सारे तुझे बहाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 03:33 PM2018-07-13T15:33:46+5:302018-07-13T15:38:34+5:30
चार वर्षांची आमची सत्ता काँग्रेसने ६० वर्षांत केलेली घाण साफ करण्यात गेली, या भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांच्या वाक्याला प्रमाण मानत भाजपाचे मंत्री, लोकप्रतिनिधी त्याचीच उजळण शहर-गावांमध्ये करीत आहेत.
चार वर्षांची आमची सत्ता काँग्रेसने ६० वर्षांत केलेली घाण साफ करण्यात गेली, या भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांच्या वाक्याला प्रमाण मानत भाजपाचे मंत्री, लोकप्रतिनिधी त्याचीच उजळण शहर-गावांमध्ये करीत आहेत. जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तीच री ओढली. आता आम्हाला आणखी दहा वर्षे संधी द्या, म्हणजे खरी कामे करता येतील, असे आवाहन त्यांनी मेळाव्यात केले. शहा जसे कॉंग्रेसला दोष देतात, तसे पाटील यांनी जळगाव महापालिकेतील सत्ताधारी गटाला लक्ष्य केले. जळगाव शहरात कामे होत नाही, त्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी हे राज्यकर्त्यांना अकारण बोल लावत असल्याची मल्लीनाथी पाटील यांनी केली. केंद्र, राज्यात भाजपाची सत्ता आहे; आता महापालिकेतही द्या, आम्ही विकास करुन दाखवतो, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे करीत आहेत. मुळात दहा वर्षे भाजपाचे खासदार, चार वर्षे भाजपाचे आमदार असून जळगावच्या विकासाचे प्रश्न हे लोकप्रतिनिधी सोडवू शकलेले नाहीत, तर महापालिका हाती देऊन भाजपा कोणते दिवे लावणार आहे, असा प्रश्न आता मतदारांना पडला आहे. तत्कालीन राष्टÑपती प्रतिभाताई पाटील यांच्या पुढाकाराने जळगावात विमानतळ झाले. त्यानंतर तब्बल ७ वर्षांंनंतर विमानसेवा सुरु झाली आणि अवघ्या अडीच महिन्यात बंद पडली. मुख्यमंत्र्यांनी जळगावच्या विकासासाठी २५ कोटींचा निधी देऊ केला होता. निधी मिळायला दीड वर्षे लागली तर निधीतून कामे कोणती करावी, यासंबंधी भाजपाचे आमदार आणि महापौर यांच्यात एकवाक्यता नसल्याने वर्षभरात एक पैसा खर्च झालेला नाही. केवळ भाजपाची सत्ता असली तरच विकास करणार हा हेका जळगावकरांना रुचतो काय हे १ आॅगस्ट रोजी होणाऱ्या मतदानातून दिसणार आहे. विकासाचा असाच वादा भाजपाने लोकसभा, विधानसभा निवडणुकीत केला होता. पण त्याचे पुढे काहीच झालेले नाही. मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधी पक्षात असताना कापसाला ७ हजार रुपये भाव मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. सत्ता येऊन चार वर्षे झाली; पण हा भाव शेतकºयांना काही मिळाला नाही. विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खान्देशचा कापूस प्रक्रियेसाठी गुजरातमध्ये का येतो, असा सवाल करीत सत्ता दिल्यास टेक्सटाईल पार्क उभारु, असे आश्वासन दिले होते. हे आश्वासन हवेत विरले आहे. प्रत्येक मतदाराच्या बँक खात्यात १५ लाख जमा होतील, हे आश्वासन तर एक विनोद होता, असेच आता भाजपाची मंडळी म्हणू लागली आहे. कॉंग्रेसने काहीच केले नाही, असे म्हणत चार वर्षे निघून गेले. स्वत: काय केले हे सांगायची वेळ आली तेव्हा भाजपाची मंडळी बहाणे सांगत आहेत. हे बहाणे आता मतदार ओळखू लागला आहे.
-मिलींद कुलकर्णी