‘जीएमसी’त कुणाचा धाक उरलाय की नाही?

By किरण अग्रवाल | Published: March 19, 2023 11:30 AM2023-03-19T11:30:00+5:302023-03-19T11:30:36+5:30

Akola GMC : अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात अलीकडेच घडलेल्या अशा प्रकाराने तेथील अनागोंदीची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

Akola GMC : Is there any fear left in 'GMC' or not? | ‘जीएमसी’त कुणाचा धाक उरलाय की नाही?

‘जीएमसी’त कुणाचा धाक उरलाय की नाही?

googlenewsNext

- किरण अग्रवाल

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आत्महत्या केलेल्या भगिनीचा मृतदेह दोन-दोन दिवस तसाच लटकलेला राहतो, हा अव्यवस्थेचा व असंवेदनशीलतेचा कळस झाला. कामकाजातील इतके दुर्लक्ष माफीयोग्य ठरू नये.

सरकारी रुग्णालयांमधील अव्यवस्था हा आता नवीन मुद्दा राहिलेला नाही; मात्र या अव्यवस्थेबरोबरच तेथे घडून आलेल्या आत्महत्येसारख्या दुर्दैवी घटनेकडेही दुर्लक्षच होत असेल तर ही असंवेदनशीलता गंभीरच म्हणायला हवी. अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात अलीकडेच घडलेल्या अशा प्रकाराने तेथील अनागोंदीची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित सर्वोपचार रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या एका भगिनीने मुलगी झाल्यावर शौचालयात जाऊन आत्महत्या केली, तिचा मृतदेह दोन दिवस लटकलेलाच राहिला. जुन्या पेन्शनसाठीच्या संपात कर्मचारी सहभागी झाल्याने शौचालयाकडे सफसफाईसाठी कोणी फिरकले नाही, त्यामुळे ही घटना उशिरा निदर्शनास आली अशी मखलाशी आता केली जात आहे, पण अशा गंभीर घटनांकडेही इतके दुर्लक्ष होणार असेल तर अन्य बाबींत काय? असा प्रश्न स्वाभाविकच उपस्थित व्हावा. आमदार रणधीर सावरकर यांना हा विषय थेट विधानसभेत उपस्थित करण्याची वेळ आली, इतका निर्ढावलेपणा येथील व्यवस्थेत आला असेल तर ‘जीएमसी’त कुणाचा धाक उरलाय की नाही? असाही प्रश्न उपस्थित व्हावा.

बरे, हे असे पहिल्यांदाच होते आहे असेही नाही. मागे येथे एक बोगस डॉक्टर ॲप्रन घालून वॉर्डात फिरल्याचे व त्याने एका रुग्णाच्या नातेवाईक असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचे प्रकरणही घडले आहे. त्याबद्दल पोलिसांत अधिकृतपणे गुन्हाही दाखल करण्यात आला होता. रुग्णांच्या होत असलेल्या हेळसांडबद्दल तर विचारू नका इतक्या तक्रारी व ओरड आहे. स्त्रीरोग विभागात प्रसूतीसाठी आलेल्या भगिनींना खाटा उपलब्ध होत नाहीत म्हणून चक्क फरशीवर झोपून राहावे लागते, अशी स्थिती कधीकधी बघावयास मिळते. अतिदक्षता विभागातील रुग्णांना इकडून तिकडे न्यायचे म्हटले तर स्ट्रेचर ओढायला कर्मचारी नसतात, रुग्णांचे नातेवाईकच अनेकदा ती जबाबदारी पार पाडताना दिसतात. तक्रारींचा पाढाच वाचायचा तर ती यादी आणखीही मोठी होईल, पण येथे कुणाचे नियंत्रणच उरलेले नाही, हेच यातून निदर्शनास यावे.

मागे बच्चू कडू पालकमंत्री असताना या रुग्णालयातील खानावळीचे रेकॉर्ड अद्ययावत ठेवले जात नाही म्हणून त्यांनी एकाच्या कानशिलात लगावली होती. बरीचशी औषधी बाहेरून आणावी लागतात, येथे दलाली वाढली, असा आरोप त्यावेळी झाला होता व दलाल कोण आहेत त्यांची नावेही सांगितली गेली होती. पण, दिवस उलटले आणि आता पुन्हा तेच दलाल तेथे सक्रिय झाल्याची ओरड होत आहे. दोन-चार वर्षांपूर्वी या रुग्णालयातील रक्त संकलनाचे कामकाज राज्यात अव्वल ठरले होते, आता त्याकडेही दुर्लक्ष झाले असून, रक्तदान शिबिरेच होताना दिसत नाहीत; उलट गेल्या काही महिन्यांपूर्वी रक्त चाचणीच चुकीच्या पद्धतीने केली गेल्याचे प्रकरण समोर आले होते. थोडक्यात, या सरकारी रुग्णालयात रामभरोसे कारभार सुरू असून कोणी वालीच उरला नसल्याचे चित्र एकापाठोपाठ एक उघडकीस येणाऱ्या प्रकरणांमुळे समोर आले आहे.

कोरोनाच्या संकटकाळात याच रुग्णालयाने खूप मोठा आधार जनसामान्यांना दिला होता. वैद्यकीय व अवैद्यकीय वर्गानेही स्वतःच्या जिवावर उदार होत रुग्णसेवा करून एक चांगला आदर्श घालून दिला होता. पण, अलीकडे असे काय झाले, की याच सेवार्थींना आरोप सहन करावे लागत आहेत, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. कमी मनुष्यबळात वाढती रुग्णसेवा सुरळीत ठेवणाऱ्या अनुभवी अधिकाऱ्यांना बाजूला सारून अनुभव नसलेल्यांना नेमणुका दिल्याने ही घडी विस्कटते आहे का, हे तपासले जाण्याची गरज आहे. गेल्यावर्षीच येथील अधिष्ठातांवर मनमानी व हुकूमशाहीचा आरोप करणारी तक्रार वरिष्ठांकडे केली गेल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशी आरंभिली गेली होती. पुढे त्या चौकशीचे काय झाले, हे देखील गुलदस्त्यातच राहिले.

सारांशात, सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील अव्यवस्था पुन्हा एकदा समोर आली असून, ती दूर करण्याबद्दल तातडीने व गंभीरपणे पावले उचलली जाणे गरजेचे बनले आहे. अकोल्यास प्राप्त ‘मेडिकल हब’चा लौकिक टिकवून ठेवायचा असेल तर ते गरजेचे आहे.

Web Title: Akola GMC : Is there any fear left in 'GMC' or not?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.