युती तुटली, आघाडी फुटली
By Admin | Published: September 26, 2014 04:15 AM2014-09-26T04:15:58+5:302014-09-26T04:15:58+5:30
महाराष्ट्राच्या राजकारणातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युती दोन्ही अपेक्षेप्रमाणे तुटल्या, फुटल्या आहेत
महाराष्ट्राच्या राजकारणातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युती दोन्ही अपेक्षेप्रमाणे तुटल्या, फुटल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस तोंडावर येऊन ठेपेपर्यंत जागावाटपाच्या चर्चा संपत नाहीत, याचाच अर्थ युती आणि आघाडी विसर्जित करण्याची तयारी सर्व संबंधितांनी केली आहे याचा अंदाज राजकीय निरीक्षकांना आलाच होता, तो आता खरा ठरला आहे. बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे युतीचे शिल्पकार काळाच्या पडद्याआड जाताच युतीही काळाच्या पडद्याआड जाईल असे कुणालाही वाटत नव्हते, पण कोणतीही राजकीय युती, आघाडी ही राजकारणाच्या सोयीतूनच होत असते, ही राजकीय सोय संपून एकमेकांची अडचण होऊ लागली की युती किंवा आघाडी तुटणे साहजिक असते. या नियमानुसारच हे सारे घडले आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभेत एकहाती भव्य विजय मिळविल्यानंतर त्या पक्षाच्या महत्त्वाकांक्षा वाढताना दिसत होत्या. पण मध्यंतरी झालेल्या पोटनिवडणुकांत भाजपाला आपला लोकसभेतला पराक्रम पुढे नेता आला नाही, त्यामुळे महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा सावधगिरीने पाऊ ले टाकील असे वाटत होते. पण भाजपाने ती भिती बाळगली असती तर देशाच्या राजकारणात कायमचा वरचष्मा ठेवण्याची संधी या पक्षाने गमावली असती. त्यामुळे आक्रमक राजकारण करायचे असेल तर त्या पक्षासाठी आताच संधी होती. केंद्रात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना राज्यात त्यांच्या कारभाराला आव्हान देणारी सरकारे नकोशी वाटणे साहजिक आहे. त्यात शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे व त्यांची केमिस्ट्री जुळत नव्हती. त्यामुळे महाराष्ट्रात बहुदा त्यांची कोणताही धोका पत्करण्याची तयारी नव्हती. त्यातच युती निवडून आली तर मुख्यमंत्रीपद कोणत्या पक्षाकडे असावे हाही वाद निर्माण झाला होता. भाजपाला ह्यअबकी बारीह्ण त्यांचाच मुख्यमंत्री हवा होता. तिकडे शिवसेनेला युतीतला आपला वरचष्मा सोडायचा नव्हता. युतीतील पहिले स्थान सोडून दुय्यम स्थान पत्करणे म्हणजे शिवसेनेने निवडणुकीआधीच पराभव मान्य करण्यासारखे होते. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव हे मवाळ भूमिका स्वीकारीत आहेत, अशी टीका त्यांच्यावर त्यांच्याच संघटनेतून होत होती. शिवसेनेच्या नेतृत्वाची एक आक्रमक प्रतिमा बाळासाहेबांमुळे निर्माण झाली होती. भाजपाच्या दबावाखाली येऊ न आणि कमी जागा स्वीकारून ही प्रतिमा गमावणे उद्धव ठाकरे यांना परवडणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी कोणतीही तडजोड स्वीकारण्याऐवेजी युती तुटू देणे पसंत केले. एकंदर सर्व परिस्थिती ही युती कायम ठेवण्याला प्रतिकूल अशीच होती. भाजपाने तथाकथित महायुतीतील अन्य घटक पक्षांशी मात्र युती कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचा त्यांना कितपत फायदा होईल ते आता दिसेलच. समविचारी पक्षांची फूट टाळणे हा शिवसेना, भाजपा युतीमागचा उद्देश होता. तो बव्हंशी साध्य होऊ न युतीचे सरकार एकदा सत्तेवर आले होते. पण नंतर मात्र हा हेतू सफल झाला नव्हता. यावेळेस भाजपाला अनुकूल वातावरण असल्यामुळे युती टिकली असती तर कदाचित युतीची सत्ता आली असती. पण आता युतीचे मतविभाजन अटळ आहे, त्यातच लोकसभेच्या वेळची लाटही आता विरली आहे, त्यामुळे भाजपाने युती तोडून जुगारच खेळला आहे असे म्हणावे लागेल. आता भाजपाची राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती होणार का असाही प्रश्न आहे. पण युती तोडताना भाजपाने शिवसेनेवर टीका करण्याचे टाळले आहे, याचा अर्थ निवडणुकीनंतर सत्ता मिळविण्यासाठी हे दोन्ही पुन्हा पक्ष एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. युती तुटल्यामुळे काँग्रेस आघाडीच्या यशाची शक्यता वाढली होती. पण काँग्रेस आघाडीतही जागावाटपाची तणातणी चालू होती. या तणातणीनेही टोकाचे स्वरूप घेतले आणि आता काँग्रेस आघाडीही फुटली आहे. थोडक्यात महाराष्ट्रात राजकीय फेरमांडणी सुरू झाली आहे. प्रत्येकाला आपापल्या बळाची नव्याने जाणीव होऊ लागली आहे. पण त्याचा फायदा सामान्य जनतेला होणार का हा प्रश्न आहे. जागावाटपाची चर्चा करताना त्यात जनतेच्या हिताचा कोणताही विचार दिसत नव्हता. सत्तेवर आल्यानंतर काय करायचे आहे, हे जनतेला कुणीही सांगत नव्हते. एकप्रकारे जनमताची पर्वा न करता हे राजकीय भांडण चालू होते. त्याची अपरिहार्य अशी प्रतिक्रिया मतदानात दिसून आली तर आश्चर्य वाटू नये. पण एक गोष्ट खरी की ही युती तुटल्यामुळे आणि आघाडी फुटल्यामुळे मतदारांसाठी भरपूर पर्याय निर्माण झाले आहेत. आता मतदार या सर्व घडामोडीवर काय प्रतिक्रिया व्यक्त करतात ते पाहण्याची उत्सुकता आहे.