सर्वं मधु।
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 04:31 AM2018-08-15T04:31:40+5:302018-08-15T04:31:53+5:30
धूच्या वडिलांचे निधन झाले. अंत्येष्टी संस्कार तीर्थक्षेत्री करण्याचे ठरले. दिवस थंडीचे. सकाळी उठून तीर्थक्षेत्रावर तीनदा गार पाण्याचे स्नान. मधू पार गारठला. वडिलांचे और्ध्वदेहिक आपल्या हातून व्यवस्थित पार पडावे, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी या हेतूने मधूने सर्व विधी व्यवस्थित केले. विधी चालू असताना पुरोहितांनी सर्वं मधु। सर्वं मधु।
- डॉ. गोविंद काळे
मधूच्या वडिलांचे निधन झाले. अंत्येष्टी संस्कार तीर्थक्षेत्री करण्याचे ठरले. दिवस थंडीचे. सकाळी उठून तीर्थक्षेत्रावर तीनदा गार पाण्याचे स्नान. मधू पार गारठला. वडिलांचे और्ध्वदेहिक आपल्या हातून व्यवस्थित पार पडावे, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी या हेतूने मधूने सर्व विधी व्यवस्थित केले. विधी चालू असताना पुरोहितांनी सर्वं मधु। सर्वं मधु। सर्वं मधु असे मधुकडून त्रिवार म्हणून घेतले. मधूला वाटले वडिलांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून भटजीनी ‘सर्वं मधु’ असे त्रिवार म्हणून घेतले. म्हणजे तुमचे सर्व काही मधूच आहे असा अर्थ मधूने काढला.
मधु म्हणजे मध हा सर्वांना माहीत असणारा लौकिक अर्थ. देवपूजेमध्ये पंचामृत स्नान देवास घालताना ‘मधुस्नानं समर्पयामि’ असे म्हणून पळीतील मधाचा थेंब देवाच्या अंगावर घातला जातो. तर भा. रा. तांबेंच्या गीतात ‘मधु मागसी माझ्या सख्या परि। मधु घटची रिकामे पडती घरी’ असा संदर्भ येतो. जीवनात मधाची आवश्यकता फार आहे. एखादे काम होईना तर लावा साहेबांना मधाचे बोट म्हणजे लवकर काम फत्ते होईल, असे म्हटले जाई. म्हणजे कार्यपूर्तीसाठी मधाचे बोट पाहिजे तर.
वैदिक ऋषींची तर प्रार्थनाच होती.
‘‘मधु वाता ऋतायते मधुक्षरंति सिन्धव:’’ ऋग्वेदाच्या प्रथम मंडलातील ९०वे सूक्त. या ठिकाणी मधुचा अर्थ पोषक शक्ती, सुमधुर, सुखकर असा करण्यात आला आहे. मधुने आपल्या जीवनात कायमचेच घर केले आहे. मधुचा मधुकर महिमा भारतीय संस्कृतीने सर्वमान्य केला आहे. आचार्य विनोबा भावेंच्या लहानशा परंतु विचाराने परिप्लुत असलेल्या पुस्तकाचे नाव आहे मधुकर.
मधूच्या वडिलांची अंत्येष्टी करणाऱ्या भटजींना ‘सर्वं मधु’ हे जे तुम्ही वदवून घेतले या ठिकाणी मधुचा अर्थ काय घ्यावयाचा असे आम्ही विचारले. तेव्हा ते म्हणाले तुम्ही अजून लहान आहात. आपल्या संस्कारांची व्यवस्था पूर्वजांनी मानवी कल्याण डोळ्यापुढे ठेवूनच केली हे नि:संशय सत्य अभ्यासाअंती स्वीकारावे लागते. ‘मधु’ म्हणजे ब्रह्म. ‘सर्वं मधु’ म्हणजे सर्व ब्रह्ममय आहे. मधुचा अलौकिक अर्थ पहिल्यांदाच कुणीतरी समजावून सांगितला होता. नाशवंत विश्वाच्या ठिकाणीसुद्धा पूर्वजांनी ब्रह्म पाहिले. ब्रह्म अनुभविले. ‘ऋषे: तु दर्शनात््’ अशी ऋषींची व्याख्या केली जाते. ब्रह्मैक्य भावच त्यांनी ऋचांतून गायिला. तो जर कळला तर ‘सर्वं मधु। सर्वं मधु। सर्वं मधु हेच गाणे विश्व आनंदाने गायील.