सर्वसमावेशकतेकडून सोवळेपणाकडे...

By admin | Published: March 27, 2017 12:27 AM2017-03-27T00:27:43+5:302017-03-27T00:27:43+5:30

संघ आणि भाजपा यांची व त्यांच्या सर्व सहयोगी संघटनांची वाटचाल आता सर्वसमावेशक हिंदुत्वाकडून सोवळ्या हिंदुत्वाकडे सुरू

From all the conveniences ... | सर्वसमावेशकतेकडून सोवळेपणाकडे...

सर्वसमावेशकतेकडून सोवळेपणाकडे...

Next

संघ आणि भाजपा यांची व त्यांच्या सर्व सहयोगी संघटनांची वाटचाल आता सर्वसमावेशक हिंदुत्वाकडून सोवळ्या हिंदुत्वाकडे सुरू झाली आहे. संघ, भाजपा व त्यांच्या सहयोगी संघटनांमध्ये आता बहुजन समाज मोठ्या प्रमाणावर सहभागी झाला आहे. मात्र त्यातील अनेकांना, अगदी अभ्यासू म्हणवणाऱ्यांनाही या दिशेचे भान अजून आले नाही. ‘कॅच देम यंग’ या म्हणीनुसार लहानपणीच संघाच्या शिशू पथकात सामील करून घेतलेल्या मुलांवर जो संस्कार केला जातो तो जरा काळजीपूर्वक पाहिला तरी तो हिंदुत्वाहून एकारलेपणावर अधिक असल्याचे आढळते. कडवे हिंदुत्व, टोकाचा मुस्लीमद्वेष, ख्रिश्चनांचा धारदार तिरस्कार, म. गांधींपासून पं. नेहरूंपर्यंतच्या सगळ्या सर्वसमावेशक विचारांच्या नेत्यांविषयी अप्रीती, स्वातंत्र्यलढ्याने निर्माण केलेल्या लोकशाही मूल्यांविषयीचा रोष असे सारेच त्या संस्काराचा भाग असते. ही मुले पुढे जाऊन त्याच मानसिकतेत वाढतात. त्यातून भारतात मुले बापाचा पक्ष त्याच्या वारशासारखाच निष्ठेने स्वीकारत असल्याने आपल्या पक्षांना जातींसारखेच वंश परंपरेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. काँग्रेसवाल्यांच्या मुलांनी काँग्रेसमध्ये असणे, रिपब्लिकनांच्या मुलांनी आंबेडकरी होणे हे येथे जेवढे स्वाभाविक तेवढेच भाजपा वा जनसंघाच्या लोकांच्या मुलांनी प्रथम संघ, नंतर विद्यार्थी परिषद, पुढे भाजयुमो आणि शेवटी भाजपात जाणे स्वाभाविक ठरते. भाजपा सत्तेत आल्यानंतर त्या पक्षाविषयीचे प्रेम अचानक उफाळून आलेल्यांचाही एक वर्ग आहे. तसा तो काँग्रेसच्या सत्ताकाळात त्याच्याकडे वळणाऱ्यांचाही होता. आताच्या एस. एम. कृष्णांपासून दत्ता मेघे यांच्यापर्यंतचे पुढारी व त्यांची मुले या माळेतली आहेत. सत्तेचे आकर्षण जबरदस्त असल्यामुळे आपली पावले कोणत्या वाटेवर जात आहेत याची त्यांना काळजी नसते व ती समजून घेण्याची गरजही त्यांना वाटत नाही. भाजपा सत्तेवर आल्यानंतर शाळांमध्ये सुरू झालेले सूर्यनमस्कार, दैवतांच्या प्रार्थना, गुढीपाडव्याची नागरी संचालने, गोवंश हत्त्येवरील बंदी, मुस्लिमांना पक्षाची तिकिटे द्यायला नकार, प्रज्ञा सिंहपासून सगळ्या दंगलखोरांच्या सुटकेच्या व्यवस्था, मुसलमान-खिश्चन व अन्य अल्पसंख्याकांविरुद्ध केला जाणारा पक्षपात, आरक्षणाच्या फेरविचाराची भाषा, योजना आयोगाचे ‘नीती’करण ही सगळी या वाटचालीची चिन्हे आहेत. आणि त्यांना राष्ट्रधर्माची झालर चिकटविण्याचे काम संघप्रणीत संस्था व त्यांच्या माध्यमांमार्फत व्यवस्थित केले जात आहे. सत्तेमुळे आपण सुरक्षित आहोत असा समज करून घेतलेली या संस्थांमधील बहुसंख्य ‘सुसंस्कारित’ माणसेही यालाच राष्ट्रधर्म समजू लागली आहेत. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावर आदित्यनाथ या महंताची निवड होणे हा या वाटचालीतील मैलाचा मोठा दगड आहे. उत्तर प्रदेशात बाबरीचा विध्वंस झाला. तेथे राममंदिराच्या उभारणीची तयारी आहे. दादरीकांड तिथले आणि मुजफ्फरपुरातील अल्पसंख्याकांची कत्तलही तिथलीच. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आदित्यनाथांनी आपल्या निवासाच्या प्रवेशद्वारावर धर्मचिन्हे रंगवून या प्रकाराची खात्रीही पटविली आहे. राज्यातील सत्ता ग्रहण करताच त्यांनी कत्तलखाने बंद करण्याचा आदेश काढला. तो सरकारी यंत्रणेने अंमलात आणण्याआधीच आदित्यनाथांच्या हिंदू युवा सेनेने ते जाळायला सुरुवात केली. बिहारात १२०० चर्च जाळणे, ओडिशा, कर्नाटक व गुजरातेत शेकडो मशिदी उद्ध्वस्त करणे या कार्यक्रमांची या प्रकाराशी असलेली संलग्नता लक्षात घेण्याजोगी आहे. आदित्यनाथांच्या या कडवेपणावर न्यू यॉर्क टाइम्सनेच आपल्या संपादकीयात कठोर टीका केली आहे. (ट्रम्प यांच्यावर टीका करून या वृत्तपत्राने आपल्यावर अध्यक्षीय बहिष्कार ओढवून घेतला आहे, हे येथे उल्लेखनीय.) काही काळापूर्वी मुंबईतील अनेक वसाहतींनी त्यात मांसाहार करणाऱ्यांना प्रवेश नाकारल्याचा व त्यांचे सोवळे स्वरूप टिकवण्याचा प्रयत्न केला. त्याला राज ठाकरे आणि खाडिलकरांच्या नवाकाळने प्रखर विरोध केला. मात्र तसे करणाऱ्यांचे जातीय उद्योग सुरूच राहिले. एखाद्या संघटनेचा विचार चांगला असेल तर तो आत्मसात करण्यात काही गैर नाही. परंतु सत्तेचा वापर करून सर्वसमावेशक राष्ट्रधर्मावर एकारलेपणा लादणे व तोही कडव्या वळणावर नेणे याला जे सामाजिक उन्नयन म्हणतात त्यांची मानसिकता तपासूनच पाहिली पाहिजे. पं. नेहरू म्हणायचे, एका धर्मश्रद्ध समाजाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्रात रूपांतर करणे हे देशासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. आताचे राजकारण धर्मश्रद्धेकडून धर्मग्रस्ततेकडे व तेथून पुढे धर्मांधतेकडे नेणारे आहे हे येथे लक्षात घ्यायचे. तिकडे अमेरिका एका कृष्णवर्णीय नेत्याला आपला अध्यक्ष निवडते, अनेक मुस्लीम देशांच्या प्रमुखपदी महिलांची निवड होते, हिटलरच्या जर्मनीत अ‍ॅन्जेला मेर्केल पंतप्रधान होतात आणि आमच्या येथे महंत, बैरागी, साधू, साध्व्या आणि योगी म्हणविणाऱ्या सत्ताकांक्षी लोकांना उच्चपदे प्राप्त होतात हे लक्षण आता केवळ हिंदू धर्माचे राहिले नसून त्याच्यावर वर्चस्व लादणाऱ्यांचे आहे ही बाब येथे महत्त्वाची आहे. हे ज्यांना मनोमन मान्य आहे त्यांना काही सांगायचे नसते. ज्यांच्या ते लक्षात आले नसते त्यांच्याकडूनच काही आशा बाळगायची असते.

Web Title: From all the conveniences ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.