अल्लू अर्जुन, ‘पुष्पा’ आणि मुलांच्या तोंडच्या शिव्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 08:18 IST2025-03-01T08:17:40+5:302025-03-01T08:18:13+5:30
शाळकरी मुलांच्या तोंडी हल्ली असभ्य शब्द असतात, आपण वापरतो त्या शब्दांचा अर्थही न समजणारी मुलं सहज शिव्याही देताना दिसतात. असे का?

अल्लू अर्जुन, ‘पुष्पा’ आणि मुलांच्या तोंडच्या शिव्या!
-डॉ. श्रुती पानसे, मेंदू व शिक्षण अभ्यासक
‘पुष्पा’सारख्या सिनेमांना प्रदर्शनाची परवानगी देताना त्यात वापरलेल्या शिवराळ भाषेचा मुलांवर काय परिणाम होईल, याचा विचार केला जात नाही. माझ्या शाळेतली निम्म्याहून अधिक मुलं हल्ली सहज शिव्या देताना, नको ते असभ्य शब्द वापरताना मी पाहते, तेव्हा आपण पराभूत झालो आहोत, या भावनेने मला हतबल वाटतं, असं हैदराबादच्या युसुफगुडा भागातल्या एका शिक्षिकेने म्हटल्याची गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. या भावनेशी सहमत व्हावं, अशी परिस्थिती भोवती आहे, हे तर खरंच. आपण इथवर कसे येऊन पोहचलो?
कोणत्याही भाषेतले शब्द हे संदेशांची देवाणघेवाण करत असतात. शब्दांची निवड व्यक्तिसापेक्ष असते. कोणते शब्द वापरायचे, कोणते नाहीत, ही वैयक्तिक निवडीची गोष्ट आहे.
यामध्ये फरक कधी पडतो? जेव्हा ती व्यक्ती इतर व्यक्तींच्या सहवासात येते आणि त्या व्यक्तींचे शब्द उचलते, तेव्हा. साहजिकच त्या व्यक्तींचा किंवा व्यक्तिसमूहाचा प्रभाव असतो, म्हणून ते शब्द उचलले जातात. वापरले जातात. त्या व्यक्तीचा प्रभाव ओसरला की, ते शब्दही ओसरतात. शब्दांची निवड कशी करायची, हे ज्याची त्याची बुद्धी ठरवते. मित्रमंडळींमध्ये काही शब्द खपून जातात, पण ते शब्द घरात, कामाच्या ठिकाणी, विशेषतः मोठ्या व्यक्तींसमोर वापरायचे नाहीत, हे प्रत्येकाने आपापलं ठरवलेलं असतं.
हे झालं आतापर्यंतचं चित्र. पण, आता मुलांची भाषा बदलायला लागली आहे आणि अर्थातच ही भाषा मुलं मोठ्यांकडून शिकू लागली आहेत. ऑनलाइन मालिका, सिनेमे, विविध प्रकारचे कार्यक्रम यातून दुसऱ्या माणसाला कमी लेखणं, मुलींचा सतत अनादर करत राहणं, माणसाच्या व्यंगावर बोट ठेवून विनोद करणं, सहजपणे शिव्या देणं, हे मुलांच्या आयुष्यात अगदी सहज शिरतं. मग सवयीने त्यात काही चुकीचं आहे, असं वाटेनासं होतं. हल्ली अशी भाषा बोलणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसते. मोठ्यांच्या तोंडची भाषा ऐकून मुलंसुद्धा तसंच बोलतात. माझ्याकडे आलेल्या एका केसमध्ये पहिलीतला छोटा मुलगा वर्गातल्या मुलाशी भांडत होता. खोडरबरावरून सुरू झालेलं साधं भांडण होतं. पण, तो मुलगा म्हणाला, ‘थांब तुझा कोथळा बाहेर काढतो’ आता ही भाषा कुठून आली? अर्थातच सिनेमे आणि मालिकांमधून ! खरं तर कोथळा काढणं याचा अर्थही त्या मुलाला माहिती नव्हता; पण रागात वापरायचा शब्द म्हणून तो तसं म्हणाला. अजून थोडा मोठा झाल्यावर त्याची भाषा आणि ती भाषा बोलणाऱ्या त्या मुलाचं मन कसं असेल?
मुलं कार्टून बघतात. पात्रांच्या व्यंगावर केलेले विनोद, दुसऱ्याला चिडवणं, वाईट बोलणं, हे प्रकार कार्टूनमध्ये सुद्धा असतात. या सगळ्याचा मिश्र परिणाम म्हणून सतत सर्व ठिकाणी, घरात, टीव्हीवर, रस्त्यावरच्या भांडणात, एकमेकांशी मारलेल्या गप्पांमध्ये जर असेच शब्द, अशाच शब्दांची मुबलक प्रमाणात पेरणी केलेली असेल, तर आपण कशा-कशावर बंदी घालणार? त्यापेक्षा मुलांसमोर काय बोलायचं, मुलांना कोणत्या प्रकारचे चित्रपट, कोणते कार्यक्रम दाखवायचे? केवळ मुलांसमोर म्हणून नाही, तर स्वतःही कोणती भाषा वापरायची? हे आपण स्वतः वैयक्तिकरीत्या ठरवू शकतो. ते अधिक सोपं नाही का?
एखादा नकारात्मक शब्द, शिवी, समाजसुसंगत नसलेलं वक्तव्य, दुसऱ्यांचा अपमान करण्यासाठी वापरलेली भाषा, दुसऱ्याची फजिती करून त्याला चिडवणं, दुसऱ्यांचा द्वेष करणं, हा द्वेष व्यक्त करत असताना अत्यंत घाणेरडे शब्द वापरणं हे करताना त्या व्यक्तीच्या मनावरही त्याचा परिणाम होत असतोच, कारण हे नकारात्मक शब्द मनामध्ये नकारात्मक भावना, म्हणजेच नकारात्मक रसायनं घेऊन येतात. ही रसायनं रक्ताभिसरणद्वारा आपल्या शरीरभर पसरतात. नकारात्मक रसायनांचा दुष्परिणाम हा आधी आपल्या शरीरावर होणार असतो. दुसऱ्यांच्या शरीरावर होईल तेव्हा होईल, पण आपल्या शरीरावर नक्कीच होणार आहे, हे लक्षात ठेवून शब्द वापरायला हवेत. शब्दांची निवड जाणीवपूर्वक करायला हवी आणि हे केवळ मुलांसाठीच नाही, तर ज्यांच्या मेंदूमध्ये भावनांची रसायनं निर्माण होतात, त्या प्रत्येकासाठीच आहे.
ishruti2@gmail.com