आधीच कोरोनात शिक्षणाचा बट्ट्याबोळ, आता उन्हाळी सुट्टीत काय करावे?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 06:38 AM2022-04-13T06:38:19+5:302022-04-13T06:38:36+5:30
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी म्हटले तर ही खूशखबर आहे, की चार महिने प्रत्यक्ष शाळेत बसून शिकल्यानंतर अधिकृतपणे त्यांना दीड महिन्याची उन्हाळी सुट्टी मिळणार आहे.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी म्हटले तर ही खूशखबर आहे, की चार महिने प्रत्यक्ष शाळेत बसून शिकल्यानंतर अधिकृतपणे त्यांना दीड महिन्याची उन्हाळी सुट्टी मिळणार आहे. पहिली ते नववी व पुढे अकरावीचे निकाल ३० एप्रिलपर्यंत लावावेत आणि त्यानंतर २ मेपासून उन्हाळी सुट्टी द्यावी, असे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने जारी केले आहे.
विदर्भ वगळता राज्याच्या अन्य भागात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ही सुट्टी राहील. १३ जूनला शाळा उघडतील. विदर्भात उन्हाचा तडाखा जूनमध्येही राहत असल्याने तिथल्या शाळा चौथ्या आठवड्यात म्हणजे २७ जूनला उघडतील. खूशखबर असा उल्लेख यासाठी केला, की शिक्षण विभाग आधी असा विचार करीत होते, की कोरोना महामारी व लाॅकडाऊनमुळे झालेले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी उन्हाळ्यातही शाळा सुरू ठेवाव्यात. त्यादृष्टीने चाचपणी सुरू होती. परंतु, आता तो विचार सोडून देण्यात आल्याचे दिसते. त्याऐवजी सुट्ट्यांचे वेळापत्रक ठरविताना त्या-त्या जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी नाताळ अथवा गणेशोत्सवातल्या सुट्ट्यांना कात्री लावून अध्ययनाचे दिवस कमीअधिक करावेत.
शैक्षणिक वर्षातील एकूण सुट्ट्यांची संख्या मात्र ७६ पेक्षा अधिक होऊ देऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. महामारीच्या दोन वर्षांमध्ये पार कोलमडून पडलेले शाळांचे वेळापत्रक उन्हाळी सुट्ट्यांच्या घोषणेने पुन्हा सुरळीत होत असले तरी यादरम्यान झालेले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान दुर्लक्षित करण्यासारखे नाही. पहिले वर्ष व त्यात कोरोनाची पहिली लाट कशीबशी निघून गेली. दुसऱ्या वर्षी मात्र सतत घरात कोंडून राहण्याचे खूप दुष्परिणाम मुलांवर झाले.
शाळा बंद असल्यामुळे दोस्तमंडळींच्या भेटीगाठी बंद होत्या. घराबाहेर पडता येत नसल्याने शारीरिक, मानसिक कुचंबणेचा सामना करावा लागला. शाळा, शिकवण्या, गृहपाठ, लेखन-वाचन-मनन आदींची सवय मोडली. दहावी व बारावीच्या परीक्षांवेळी मुलांच्या प्रतिक्रिया अशाच होत्या, की सलग तीन तास लिखाणाची सवय मोडल्याने अनेक प्रश्नांची उत्तरे येत असतानाही ती लिहिता आली नाहीत. ऑनलाईन पद्धतीने जे शिक्षण व्हायचे त्यातून आकलनाचे काही नवे प्रश्न उभे राहिले. विशेषत: ग्रामीण, आदिवासी भागात झालेले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठे आहे. बोर्डाच्या परीक्षांची गोष्ट वेगळी आहे. शाळांनीच परीक्षा घेऊन गुणवत्तेचे मूल्यमापन करायचे असले तरी सगळ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा टक्का घसरला आहे.
पाढे, गणिते, भाषा अशा सगळ्याच विषयांवर अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. ऑनलाईन शिक्षण मुळात बहुतेक शाळांनाच परवडेनासे होते व अजूनही आहे. काही बड्या, धनवंत, नामांकित शाळा वगळल्या तर इतरांच्या दृष्टीने अजूनही ऑनलाईन शिक्षण हा मूठभरांच्या हस्तिदंती मनोऱ्याचाच विषय आहे. यानिमित्ताने एका मोठ्या वर्गाच्या गरिबीचे, साधा स्मार्टफोन घेण्याची ऐपत नसलेल्या क्रयशक्तीचे दर्शन समाजाला घडले. अशा प्रकारच्या सर्व सोयीसुविधा ज्यांच्याकडे आहेत ते आणि ज्यांच्याकडे नाहीत ते असे ‘आहे रे’ व ‘नाही रे’ वर्गाचे एक विचलित करणारे चित्र साऱ्यांनी अनुभवले. ज्यांना ऑनलाईन शिक्षण देणे व घेणे शक्य आहे ते एकूणच शिक्षणाबद्दल थोडे बेफिकीर व ज्यांना शक्य नाही त्यांना शिक्षणाची, ज्ञानाची प्रचंड असोशी हा विरोधाभास पाहिला तर भविष्यात अशा संकटाचा सामना करताना शिक्षणाच्या दृष्टीने कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागेल, याचा अंदाज येतो. ऑफलाईन, प्रत्यक्ष वर्गात शिकण्याचा एक वेगळा फायदा असतो की शिक्षक व वर्गमित्र मिळून एक प्रकारे सामूहिक अध्ययन होते. त्यात खंड पडला. त्यामुळे एखादा किचकट व क्लिष्ट विषय एकट्याने समजून घेण्यात अडचणी आल्या.
गेल्या १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष शाळांमध्ये शिकताना मुलामुलींमध्ये अध्ययनाचा गाडा जो थोडाबहुत रुळावर आला, त्यात उन्हाळी सुट्ट्यांचा खंड पडणार आहे. अशावेळी शिक्षकांनी, शाळांनी, शिक्षणाधिकाऱ्यांनी उन्हाळी सुट्टीतही मुलांचे शैक्षणिक नुकसान कसे भरून काढता येईल, जास्तीचे गृहपाठ देता येतील का, शक्य असेल तर जास्तीच्या शिकवण्या घेता येतील का याचा विचार करायला हवा. सोबतच पुढच्या शैक्षणिक सत्राचे जिल्हानिहाय नियोजन करताना, सुट्ट्यांचे वेळापत्रक ठरविताना अनावश्यक असलेल्या, टाळता येतील अशा स्थानिक सुट्ट्या रद्द करता येतील का आणि शिकविण्याचे दिवस शक्य तितके वाढविता येतील का हे पाहावे. जेणेकरून गेल्या दोन वर्षांमध्ये मागे पडलेली गुणवत्ताही शैक्षणिक वेळापत्रकाप्रमाणेच पुन्हा रुळावर येईल.