सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा
By Admin | Published: January 29, 2017 12:33 AM2017-01-29T00:33:40+5:302017-01-29T00:33:40+5:30
दोन महिन्यांपूर्वी मी नोकरीनिमित्त दुबईमध्ये स्थायिक झालो. नवीन देश, नवीन लोक, नवीन भाषा... सर्व काही नवीन. पहिल्यांदाच देशाबाहेर आणि तेही राहण्यासाठी जात असल्याने खूप
- प्रवीण जोगळे
दोन महिन्यांपूर्वी मी नोकरीनिमित्त दुबईमध्ये स्थायिक झालो. नवीन देश, नवीन लोक, नवीन भाषा... सर्व काही नवीन. पहिल्यांदाच देशाबाहेर आणि तेही राहण्यासाठी जात असल्याने खूप टेन्शन होतं. दुबईमध्ये भारतीयांचं प्रमाण खूप आहे. त्यामुळे जास्त अडचणी येत नाहीत, असं ऐकून होतो. मात्र, त्याचा पुरेपूर अनुभव मी घेतला आहे. दुबईमध्ये जवळजवळ ६० टक्के भारतीय असल्याने मी आपल्याच देशात असल्याचं अनुभवत आहे.
मात्र, तरीही कुटुंबीयांची, मित्रांची आठवण येतच राहते. त्यात आपले सण, उत्सव यापासून दूर असल्याने केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून काय तो आनंद मिळवावा लागतो. अशातच नुकताच झालेला आपला प्रजासत्ताक दिन मी अत्यंत वेगळ्या प्रकारे साजरा केला. कदाचित मी देशाबाहेर असल्याने असेल, परंतु यंदाच्या २६ जानेवारीला मी भारतीय असल्याचा अभिमान खूप वेगळा अनुभव देणारा ठरला.
२४ जानेवारीच्या संध्याकाळी माझ्या मित्राने प्रजासत्ताक दिनी बुर्ज खलिफा इमारतीवर भारताच्या तिरंग्याची रोषणाई होणार असल्याचे कळवले. त्याला त्याचे फोटो आणि व्हिडीओ पाहिजे होते. आधी वाटलं असं काही नसेल. परंतु, जेव्हा आॅफिसमध्ये याबाबत मित्रांना विचारलं असता बातमी पक्की असल्याचं कळलं. तेव्हा मात्र, खूप उत्सुकता लागली. शिवाय यंदाच्या प्रजासत्ताक दिनी यूएईचा प्रिन्स भारतात प्रमुख पाहुणा म्हणून निमंत्रित असल्याने बुर्ज खलिफा इमारतीजवळ नक्कीच जल्लोष असणार अशी खात्री पटली. त्यानुसार सर्व प्लानिंग करून ठरवलेल्या वेळेला मी बुर्ज खलिफा इमारतीजवळ गेलो आणि चकितच झालो. शेकडो भारतीय ‘भारतमाता की जय’ आणि ‘जय हिंद’ अशा घोषणा देत होते. इतकंच नाही, तर रस्त्यावरील बहुतेक दुकानांमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त सजावट करण्यात आली होती. भारताचा तिरंगा दुकानांबाहेर फडकत होता. एक वेळ मी भारतातच फिरत असल्याचा भास झाला.
बुर्ज खलिफा परिसरात पोहोचताच क्षणी इमारतीवर लेझर शो सुरू झाला आणि क्षणात माझ्या डोळ्यांसमोर त्या गगनचुंबी इमारतीवर तिरंगा झळकू लागला. तो क्षण तर कधीच विसरता येणार नाही. मी पूर्णपणे गुंग झालो होतो. मी दुबईत असल्याचा विसर पडला. सुरुवातीला दबकत दबकत आलेलो मी अचानकपणे अभिमानाने त्या भव्य इमारतीकडे पाहत होतो आणि नकळत मी म्हणालो ‘भारतमाता की जय...’
शिवाय या वेळी आॅस्कर विजेत्या ए.आर. रेहमान यांचं ‘जय हो’ हे गाणं वाजत होतं. सर्व काही अद्भुत होतं माझ्यासाठी. माझ्या डोळ्यांतून अचानकपणे अश्रू वाहू लागले होते. भारतीय असल्याचा खूप अभिमान वाटत होता. दुसरीकडे, उपस्थित भारतीय उत्स्फूर्तपणे घोषणा देत असताना मी केवळ तो क्षण अनुभवत होतो. माझ्या तोंडून शब्दच पडत नव्हते.
शाळेतला प्रजासत्ताक दिन सतत आठवत होता. आज परक्या देशात हा दिवस साजरा करताना आपले पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांचं म्हणणं खरंच पटलं, ‘सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्तान हमारा...’
(लेखक नोकरीनिमित्त दुबईत स्थायिक आहेत.)