अल् कायदाचे संकट

By admin | Published: September 6, 2014 11:03 AM2014-09-06T11:03:40+5:302014-09-06T11:04:45+5:30

न्यू यॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन इमारतींवर प्रवासी विमानांनी हल्ला चढवून त्या जमीनदोस्त करणार्‍या अल् कायदा या भयकारी संघटनेने आपले लक्ष्य आता भारत, बांगलादेश व म्यानमारकडे वळविले आहे.

Al Qaeda's crisis | अल् कायदाचे संकट

अल् कायदाचे संकट

Next
>न्यू यॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन इमारतींवर प्रवासी विमानांनी हल्ला चढवून त्या जमीनदोस्त करणार्‍या अल् कायदा या भयकारी संघटनेने आपले लक्ष्य आता पूर्वेकडे म्हणजे भारत, बांगलादेश व म्यानमारकडे वळविले आहे. अल् कायदाचे क्रौर्य व हिंसाचारातील त्या संघटनेचा अतिरेक सार्‍या जगाला भीतीचे हादरे देणारा आहे. अल् जवाहिरी या तिच्या  नेत्याने भारतासाठी आपल्या संघटनेची वेगळी शाखा स्थापन केल्याची व ती तात्काळ सक्रिय करण्याची घोषणा केली आहे. अल् जवाहिरीचा पहिला हल्ला काश्मीरवर होण्याची शक्यता व भीती भारतीय वतरुळात व्यक्तही होत आहे. मुळात ओसामा बिन लादेन या जागतिक दहशतखोराने कायदाची स्थापना केली. अमेरिकेने त्याचा खातमा केल्यानंतर त्या संघटनेची सूत्रे या जवाहिरीकडे आली आहेत. इराण, इराक, सिरिया ते थेट इजिप्तपर्यंत आपली अतिरेकी इस्लामी निष्ठा पसरण्याचा तिचा बेत होता. मात्र आता इराक व सिरियामध्ये नव्याने स्थापन झालेल्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँन्ड सिरिया (इसिस) या अतिकडव्या संघटनेने मिळविलेल्या मोठय़ा विजयामुळे अल् कायदाचा तिकडचा प्रवास थांबला आहे. मुळात इसिस हीदेखील अल् कायदाचीच एक शाखा होती. परंतु इसिसच्या मते अल् कायदाचा धर्माचार असावा तेवढा कडवा व टोकाचा नाही. तिच्या मते अल् कायदा ही आता सुधारणावादी बनलेली व मिळमिळीत संघटना आहे. इस्लामच्या जुन्या उपदेशांची व शरियतच्या सगळ्या कायद्यांची योग्य अंमलबजावणी करायची तर जगभरच्या मुसलमानांनी जास्तीतजास्त धर्मश्रद्ध व कडवेच बनले पाहिजे, आपल्या विचाराला विरोध करणारी सारी माणसे थेट कापून काढण्याच्या योग्यतेची आहेत असेच त्यांनी मानले पाहिजे असा इसिसचा आग्रह आहे. अमेरिकेच्या दोन पत्रकारांची मुंडकी धडापासून वेगळी करून व त्याची व्हिडिओ फिल्म जगाला दाखवून आपण किती क्रूर होऊ शकतो हे इसिसने जगाला दाखविलेही आहे. मात्र तिचे क्रौर्य एवढय़ावर थांबणारे नाही. सारे गैरकिताबी (हिंदू, बौद्ध, जैन इ.) मृत्युदंडाला पात्र आहेत ही तिची धारणा आहे. त्याच वेळी ख्रिश्‍चन व ज्यू धर्माच्या लोकांनी आपले धर्मग्रंथ कुराणानुसार दुरुस्त घेतले पाहिजेत अशी तिची मागणी आहे. प्रत्यक्ष मुसलमान धर्मातील शिया पंथाचे लोकही मृत्युदंडाचे अधिकारी असून त्यांना तो दंड दिला पाहिजे असे या कडव्या सुन्नी संघटनेचे म्हणणे आहे. तात्पर्य, इस्लाममधील कडव्या सुन्नी पंथाची ही संघटना जगभरचे मुसलमानच नव्हे तर अन्य धर्माचे लोकही आपल्या कट्टर धार्मिक नियंत्रणात आणू इच्छिणारी आहे. इराकच्या बाजूला असलेला इराण हा देश शिया असून, ती या संघटनेच्या मार्गातील सर्वात मोठी अडचण आहे. इसिसने सिरियामधील रक्का या शहरापासून इराकमधील बगदादपर्यंतचा मोठा प्रदेश आपल्या ताब्यात आणला आहे व त्याला तिने खिलाफतीचे नाव दिले आहे. इसिसच्या या विजयाने अल् कायदा या संघटनेला आपल्या कारवायांना आळा घालणे व काही काळ थांबणे भाग पडले आहे. ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर तशीही ती संघटना नेतृत्वहीन बनली आहे. आताचा अल् जवाहिरीचा प्रयत्न तिच्यात नवे प्राण ओतण्याचा आहे. मात्र पश्‍चिमेची बाजू इसिसने ताब्यात घेतल्यामुळे तिला आपले क्षेत्र पूर्वेकडे विस्तारणे गरजेचे वाटू लागले आहे. त्याचमुळे भारत, बांगलादेश व म्यानमारकडे तिची नजर वळली आहे. इसिस असो वा अल् कायदा या जगातल्या सर्वाधिक क्रूर व धर्मांध संघटना आहेत. त्यांच्यापासून इतर सर्व धर्मांएवढाच मुसलमान धर्मातील समजूतदार माणसांनाही मोठा धोका आहे. त्यांचा सर्वात मोठा आघात स्त्रियांवर व्हायचा आहे. अल् कायदाच्या भारतविरोधी पवित्र्याची योग्य व तातडीची दखल भारत सरकारने घेतली आहे. त्यासाठी आपले लष्कर, सीमा सुरक्षा दले, गुप्तचर यंत्रणा आणि सर्व संबंधितांना सावधानतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अल् कायदा किंवा इसिस यांचे शस्त्रधारी जगातील चांगल्या लष्करी यंत्रणेत प्रशिक्षण घेऊन तयार झाले आहेत. शिवाय त्यांच्या डोळ्यांत धर्म आणि खून या दोन्ही गोष्टी एकाच वेळी अवतरल्या आहेत. त्यामुळे अल् कायदाची ही धमकी केवळ सरकारपुरती व लष्करापुरती आहे असे समजून गप्प राहण्यात अर्थ नाही. समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनी, धर्म, जात, पंथ, वर्ग असे सारे विसरून या संकटाला तोंड देत सामोरे जायचे आहे. या संकटापासून हिंदूंएवढेच मुसलमानही सुरक्षित नाहीत हेही येथे सार्‍यांनी लक्षात घ्यायचे. 

Web Title: Al Qaeda's crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.