ऋषी सुनक यांची सर्कस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2023 08:56 AM2023-11-16T08:56:08+5:302023-11-16T08:56:17+5:30
ऋषी सुनक भारतावर दीडशे वर्षे राज्य केलेल्या इंग्लंडचे पंतप्रधान बनल्याचा तमाम भारतीयांना झालेला आनंद त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीला वर्ष उलटले तरी अजून तसाच आहे.
भारतीय वंशाचा समान वारसा सांगणारे कोणी कधीकाळी जगावर राज्य केलेल्या इंग्लंडसारख्या मोठ्या देशात उच्चपदस्थ असतील तर त्यांचे सूर कायम जुळलेलेच असतील, असे अजिबात नाही. विचारधारा समान असूनही त्यातील कडवेपणा कमी-अधिक असल्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये विसंवाद वाढू शकतो, हे ऋषी सुनक व सुएला ब्रेव्हरमन यांच्या रूपाने जगाने अनुभवले. सुधा व नारायण मूर्ती या प्रसिद्ध दाम्पत्याचे जावई ऋषी सुनक भारतावर दीडशे वर्षे राज्य केलेल्या इंग्लंडचे पंतप्रधान बनल्याचा तमाम भारतीयांना झालेला आनंद त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीला वर्ष उलटले तरी अजून तसाच आहे.
सुनक हुजूर पक्षाचे नेतेही. त्यांच्या मंत्रिमंडळात गृहखाते सांभाळणाऱ्या सुएला ब्रेव्हरमन या कडव्या उजव्या विचारधारेच्या आक्रमक महिला नेत्या. इतक्या उजव्या की युरोपीय संघातून बाहेर पडण्याच्या बाजूने जनमत चाचणीचा कौल आल्यानंतरही संघात राहण्याचा प्रयत्न तत्कालीन पंतप्रधान थेरेसा मे यांनी केला तर सुएला यांनी त्याविरुद्ध दंड थोपटले, मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडल्या. त्याचे कारण, देश चालविणाऱ्या नेत्यांना म्हणजे जनमत चाचणी ज्यांच्या काळात झाली ते डेव्हिड कॅमेरून व त्यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान बनलेल्या थेरेसा मे यांना मात्र तो कौल मान्य नव्हता. त्यामुळे आपण युरोप खंडाचे नेतृत्व गमावून बसू, असे वाटत होते; परंतु, सत्ताधारी हुजूर पक्षातील मोठ्या गटाचे उजवेपण इतके कडवे की त्यांना ब्रेक्झिटचा निवाडा मान्य करावा लागला. कडव्या सुएला ब्रेव्हरमन लंडनमधील द टाइम्समध्ये लिहिलेल्या एका लेखाने वादात अडकल्या.
गृहमंत्री असताना त्यांनी आपल्याच पोलिसदलावर टीका केली. इस्रायल विरूद्ध हमास यांच्यातील रक्तरंजित संघर्षात पॅलेस्टाईन जनतेच्या बाजूने रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांविरुद्ध पोलिसांनी नरमाईचे धोरण अवलंबिले, पोलिस खातेच पॅलेस्टाईन धार्जिणे आहे, असा ठपका त्यांनी त्या लेखात ठेवला होता. त्यावरून टीका होताच पंतप्रधान सुनक यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. परराष्ट्रमंत्री जेम्स क्लेवर्ली यांच्याकडे गृहखाते सोपविले आणि विदेश मंत्रालय सांभाळण्यासाठी माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांना पाचारण केले. राजकीय विजनवासात गेलेले कॅमेरून यांनी आनंदाने हे निमंत्रण स्वीकारले. युक्रेनवरील रशियाचे आक्रमण, हमास-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंग्लंड व जगापुढे उभी राहिलेली आव्हाने पेलण्यासाठी आपण पंतप्रधान सुनक यांच्यासोबत उभे राहू, असा शब्दही दिला.
कॅमेरून यांच्याकडे परराष्ट्रखाते देण्याचे कारण त्यांचा पंतप्रधानपदाचा दहा वर्षांचा अनुभव हे आहे. तथापि, या घडामोडींमुळे ऋषी सुनक यांच्यापुढे पक्षांतर्गत आव्हाने उभी राहिली आहेत. सुएला यांना हटवून आणि कॅमेरून यांना मंत्रिमंडळात घेऊन सुनक हे पक्षातल्याच मवाळ गटाकडे झुकल्याचा आरोप करीत त्यांनी आता हुजूर पक्षाचे नेतेपद सोडावे, असा दबाव वाढत आहे. खुद्द सुएला ब्रेव्हरमन यांनी त्यांच्यावर अपयशी ठरल्याची टीका केली आहे, तर अँड्रिया जेनकिन्स या कट्टर खासदारांनी त्यांच्या पक्षनेतेपदाच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे.
पक्षाच्या शंभरपैकी ऐंशी खासदार काही ना काही कारणांनी सुनक यांच्यावर नाराज असले तरी ते एकजूट नाहीत. त्यांच्यात अनेक गटतट आहेत. त्यामुळे सुनक यांना पक्षनेतेपदावरून दूर करण्यासाठी आवश्यक असलेले ५३ खासदार एकत्र येण्याची शक्यता सध्या तरी नाही; पण यापेक्षा मोठे आव्हान येत्या २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाला पुन्हा सत्तेवर आणण्याचे आहे. ज्या डेव्हिड कॅमेरून यांना त्यांनी जवळ केले आहे, त्यांचा आदर्श सत्ता टिकविण्यासाठी सुनक यांच्यापुढे आहे. २००५ च्या निवडणुकीत हुजूर पक्षाचा पराभव झाल्यानंतर कॅमेरून यांनीच मजूर पक्षातील उदारमतवादी नेत्यांना सोबत घेऊन आघाडी सरकार यशस्वीपणे चालविले.
अवघ्या ४३व्या वर्षी पंतप्रधान बनणारे ते इंग्लंडच्या दोनशे वर्षांतील सर्वात तरुण नेते होते. दहा वर्षे देश चालविल्यानंतर ब्रेक्झिटच्या निमित्ताने त्यांनी राजीनामा दिला. आता सुएला ब्रेव्हरमन यांच्या हकालपट्टीनंतर सुनक यांच्यासमोर पक्षातल्या अतिउजव्यांचे अधिक लाड करण्याचे आव्हान आहे. त्या गटातील इस्थर मॅकवे यांना बिनखात्याचे मंत्री बनवून त्यांनी समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि, त्यामुळे कडवे टोरी खरेच समाधानी होतील का आणि येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत ऋषी सुनक यांच्याकडेच हुजूर पक्षाची धुरा राहील का, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे. तेव्हा, जगाच्या राजकारणात इंग्लंडचा दबदबा कायम ठेवताना, जागतिक पेचप्रसंगांवेळी योग्य ती भूमिका बजावताना पक्षांतर्गत सर्कस ऋषी सुनक यांना चालवावी लागणार आहे.