बीभत्स रस!
By admin | Published: September 11, 2016 03:29 AM2016-09-11T03:29:55+5:302016-09-11T03:29:55+5:30
प्रत्येक व्यक्तीच्या वृत्तीमध्ये नवरस असतात, असे म्हणतात. त्याचे प्रमाण कमी-अधिक असते एवढेच, पण तरीही स्त्रीच्या बाबतीतील बीभत्स या रसाची कल्पनाच करू शकत नाही.
प्रत्येक व्यक्तीच्या वृत्तीमध्ये नवरस असतात, असे म्हणतात. त्याचे प्रमाण कमी-अधिक असते एवढेच, पण तरीही स्त्रीच्या बाबतीतील बीभत्स या रसाची कल्पनाच करू शकत नाही. कारण निसर्गाने मुळातच स्त्रीला सौंदर्य, ममता आणि सहनशीलता हे गुण पुरुषाच्या तुलनेत अधिक बहाल केले आहेत.
गुरू पंडिता रोहिणी भाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विद्यापीठातून नृत्यात बी. ए. करत असताना, अभ्यासक्रमात 'नवरस' हा विषय आला. कथ्थक नृत्यातून नऊ रस कसे मांडता येतील, याचा विचार सुरू झाला. शृंगार, करुण, रौद्र, वीर, अद्भुत आणि शांत हे रस नृत्यातून दाखवता आले, पण 'बीभत्स रस' कसा दाखवायचा, याचा मी खूप विचार करत होते. कारण मुळात शास्त्रीय नृत्य ही सौंदर्यपूर्ण कला. त्यामध्ये बीभत्स रस कसा परिणामकारकपणे अभिव्यक्त होईल? आणि मग विचार आला, तो अर्थातच पुतना आणि शूर्पणखेचा.
‘बीभत्स’ रस म्हटल्यावर पुतना, शूर्पणखा या आठवल्याच. म्हणजे राक्षस हा होईना, पण स्त्रिया, ऐतिहासिक कथा, पौराणिक कथांमधून येणारी ही व्यक्तीचित्रे साकारताना अभिनयाचा कस लागला. कारण पुतना जेव्हा तिचे खरे रूप धारण करते, तेव्हा तिची भीती नाही, ‘किळस’ वाटली पाहिजे, असे गुरूंनी सांगितले होते, तसेच शूर्पणखेचे. लक्ष्मणला बघून आकर्षित झालेली ‘ती’ जेव्हा त्याच्यासाठी शृंगार करते, तेव्हा पक्षी मारून त्याचे रक्त ती कुंकू म्हणून किंवा ओठ रंगवण्यासाठी वापरते, असे दाखवले आणि बीभत्सता बाहेर आणली.
कोणती सामान्य स्त्री आपल्या स्तनांना विष लावून छोट्या बाळाला छातीशी धरेल? असा बीभत्सपणा कथांमध्येच येऊ शकतो. असा विचार करत असतानाच एके दिवशी वर्तमानपत्रात बातमी वाचली- कचराकुंडीत एका पिशवीत गुंडाळलेले नवजात अर्भक सापडले. बातमी वाचून माझ्या पोटात गोळा आला. हे कुठले स्त्रीचे रूप? मजबुरी, लाचारी, सगळे मान्य.
पण पोटच्या गोळ्याला जन्म दिल्यावर उकिरड्यात टाकायचे? त्याला तिथे किडमुंग्या वेढणार, कुत्री हुंगणार. कोणाच्या लक्षात आले नाही, तर कचऱ्याच्या गाडीबरोबर त्याची विल्हेवाट लागणार. हा सगळा विचार त्या आईच्या मनात का येत नाही? नऊ महिने पोटात वाढवल्यावर आईची नाळ आपोआप बाळाशी जुळलेली असते. ‘मातृत्व’ ही नितांत सुंदर गोष्ट निसर्गाने बहाल केल्यावर केलेली ही कृती खरोखरच घृणा आणणारी आहे.
काही काळापूर्वीच वाचलेले एक वृत्त मनातून पुसलेच जात नाही. विवाहबाह्य संबंध असणाऱ्या एका महिलेने आपल्या प्रेम प्रकरणामध्ये अडथळा आणणाऱ्या आपल्या दहा वर्षांच्या मुलाचा खून केला. अशीच एक दुसरीही बातमी - मूल सारखे रडते, म्हणून कंटाळून एका महिलेने दगडाने त्याच्या डोक्यावर प्रहार केला आणि मूल जागीच ठार झाले. अशा असंख्य बातम्या वाचल्यावर लक्षात आले की, पूर्वी केवळ राक्षसी स्त्रीमध्ये दिसणारा ‘बीभत्स रस’ आता सामान्य स्त्रियांमध्येही दिसू लागला आहे. कदाचित, परिस्थितीने गांजलेल्या, गरीब घरातून आल्यामुळे परिस्थितीने पिचलेल्यांबाबतीत असे घडत असेल, असे वाटले, पण तोपर्यंत ‘शीना बोरा प्रकरण’ समोर आले आणि उच्चभ्रू समाजात दिसणारा हा बीभत्स रस बघून जीवनाचे विदारक रूप डोळ्यासमोर आले. त्याच्यासारखे दुसरे प्रकरण याच उच्चशिक्षित, गलेलठ्ठ पगार असणाऱ्या ‘हायप्रोफाइल’ वकीलबार्इंनी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत वडील-मुलाला उडवले. स्त्रियांनी धूम्रपान करणे, ड्रग्जसारखी व्यसने करणे हे सध्याच्या समाजात ‘स्टेटस सिम्बॉल’चे लक्षण समजले जातेय. आज एक इंद्राणी मुखर्जी माध्यमांसमोर आली, पण समाजात अशा किती तरी इंद्राणी असतील- ज्या पैशासाठी, सत्तेसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. अशा स्त्रियांना आणि त्यांच्या वागणुकीला काय म्हणणार? ही केवळ दृष्ट
प्रवृत्ती नाही, तर ही एक विकृत मनोवृत्ती आहे. त्यातून जे घडते, ते बीभत्सतेचे दर्शन आहे.
मी तर म्हणेन, पुतना बरी. तिने निदान स्वत:च्या नाही, तर दुसऱ्याच्या मुलांना मारण्याचा प्रयत्न केला. इथे तर स्वत:च्याच मुलांचा बळी घेऊन वर काही घडलेच नाही, आपण त्या गावचेच नाही, असा बुरखा पांघरला जातो.
समाज बाजूला राहिला, पण एक आई म्हणून स्वत:चे संवेदनशील अंतर्मनही तिला खात नाही का? का ही संवेदनाच नष्ट झाली आहे? कारण असे झाले तर ‘स्त्री म्हणजे अनंतकाळाची माता, मातृत्वाचा झारा, शालीनता’ ही सगळी विशेषणे खोटी ठरतील. उरेल ते बाहेरचे म्हणजेच नुसतेच शारीरिक सौंदर्य. (कदाचित तेही पैसे देऊन सर्जरीने बदलून घेतलेले) आणि आपण या सुंदर शरीराच्या मागे असेल, ती केवळ किळसवाणी बीभत्सता.
(लेखिका प्रसिद्ध नृत्यांगना आहेत.)