या आरोपांना राजीनामा ही पुरेशी शिक्षा नाही आणि त्याने समाजाचे समाधानही होणार नाही.
एम.जे. अकबर हे साधे खासदार वा लोकप्रतिनिधी नाहीत. त्याआधी ते स्टेट्समन, पायोनियर पोस्ट व इंडिपेंडंट या दैनिकांचे संपादक होते. त्यांचे लिखाण चांगले असल्याने त्यांचा वाचकवर्गही मोठा होता. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली. जवाहरलाल नेहरूंचे त्यांनी लिहिलेले चरित्र अनेक चांगल्या चरित्रांपैकी एक मानले जाते. १९८४ मध्ये ते काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर लोकसभेत निवडून आले होते. एक चांगले संपादक, स्तंभलेखक व ग्रंथकार असलेले अकबर अविरत लेखन करीत आहेत. राजकीय विषयांचे भाष्यकार म्हणून त्यांचा केवळ लौकिकच नव्हे तर मोठ्या व वजनदार राजकीय वर्तुळात त्यांचा वावरही होता. त्याचमुळे त्यांना आता भारतीय जनता पक्षाने सोबत घेऊन राज्यसभेवर निवडून आणले आणि त्यांच्या अनुभवाचा लाभ घेण्यासाठी त्यांना परराष्ट्र मंत्रालयात राज्यमंत्र्याचे पदही दिले. त्यांनी राजीनामा दिला तर तो रीतसर मंजूर होईल, यात शंका नाही. मात्र सात तरुणींनी एकामागोमाग एक केलेल्या आरोपांमुळे त्यांचा राजीनामा हा त्यावरचा उपाय ठरत नाही. त्यांची विद्वत्ता व पदभार हे त्यांच्याविषयीचे आकर्षण वाटण्याचे एक महत्त्वाचे कारण होते. या आकर्षणाचा चांगला उपयोग करून तो समाजाच्या सेवेसाठी वापरणे हा खरा व मुख्य मार्ग. देशातील सर्वच नामांकित नेते त्या मार्गानेच गेले. मात्र आपल्या पदाचा, अधिकाराचा व वजनाचा त्यांनी गैरवापर केला नाही. पैसा, पद आणि प्रलोभने देण्याची क्षमता असली की दुबळ्या मनाच्या गरजू स्त्रियांवर त्याचा अनिष्ट वापर करता येतो. ते करणारे संख्येने लहान नाहीत. मात्र गुन्हा पकडला जात नाही आणि उघडकीस येत नाही, तोवर संबंधितांना आरोपी म्हणता येत नाही.
एम.जे. अकबर सापडले म्हणून आरोपी बनले. त्यांच्याविरुद्ध उघडपणे बोलायला एवढ्या तरुणी पुढे आल्या त्या सर्व जणी निखालस खोटे बोलून स्वत:चीही बदनामी करून घेत आहेत, असे गृहीत धरता येणार नाही. ज्यांच्याविरुद्ध बोलले गेले, लिहिले गेले वा पोलिसात गुन्हे दाखल झाले असे इतर अनेक जण उजळ माथ्याने समाजात वावरत आहेत. त्यांच्याविरुद्ध बोलायचे धाडस कुणी केले नाही, त्यामुळे ते सुरक्षितही आहेत. मात्र स्त्रियांचे मौन आणि अन्याय व समस्या खपवून घेण्याची त्यांची मानसिकता हेदेखील, या अपराधांचे महत्त्वाचे कारण आहे. स्त्रियांच्या या संकोचामुळे हे गुन्हे दबून होते. वास्तविक स्त्रिया असे बोलतात तेव्हा ते खरे मानले पाहिजे. त्यामुळे ज्यांच्याविरुद्ध आता बोलले गेले त्यांना सरकार, समाज व कायदा यांनी धडा शिकवला पाहिजे. त्यामुळे ज्यांच्यावर असे आरोप होण्याची शक्यता आहे, अशा संभावितांनी आता जपून राहिले पाहिजे. कायदा सगळ्या गुन्ह्यांना, मग तो कितीही मोठा असो वा लहान असो, शिक्षा करतोच. आसाराम बापूची जन्मठेप अनेकांना धडा देणारी व दिशा दाखविणारी ठरली. नाना पाटेकरही रांगेत आहेत आणि आता त्या जाळ्यात आणखीही अनेक जण अडकण्याची शक्यता आहे.