आलिया, आथिया, कियारा... आणि तुम्ही-आम्ही!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 10:10 AM2023-02-11T10:10:55+5:302023-02-11T10:12:40+5:30

‘नॅचरल’ आणि ‘सटल’ हा कोविडोत्तर काळाचा नवा चेहरा आहे. तरुण पिढी नैसर्गिक रंगरूप, स्वत:चा आहे तसा स्वीकार या गोष्टींकडे वळताना दिसते आहे!

Alia Athiya Kiara and you-us | आलिया, आथिया, कियारा... आणि तुम्ही-आम्ही!

आलिया, आथिया, कियारा... आणि तुम्ही-आम्ही!

Next

लीना खांडेकर, मेकअप आणि सौंदर्यतज्ज्ञ 

आलिया भटचे लग्न झाल्यानंतरची गोष्ट. त्यानंतर आमच्याकडे ब्रायडल मेकअप किंवा सायडर मेकअपच्या (नवरीच्या मैत्रिणी, आई, बहीण, सासू.. यांचा मेकअप) चौकशीसाठी येणारी अनेक जोडपी सोबत आलिया भटच्या लग्नातले फोटोच घेऊन येत. साधारण असा ‘लूक’ हवा, अशी मागणी असे. आलिया भटच्या लग्नापूर्वी दीपिका पदुकोणचे लग्न झाले तेव्हाही तिचे फोटो घेऊन येणारे होतेच. पण हा केवळ सिनेस्टार जसे दिसतात तसे आपण दिसावे एवढ्यापुरताच झालेला मेकअप आणि स्टाइ।लचा बदल नव्हे. 

आम्ही आमच्यापुरता केलेला छोटासा सर्व्हे सांगतो की, हा माणसांच्या मनोवृत्तीत कोविडोत्तर काळात झालेला महत्त्वाचा बदल आहे. त्याचे प्रतिबिंब बहुतेकांच्या जगण्यात दिसते, ही माणसे ‘सेलिब्रिटी’ असतात; तेव्हा ते बदल अधिक ठळकपणे ‘दिसतात’  आणि म्हणून पटकन समोर येतात, एवढेच! अलीकडच्या काळात झालेली सिनेस्टार जोडप्यांची बहुतेक लग्ने आठवून पाहा! आलिया भट, कतरिना कैफ, आथिया शेट्टी आणि आता कियारा अडवाणी या सगळ्यांचे लग्नातले पोषाख, त्यांनी केलेला मेकअप हेच सांगतात की, लोकांना आता चेहऱ्यावर भरमसाठ मेकअप प्रॉडक्ट्स नको आहेत. अनेक रंगछटा  असलेला डार्क मेकअप करण्याची, चेहऱ्यावर अनेक रसायनं लावण्याची इच्छा कमी झाली आहे. त्यापेक्षा आपल्या खास प्रसंगात मेकअपलाही नैसर्गिक पोत हवा, असे आता अनेकांना वाटते. मुळात अजून एक सोयीची गोष्ट म्हणजे मेकअप करून मेकअप आर्टिस्ट गेला की आपलं आपल्याला टचअप करता येईल इतपत ‘सटल’ मेकअप असावा, असा हा नवा ट्रेण्ड आहे.

महत्त्वाची आहे ती  आणखीन एक गोष्ट ! - आपण जसे आहोत तसेच लग्नात दिसावं, असं मनापासून वाटणं!  आपण ‘जसे’ आहोत ‘तसे’ दिसणं, आपलं ‘रूप’ आपल्यासारखं दिसणं हेच अनेकांना आता जास्त महत्त्वाचं वाटतं. भरमसाठ मेकअप करून आपण आपल्यालाच ओळखू येऊ नये इतके लग्न समारंभात वेगळं दिसणं योग्य नाही ही नवी धारणा आता अनेकजण स्वीकारत आहेत. 

लग्नात मेकअप करताना पूर्ण मेकओव्हर करण्याचा, वेगळंच रुप दिसण्याचा आग्रह आता कुणी धरत नाही असा एक बदल दिसतो आहे. लग्नात सुंदर दिसावं, आपलं रुप उजळावं म्हणून मेकअप केला जातो, नाक, गाल, जॉ लाइन धारदार दिसावी, उठून दिसावी असा आग्रह असतो. मात्र पूर्ण रुपच बदलून टाकणारा मेकअप मात्र आता अनेकजणींना नको असतो. आपण जसे आहोत तसा आपला स्वीकार आपण करावा आणि इतरांनीही करावा अशी नवी मानसिकता आहे. हा ‘स्व’स्वीकार ही अत्यंत मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे, मेकअप पलीकडची. एकदा ते स्वीकारलं की नैसर्गिक छटा असलेला मेकअप करणं हे त्याचा पुढचा भाग होतं. आणि तोच आता नव्या पिढीच्या मानसिकतेचा निदर्शक आहे.

त्यामुळे आपलं  नैसर्गिक सौंदर्य राखून, काही उणिवा असतील तर मेकअपने त्या थोड्या झाकून आपलं रंगरूप अधिक खुलून दिसेल इतपतच मेकअप हल्ली अनेकजणी करतात. तसेच कपडेही निवडतात. कारण मेकअप, दिसणं, कपडे, स्वत:च्या नैसर्गिक रंगरूपाचा स्वीकार, आपण  जसे आहोत तसं दिसणं हे एकेकटं येत नाही; ते सारं मिळून व्यक्तित्त्व खुलतं. 

त्यामुळे आता अलीकडच्या लग्नात पाहिलं तर हलक्या, नैसर्गिक रंगाचे कपडे, तसाच मेकअप हे तर दिसतंच पण अगदी फुलांची सजावटही नैसर्गिक नाजूक फुलांची दिसते. गुलाबाच्या पाकळ्या, मोगऱ्याचे गजरे, ऑर्किड किंवा अन्य नाजूक सुंदर फुलांची सजावट दिसते. केशरचनेच्या बाबतीतही तेच! तात्पुरते कृत्रिम केस (विग) लावलेल्या केशरचना कमी दिसतात. त्यापेक्षा आपलेच सुंदर केस, त्याचा नैसर्गिक पोत, त्यावर फुलांचे गजरे अशी केशरचना अनेकजण करताना दिसतात.

त्यामुळे आज आलिया-कियाराच्या लग्नात जो ट्रेण्ड दिसला तो लवकरच आपल्या अवती-भोवतीच्या लग्नातही दिसू लागेल आणि हा ट्रेण्ड आता अनेक वर्षे टिकेल, अशी शक्यता आहे. कारण ‘नॅचरल’ आणि ‘सटल’ हा या काळाचा नवा चेहरा आहे. तरुण पिढीतले अनेकजण नैसर्गिक गोष्टी आणि नैसर्गिक रंगरूप, स्वत:चा आहे तसा स्वीकार या गोष्टींकडे वळत आहेत.

खरं सांगायचं तर असा नॅचरल-न्यूड मेकअप करणं ही सोपी गोष्ट दिसते. भडक मेकअपसारखा हा मेकअप दिसत नसला तरी नैसर्गिक रंग वापरून, कमीत कमी गोष्टी वापरून, अत्यंत कमीत कमी सौंदर्यप्रसाधनं वापरून मेकअप करणं, तो नॅचरल दिसणं आणि तरीही रूप खुलून येणं ही सोपी गोष्ट नाही. ती एक कला आहे. कुणाही मेकअप कलावंतासाठी सर्वात कठीण साधना असते ती म्हणजे अजिबात न दिसेल असा मेकअप करणं!

भडक मेकअप आणि गडद रंग या पलीकडे जाऊन आता असे नैसर्गिक रंग अवती-भोवतीच्या लग्नसोहळ्यात दिसले तर समजावं की हा नवा स्वीकार आहे, आपणच आपल्या रूपाचा केलेला स्वीकार!

Web Title: Alia Athiya Kiara and you-us

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.