अकोला : गावाकडून महानगराकडे ...

By किरण अग्रवाल | Published: June 10, 2023 07:00 AM2023-06-10T07:00:00+5:302023-06-10T07:00:11+5:30

Akola City : अकोल्याकडे बघता  विशेषतः गेल्या २५ वर्षातील स्थित्यंतर हे या गावाला शहरीकरणाची ओळख देणारे ठरले आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. 

Akola: From Village to Metropolis... | अकोला : गावाकडून महानगराकडे ...

अकोला : गावाकडून महानगराकडे ...

googlenewsNext

- किरण अग्रवाल

कोणत्याही शहराच्या विकासाची वा प्रगतीची परिमाणे ही अनेकविध पद्धतीने बघितली जाणारी असली तरी, प्रामुख्याने त्यात दळणवळणादी सुविधांसोबतच सरकारी व्यवस्थांचा विचार केल्याखेरीज पुढे जाता येत नाही. यासंदर्भाने अकोल्याकडे बघता  विशेषतः गेल्या २५ वर्षातील स्थित्यंतर हे या गावाला शहरीकरणाची ओळख देणारे ठरले आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. 

अगदी बेरार प्रांतापासून अकोल्याची आपली एक स्वतंत्र ओळख, इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कालखंडात अनेकविध नेत्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने या शहराच्या लौकिकात भर टाकली. मोर्णेच्या काठावरील हे गाव काळाच्या ओघात विस्तारत व विकसित होत गेले, आणि गेल्या 25 वर्षाच्या कालखंडाकडे पाहता या काळात ते विकासाचे पंख लेवून अधिकच विकासोन्मुख झालेले दिसून येते. अकोल्यात रौप्य महोत्सवी वाटचाल पूर्ण केलेला लोकमत या विकासाचा साक्षीदार व साथीदारही राहिला आहे. 

अकोला नगरपरिषदेचे महापालिकेत रूपांतरच नवीन शतकाच्या प्रारंभात (सप्टें.2001) झाले. लगतची 24 गावे महापालिकेत समाविष्ट करून घेण्यात आली व तेथील विकासाला चालना मिळाली. गावातील रस्त्यांचे रुप पालटले, काही रस्ते तर 18 वरून थेट 60 फुटांचे झाले. पूर्वी शहरात एकही दुपदरी रस्ता नव्हता. गेल्या दशकात  दुपदरी वाहतूक व्यवस्थेचे रस्ते झालेत. अलीकडेच दोन उड्डाणपुले व एक भुयारी मार्ग (अंडर पास) आकारास आले, त्यामुळे शहरीकरणाचा चेहरा अधिक ठसठशीत झाला. शिवाजी कॉलेज परिसरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळा, पार्क परिसराचे सुशोभीकरण झाले. पूर्वीच्या अशोक वाटिकेचा विस्तार व विकास झाला. जुन्या सरकारी बगीचाचाही अलीकडेच कायापालट झाला. अमरावती रस्त्यावर खडकी येथे वऱ्हाडाला भूषणावह ठरावे असे अतिशय प्रशस्त व गौरवशाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष प्रतिष्ठान उभे राहिले. जुन्या नेहरू पार्क व हुतात्मा स्मारकाचेही रूप पालटले. 

सरकारी कार्यालयांबाबत बोलायचे तर, जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन व दिमाखदार वास्तू आकारास आली असून उदघाटनाच्या प्रतीक्षेत आहे. ओघाने महापालिकेची नवीन व प्रशस्त अशी प्रशासकीय इमारतही  साकारली. नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस वसाहत अलीकडेच उदघाटीत झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अति विशेषोपचार रुग्णालय, बीज प्रमाणीकरण कार्यालय, कृषी विद्यापीठ परिसरात शेतकरी सदन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन समितीची इमारत, तहसील ऑफिस, जिल्हा सत्र न्यायालय, आयकर भवन आदी इमारती गेल्या पंचवीशीतच आकारास आल्यात, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशु विज्ञान संस्थाही याकाळात अकोल्यात उभी राहिली. या सर्वांमुळे अकोल्याच्या वैभवात भर पडली असे म्हणता यावे.

जिल्ह्यातील क्रीडापटूंना सरावासाठी जिल्हा क्रीडा संकुलही बांधून पूर्ण झाले असून, दक्षता नगरात सामाजिक न्याय भवनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. रामदास पेठेत सांस्कृतिक भवन  पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. सिव्हिल लाईन परिसरात जिल्हा प्रशिक्षण संस्थेची इमारत उभी झाली असून, ऑडिटोरियम हॉलसह जिल्हा परिषदेच्या आधुनिक विश्रामगृहाचे कामही सुरू आहे. 

अकोला रेल्वे स्थानकाचे रूप अमुलाग्र बदलले. प्लॅटफॉर्म्स विस्तारले, लिफ्ट आल्यात, सरकते जिनेही बसविले गेले आहेत. पूर्वी उमरीकडे जाताना नॅरो गेज असताना रेल्वे फाटक होते, तेथे ब्रॉडगेज झाल्यानंतर मोठा रेल्वे उड्डाणपूलही झाला. डाबकी रेल्वे गेट व न्यू तापडिया नगर येथे रेल्वे उड्डाणपूलांची कामे सुरू आहेत. अकोला पूर्णा ब्रॉडगेज मार्ग पूर्ण झाला असून अकोला अकोट डेमु रेल्वेही सुरू झाली आहे. जुन्या शिवनी विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरणही झाले. रस्त्यांचे महामार्ग, समृद्धी महामार्ग साकारले आहेत. 25 वर्षांपूर्वी अकोल्यात सायकल रिक्षा मोठ्या प्रमाणात चालत. त्यात पायाची घडी घालून बसत दोन्ही बाजूला गंमत बघत बघत घर गाठण्यात वेगळीच मजा येई आणि त्या चालकाच्या श्रमाबद्दल कणवही येई. आता त्या तुरळक उरल्या असून त्यांची जागा ऑटो रिक्षांनी घेतली आहे. 

श्री राज राजेश्वर हे अकोल्याचे दैवत, कावड यात्रा हा येथील धार्मिक ग्रामोत्सव. जुन्या अकोल्यातील अनेकांची पहाट आजही श्री राज राजेश्वराच्या घंटानादाने होते. गल्लोगल्ली व चौकाचौकात संत श्री गजानन महाराजांची मंदिरे येथे आहेतच. जुने राम मंदिर, राणी सती धाम आदी पुरातन मंदिरेही आहेतच.  याचसोबत गेल्या 25वर्षात अकोल्यात   श्री सालासर बालाजी, श्री रामदेवबाबा- श्यामबाबा, अन्नपूर्णा देवी, भोडगावचे पशुपतीनाथ मंदिर, सहकार नगरातील श्री लक्ष्मीनारायण मंदिर, तोष्णीवाल लेआउट मधील श्रीनाथजी मंदिर, तुळजाभवानी मंदिर,  विठ्ठल मंदिर, साईबाबा मंदिर आदी अनेक श्रद्धास्थाने आकारास आली असून स्वामीनारायण तसेच जीन माता, शाकंभरी व महालक्ष्मी मातेचे मंदिरही निर्माणाधीन आहे. भाविकांना अध्यात्मिक श्रद्धानुभूती त्याद्वारे घडून येत आहे. शहरातील पुरातन कच्छी मशिदीचा विकास करण्यात आला असून, बिलाल व राबीया मशिदीही मुस्लिम बांधवांच्या धार्मिक आस्थेचे केंद्र बनल्या आहेत. 

शिक्षणात पूर्वीपासून महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळा; तसेच टिळक राष्ट्रीय शाळा, मनुताई कन्याशाळा, शिवाजी शिक्षण संस्था, भारत विद्यालय, खंडेलवाल विद्यालय, होली क्रॉस, हिंदू ज्ञानपीठ यासारख्या काही खाजगी संस्थाही ज्ञानदानात अग्रेसर आहेत. आता त्यांच्यासोबतच प्रभात किड्स, एसओएस, पोद्दार, इमराल्ड, समर्थ पब्लिक स्कुल, डॉ. हेडगेवार माध्य. शाळा आदी संस्थाचीही भर पडली आहे, शिवाय ललित टुयटोरिअल्स, समर्थ कोचिंग,  मिग्स क्लासेस, ब्राईट करिअर आदी खासगी कोचिंग संस्थाही विद्यार्थी घडविण्यात मोठी भूमिका बजावत आहेत त्यामुळे येथील विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात आपला झेंडा रोवताना दिसत आहेत. आयआयटी सारख्या नामांकित संस्थांमध्ये विद्यार्थी चमकत आहेत. महापालिकेची शाळा ते आयआयटीचा पल्ला, हा गेल्या पंचवीस वर्षातील दिमाखदार प्रवासाचा गौरवशाली पट ठरावा.

अकोला जिल्हा व परिसर हा विशेषता शेतीप्रधान आहे. पांढरे सोने म्हणजे कापूस, तूर, मूग, उडीद, हरभरा, गहू,  ज्वारी आदि येथील मुख्य व पारंपारिक पिके, परंतु बदलते हवामान व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ सारख्या संस्थांनी जागविलेल्या आधुनिक शेतीविषयक भानामुळे आता सोयाबीन सोबतच कांदा, हळद, ओवा, फुले आदी. नवीन पिकेही घेतली जाऊ लागली आहे. शेड नेट, ग्रीन हाऊस वाढली आहेत. यातून उत्पादनक्षमता वाढण्यासोबतच आर्थिक लाभही बळीराजाला खुणावू लागला आहे. कृषी विद्यापीठातील नित्य नवे संशोधन, त्यात महाबीज सारख्या संस्थांनी घातलेली विविध वाणांची भर व शेतीमधील नवनव्या प्रयोगांकडे बघता गेल्या 25वर्षांचा टप्पा हा कृषीक्रांती घडवून शेतकरी राजाला स्वयंपूर्णतेकडे नेण्यासाठी चालना देणाराच ठरल्याचे दिसून येते. सिंचनाचा विचार करता, जिल्ह्यात दगड पारवासह अनेक लहान मोठे सिंचन प्रकल्प झालेच, पण वान प्रकल्पाने अकोट तेल्हारा परिसराला खऱ्याअर्थाने पाणीदार केले. खारपणपट्ट्याला वरदान ठरणारा नेर धामना सिंचन प्रकल्प (बॅरेज)चे कामही रशियन पद्धतीने केले जात असून ते अंतिम टप्प्यात आहे. 

विशेषता गेल्या अडीच तीन वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या कोरोनाच्या संकटानंतर  सर्व क्षेत्रातील उद्योग व्यवसायांनी, चलन वलनांनीदेखील कात टाकली. कपडे, कॉस्मेटिक असो की किराणा खरेदी; यासाठी पूर्वी अकोल्यातील किराणा मार्केट आदी ठिकाणे ठरलेली असत. आता ऑनलाईन खरेदीचे फॅड फोफावले आहे. अर्थात प्रत्यक्ष वस्तू पाहून केली जाणारी खरेदी आणि ग्राहक व दुकानदारांमधील विश्वासाच्या नातेसंबंधाचा पगडा पाहता अजूनही अनेक ग्राहक खरेदीसाठी अकोल्याच्या गांधी चौक परिसर, जनता बाजार, न्यू क्लॉथ मार्केट, दाणा बाजारामध्येच भेट देत असल्याचे समाधानाचे चित्र आहे. गेल्या काही वर्षात बाळापूर रोडवर नवीन किराणा बाजार उभे राहिले आहे. अलीकडील काळात मॉल कल्चरही वेगाने वाढताना दिसत आहे. एकाच छताखाली विविध प्रकारच्या खरेदी आटोपून वेळ वाचविण्याचा प्रयत्न यात असतो. जी महासेल, माऊली, सुनील, ईश्वर शॉपी, बियाणी, गोरक्षण रोडवरील जयभोले, सोनी, बोबडे, गुरुकृपा, विदर्भ, शिवाय, गोपाल, सरस्वती, जनता सुपर शॉपी असे अनेक सुपर बाजार, मॉल्स अकोल्यात भरभराटीला आलेले दिसत आहेत. डी मार्ट ब्रँड आला आहे. बिलाला यांचे 'बी मार्ट' आकारास येऊ घातले आहे. कापड उद्योगात रेमंड, पार्क एव्हेन्यू, कॉटन किंग, एलन सोनी, डेनीम, पीटर इंग्लंड, एच एन्ड एफ, ओरेलिया, इम्पोरिअम अनेक्स, ब्लॅकबेरी असे अनेक नावाजलेले ब्रँड्सचे शोरूम्स उघडले गेले आहेत. हा गेल्या पंचवीस वर्षातील मोठा बदल म्हणता यावा.

पूर्वी अकोल्याच्या औद्योगिक वसाहतीत काही आईल व दालमिल वगैरे मोजकेच उद्योग होते, गेल्या पंचवीस वर्षात ही वसाहत विस्तारली असून अनेक नवनवीन उद्योग आले आहेत. एक दोन अपवाद वगळता टाटा, मारुती, होंडा, हुंडाई, कावासाकी, महिंद्रा एन्ड महिंद्रा, अशोक लेलँड, स्वराज, हिरो, बजाज, सुझुकी, यामाह अश्या बहुतेक ब्रॅंड्सच्या वाहनांची शोरूम्स अकोल्यात उघडली गेली आहेत. 

आरोग्याच्या क्षेत्रात पूर्वी सेवारत असलेल्या अनेक फॅमिली डॉक्टर्सची नावे आजही मोठ्या आदराने घेतली जातात. पण आता काळ बदलला तसे वैयक्तिक सेवा देणाऱ्यांसोबत ओझोन, आयकॉन, ऑरबीट, लोटस, सिटी, ओम मल्टी स्पेशालिटीसारखी विविध मोठी ट्रस्टेड हॉस्पिटल्स रुग्णसेवेत दाखल झाली आहेत. जिल्हा स्त्री रुग्णालय (लेडी हार्डिंग)चे अत्याधुनिकीकरण केले गेल्याने असंख्य रुग्णांना त्याचा मोठा लाभ होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महापालिकेची रुग्णालये व अन्य वैद्यकीय सुविधांमुळे आज मेडिकल हब म्हणून अकोला नावारूपास आले आहे.

पूर्वी लग्न समारंभ किंवा कसला कार्यक्रम करायचा म्हटले तर अकोल्यात विविध ज्ञाती, समाज संस्थांचे भवन, वाड्या वापरल्या जात. आजही समाजोपयोगी कामांसाठी या भवनांचा वापर होत आहेच, परंतु सोयी सुविधा व गरजांच्या दृष्टीने शुभमंगल, शुभकर्ता लॉन्स, नानामंगलम, मुक्ताई, जानोरकर, ओम, गणेशकृपा, गुरूकृपा आदी मंगल कार्यालये उपलब्ध झाली आहेत. जलसा, तुषार, व्हिएस एम्पिरीअल, द हेरिटेज, रणजित, आर जी, शगुन अशी उच्च व मध्यम श्रेणीतील काही बँकेट हॉल्सही आकारास आले आहेत. 

बांधकाम क्षेत्रही वेगाने विस्तारते आहे. मोठमोठी मॉल्स, महापालिकेचे कॉम्प्लेक्स, यमुना तरंग, श्रावगी टॉवर, आयटी स्क्वेअर, यमुना आर्केड, शाकंभरी स्क्वेअर, रामलता बिझनेस सेंटर, सेठी हाईट्स आदी व्यावसायिक संकुले आकारास आली असून, रामी हेरिटेज, लोटस पार्क, सितारा टॉवर्स, निसर्ग पार्क, रामा एम्पायर, गोकुलधाम सोसायटी यासारखी सर्व सुविधायुक्त निवासी अपार्टमेंट्स व सोसायट्याही उभ्या राहिल्या आहेत. पूर्वी छोटी छोटी बंगले वजा घरे होती, आता नागपूर पुण्यासारखी अपार्टमेंट्स वाढू लागली आहेत. एकेकाळची प्रख्यात राधाकृष्ण टॉकीज आता मिराज सिनेमा म्हणून मल्टिप्लेक्सच्या रूपात पुढे आली आहे. 

अर्थात, अकोल्याच्या पंचवीशीचा विचार करता सर्वच क्षेत्रात अनेक नवीन बदल घडून आले आहेत. येथे त्यातील प्रातिनिधिक बाबींचाच उल्लेख केला आहे, तोदेखील पुरेसा नाही. पण शहर कसे बदलत चालले आहे याचा ढोबळ अंदाज यावरून बांधता यावा. विशेषता गेल्या दशक भरात गावपण टाकून देत अधिक वेगाने शहरिकरण झाले. यात येथील लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कारभारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, माध्यमकर्मी व सामान्य नागरिक असा सर्वांचाच मोठा सहभाग आहे. या गेल्या पंचवीस वर्षातील विकासाच्या गतीपेक्षा येणाऱ्या काळात त्याहूनही अधिक वेगाने विकासाला व बदलांना सामोरे जायचे आहे. तेव्हा त्यासाठी सिद्ध होऊया इतकेच यानिमित्ताने....

Web Title: Akola: From Village to Metropolis...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.