सारेच तसे तर मग हे कोण करतंय?
By admin | Published: April 18, 2016 02:44 AM2016-04-18T02:44:41+5:302016-04-18T02:44:41+5:30
पुढाऱ्यांनी जर गेंड्याची कातडी पांघरली असेल तर गोरगरिबांनी जायचे कोठे हा खरा सवाल आहे...प्रशासनदेखील ढिम्मच आहे. ‘कॅमेरामन अमूक बरोबर टमूक’असे सांगणाऱ्यांनी
- यदू जोशी
पुढाऱ्यांनी जर गेंड्याची कातडी पांघरली असेल तर गोरगरिबांनी जायचे कोठे हा खरा सवाल आहे...प्रशासनदेखील ढिम्मच आहे. ‘कॅमेरामन अमूक बरोबर टमूक’असे सांगणाऱ्यांनी दुष्काळी कामे करतंय तरी कोण याचे प्रामाणिक
उत्तर दिले तर बरे होईल.
दुष्काळाबाबत महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या संवेदनशीलतेचे कौतुक केले पाहिजे. औरंगाबादमध्ये शिवसेनेने आणि जालन्यामध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भव्य सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करून माणुसकीचे दर्शन घडविले. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हे येत्या रविवारी परतूरमध्ये ४०० विवाहांचे आयोजन करीत आहेत. परळी वैजनाथला धनंजय मुंडेंच्या पुढाकाराने सामूहिक विवाह होत आहेत. जलसंधारणाच्या कामावर त्यांनी श्रमदान केले. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मतदारसंघातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात स्वत: उभे राहून पेरणी करून दिली होती. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे जलयुक्त शिवारच्या यशस्वीतेसाठी धडपडताहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय हे दुष्काळी भागातील उपाययोजनांचा बारीकसारीक दररोज आढावा घेतल्याशिवाय झोपत नाहीत. रेल्वेने पाणी मीरजहून लातूरला आणण्यात हे दोघे, ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांचं मोठं योगदान आहे. आता रेल्वेचे डबे वाढविले जाणार आहेत. या कामात लातूरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले आणि सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी वाखाणण्यासारखे नियोजन केले. खडसे हेलिकॉप्टरने गेल्याने पाण्याची नासडी झाल्याचा आरोप योग्य की अयोग्य हा भाग अलाहिदा पण स्वत:च्या प्रकृतीची काळजी बाजूला ठेवून हा माणूस ४४ डिग्रीमध्ये फिरतोय हेही टिपले जायला हवे होते. मराठवाड्यात आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शिवसेना करीत असलेली मदत प्रशंसेस पात्रच आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षाची यंत्रणा कामाला लावली आहे. लातूरचे आमदार अमित देशमुख दुष्काळग्रस्तांना वाऱ्यावर सोडून फॉरेनला गेले म्हणून त्यांना झोडपले. सामान्य माणसाशी नाळ जोडून आयुष्यभर राजकारण करणाऱ्या नेत्याचा हा मुलगा इतकी प्रतारणा करेल का याचा क्षणभरही विचार टीका करणाऱ्यांनी करू नये? लातूरमध्ये त्यांच्या नेतृत्त्वात विलासराव देशमुख फाऊंडेशनचे ३५ पाणी टँकर अव्याहत फिरताहेत. पाच हजार विहिरींचे जलपुनर्भरण केले जात आहे. हिंगोलीचे खासदार राजीव सातव हे हिवरे बाजारचे शिल्पकार पोपटराव पवारांसोबत मोठे काम उभारताहेत. प्रशासनाच्या मदतीने दुष्काळ निवारणाच्या योजनांवर त्यांनी फोकस केले आहे. भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते दिवसरात्र एक करीत आहेत. कॅमरे आणि लेखण्या तिकडेही फिरल्या तर बरे होईल. खाऊचे पैसे दुष्काळग्रस्तांना दिले म्हणून लहान मुलांचे कौतुक करा पण हजारो लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांच्या प्रशंसेबाबत हात का आखडता घेतला जावा?
प्रशासनाने दुष्काळी उपाययोजनांमध्ये झोकून दिले आहे. प्रत्येक जिल्ह्यात वॉर रुम आणि हेल्पलाइन सुरू करण्यात आल्या. ६८ लाख शेतकऱ्यांना २ रुपये किलोने गहू आणि ३ रुपये किलोने तांदुळ मिळतोय. जलयुक्त शिवारची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. राजकारणी मंडळी, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांच्या आरत्या उतरवू नका पण निदान त्यांच्या कामाची पावती दिली तर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसांची उमेद वाढेल. हे सगळे होत असताना दुष्काळी उपाययोजनांसाठी राज्यातील उद्योग विश्व आणि बॉलिवूडने म्हणावे तसे दातृत्व अद्यापही दाखविलेले नाही.
जाता जाता - स्थळ लातूर : अॅड. मनोहर गोमारे वय वर्षे ७०. आख्खं आयुष्य समाजवादी चळवळीत गेलं. डॉ.अशोक कुकडे आख्खी हयात रा.स्व.संघात गेली, अॅड. त्र्यंबकराव झंवर वय ६४, विलासराव देशमुखांचे थिंक टँक राहिले; हाडाचे काँग्रेसजन आहेत. बी. बी. ठोंबरे एक प्रचंड उद्यमशील माणूस, उद्योग हेच विश्व आहे..ही लातूरमधील चार वेगवेगळ्या विचारांची माणसे एकत्र आली आणि मांजरा नदीच्या खोलीकरणावर उपाय शोधला. १८ किलोमीटरचं काम हाती घेतलं. ७ कोटी रुपयांचा खर्च होता. लोकांनी त्यातले साडेतीन कोटी रुपये केवळ आठ दिवसांत दिले. श्री श्री रविशंकर परिवारातील मकरंद जाधव, महादेव गोमारे या दोन तरुणांनी अभियानाची धुरा खांद्यावर घेतली आणि आज लोकसहभागाचा चमत्कार दिसू लागला आहे.या सगळ्यांना साष्टांग नमस्कार!